सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २४मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

राजाराम भालचंद्र पाटणकर (पीएच. डी.)

राजाराम भालचंद्र पाटणकर(9 जानेवारी 1927 – 24 मे 2004) हे विचारवंत, समीक्षक, सौंदर्यमीमांसक होते.

ते श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे नातू होते. रा.भा. पाटणकरांचे वडील भा. ल. पाटणकर हे नाशिकच्या हंसराज प्रागजी महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते.भा.ल.पाटणकरांनी  बालकवींच्या सर्व कवितांचे सर्वप्रथम संकलन केले.

रा. भा. पाटणकर हंसराज प्रागजी  महाविद्यालयातूनच एम. ए. झाले. नंतर त्यांनी 1960मध्ये ‘कम्युनिकेशन इन लिटरेचर’ या विषयावर प्रबंध लिहून पीएच. डी.  मिळवली.

ते भावनगर, अहमदाबाद, भुज, अमरावती येथील शासकीय महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते.1964साली मुंबई विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. नंतर इंग्रजीचे विभागप्रमुख होऊन ते तिथूनच निवृत्त झाले.

तत्त्वज्ञान, आर्थिक इतिहास, इंग्रजी साहित्य यांत त्यांना विशेष रस होता.

‘पुन्हा एकदा एकच प्याला’ हा त्यांचा पहिला लेख 1951साली ‘नवभारत’मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांनी ‘एरिअल’ या टोपणनावाने कथा, कविता लिहिल्या.

सौंदर्यशास्त्र हा त्यांचा व्यासंगाचा विषय होता. ‘सौंदर्य मीमांसा’,  ‘क्रोचेचे सौंदर्यशास्त्र:एक भाष्य’, ‘कांटची सौंदर्यमीमांसा’ हे त्यांचे प्रकाशित ग्रंथ आहेत. कांट, हेगेल, क्रोचे, बोझांकीट इत्यादी तत्त्ववेत्त्यांनी स्वीकारलेला सिद्धांत पाटणकरांनी या ग्रंथांतून स्पष्ट केला आहे.

‘कमल देसाई यांचे कथाविश्व ‘, ‘मुक्तीबोधांचे साहित्य ‘, ‘कथाकार शांताराम ‘ या तिन्ही लेखकांच्या साहित्यावर पाटणकरांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रस्तावनांत त्यांनी मानवी आणि तात्त्विक भूमिका स्पष्ट केल्या आहेत.’अपूर्ण क्रांती’ या त्यांच्या पुस्तकात सांस्कृतिक परिवर्तनाचा संदर्भ आला आहे.

त्यांचे सर्वच लेखन तर्कशुद्ध व समीक्षाक्षेत्रात मोलाची भर घालणारे आहे.

‘इकॉनॉमिक हिस्टरी ऑफ इंडिया’ व ‘ड्युरिंग ब्रिटिश रूल ‘ही त्यांची पुस्तके अपूर्ण राहिली.

☆☆☆☆☆

अनंत रामचंद्र कुलकर्णी

 डॉ.अनंत रामचंद्र कुलकर्णी (19 एप्रिल 1925 – 24 मे 2009) हे मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक, संशोधक, इतिहासकार होते.

ते बेळगाव, अहमदनगर, सोलापूर, मराठवाडा, औरंगाबाद वगैरे ठिकाणच्या महाविद्यालयात / विद्यापीठात प्राध्यापक होते.

1964मध्ये ‘Maharashtra in the Age of Shivaji’ हा प्रबंध सादर करून त्यांनी मराठवाडा विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली.

नंतर ते पुण्याच्या डेक्कन कॉलेजात व पुढे पुणे विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक होते. नंतर ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे मानद कुलगुरू झाले.

कुलकर्णीनी उपलब्ध साधनांचा समर्पक उपयोग करून शिवकालीन महाराष्ट्राचा सामाजिक व आर्थिक अंगाने विशेष अभ्यास केला व त्या कालखंडाची अधिक परिपूर्ण मांडणी केली.

‘Maharashtra in the Age of Shivaji’ (1969) व ‘शिवकालीन महाराष्ट्र ‘(1978) हे त्यांचे ग्रंथ अत्यंत वस्तुनिष्ठ व मौलिक ठरले.

ग्रॅण्ट डफ या इतिहासाकारावर त्यांनी सहा व्याख्याने दिली. ती व्याख्याने पुणे विद्यापीठाने ग्रंथरूपाने प्रकाशित केली.त्यापूर्वी काही इतिहासकारांनी डफच्या इतिहासातील दोष दाखवले होते. कुलकर्णी यांनी, ज्या परिस्थितीत डफने इतिहासलेखन केले, त्याचा विचार केला पाहिजे, असे सैद्धांतिक विवेचन केले. त्याच्या इतिहासाची घडण कशी झाली, हे स्पष्ट केले. त्यामुळे ग्रॅण्ट डफची वेगळी प्रतिमा निर्माण झाली. कुलकर्णी यांचा पूर्वग्रहविरहित निकोप दृष्टिकोन हा इतिहास अभ्यासकांसाठी वस्तुपाठ आहे.

कुलकर्णी यांच्या ‘शिवकालीन महाराष्ट्र’, ‘पुण्याचे पेशवे’, ‘अशी होती शिवशाही’, ‘जेम्स कनिंगहॅम ग्रॅण्ट डफ’ वगैरे मराठी, तसेच ‘Maharashtra in the Age of Shivaji’, ‘Medieval   Maharashtra’,  ‘Maharashtra Society and Culture’, ‘Maratha Historiography’ इत्यादी इंग्रजी ग्रंथांमुळे मराठा इतिहासलेखनाचे क्षेत्र संपन्न झाले आहे.

राजाराम भालचंद्र पाटणकर व अनंत रामचंद्र कुलकर्णी यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांना आदरांजली.🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी,  विवेक  महाराष्ट्र नायक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments