सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  १९ मार्च -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

विनायक लक्ष्मण छत्रे

विनायक लक्ष्मण ऊर्फ केरूनाना छत्रे (16 मे 1825 – 19 मार्च 1884) हे प्राचीन भारतीय तसेच आधुनिक गणित व खगोलशास्त्र यांचे अभ्यासक होते. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लो. टिळक, गो. ग. आगरकर ह्यांचे ते गुरू होते.

त्यांचा जन्म अलिबागमधील नागाव येथे झाला. पण बालपणीच आई -वडील गेल्याने ते शिक्षणासाठी मुंबईला चुलत्यांकडे आले. त्यांच्यामुळेच असामान्य बुद्धिमत्तेच्या केरूनानांना वाचनाची गोडी व कोणत्याही प्रश्नाकडे वस्तूनिष्ठ दृष्टीने पाहण्याची सवय लागली. एल्फिन्स्टन इन्स्टिटयूटमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर व प्रा. आर्लिबार या व्यासंगी गुरूंकडून मिळालेल्या मूलभूत ज्ञानामुळे गणित, खगोल व पदार्थविज्ञानासारख्या कठीण शास्त्रांत त्यांना गती प्राप्त झाली. प्रगल्भ ग्रंथांचे परिशीलन करून केरूनानांनी या विषयातले प्रगत ज्ञान मिळवले.

आर्लिबर यांनी आपल्या वेधशाळेत अवघ्या सोळा वर्षांच्या केरूनानांना दरमहा 50 रु. पगारावर नेमले. तेथे दहा वर्षे केरुनानांनी जागरूकपणे हवामानशास्त्राचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुणे महाविद्यालयात व अभियांत्रिकी महाविद्यालयात ते गणित व सृष्टीशास्त्र शिकवत होते. ते हंगामी प्राचार्यही होते.

केरुनानानी शालेय पातळीवर गणित व पदार्थविज्ञानावर सुबोध व मनोरंजक भाषेत क्रमिक पुस्तके लिहिली.

त्यांनी मराठीत समर्पक, सुटसुटीत व अर्थवाही शब्द योजले. उदा. केषाकर्षण, भरतीची समा वगैरे. ‘कालसाधनांची कोष्टके ‘ व ‘ग्रहसाधनांची कोष्टके’, ‘कुभ्रम निर्णय’ इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले.

केरुनानांनी ‘ज्ञानप्रसारक सभे’पुढे हवा, भरती -ओहोटी, कालज्ञान वगैरे विषयांवर निबंध वाचले.’हवे’वर तर एकूण 17 निबंध आहेत.’पृथ्वीवर पडणारा पाऊस व सूर्यावरील डाग’ या विषयावरही एक निबंध होता.

केरुनानांना शास्त्रीय संगीत व नाटकांचीही आवड होती.

ते दिवंगत झाल्यावर ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने त्यांना ‘जर प्रो. छत्रे यांना युरोपात पद्धतशीर शिक्षण मिळाले असते, तर ते एक युगप्रवर्तक शास्त्रज्ञ म्हणून गाजले असते, ‘ अशी श्रद्धांजली वाहिली.

 

जनार्दन बाळाजी मोडक

जनार्दन बाळाजी मोडक (३१ डिसेंबर १८४५ – १९ मार्च १८९२ ) हे मराठी आणि संस्कृत काव्याचे चिकित्सक व संग्राहक होते. पुणे येथे बी.ए.च्या वर्गात असतानाच ते मेजर थॉमस कॅन्डी यांच्या हाताखाली भाषांतरकार म्हणून नोकरीला लागले. नंतर मोडक ठाणे शहरातील एका शाळेत शिक्षक झाले. महाराष्ट्र सारस्वतकार विनायक लक्ष्मण भावे यांच्यावर मोडकांचा मोठा प्रभाव होता.

‘विविधज्ञानविस्तार’मध्ये त्यांनी ज्योतिष, गणिताविषयी अनेक लेख लिहिले. त्यात भास्कराचार्यांच्या ‘लीलावती’चे भाषांतर, संस्कृत कवींची चरित्रे, संस्कृत काव्यातील सौंदर्य व पुस्तकपरीक्षण यांचाही समावेश होता. याखेरीज त्यांचे मराठी काव्यासंबंधीचे लेख ‘निबंधमाला’, ‘निबंधचंद्रिका’, ‘शालापत्रक’, ‘अरुणोदय’, ‘इंदुप्रकाश’ आदी मासिकांतून प्रसिद्ध झाले.’काव्येतिहाससंग्रह’ व ‘काव्यसंग्रह’ या मासिकांच्या संपादनाची जबाबदारीही त्यांनी उत्तमपणे पार पाडली. याशिवाय त्यांनी ‘जगाच्या इतिहासाचे सामान्य निरूपण’, ‘भास्कराचार्य व तत्कृत ज्योतिष ‘, ‘वेदांग ज्योतिषाचे मराठी भाषांतर ‘ ही पुस्तकेही लिहिली.
या प्रकांड पंडिताचे निधन ठाण्यात वयाच्या अवघ्या सत्तेचाळीसाव्या वर्षी झाले.

केरूनाना छत्रे व जनार्दन बाळाजी मोडक या दोन पंडितांना त्यांच्या स्मृतिदिनी आदरपूर्वक श्रद्धांजली. 🙏🏻🙏🏻

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना कऱ्हाड, शताब्दी दैनंदिनी. विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments