श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ५६ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र – आईच्या तोंडून हे ऐकताना सरसरून काटा आला होता माझ्या अंगावर आणि त्याच क्षणी ‘ हे गजानन महाराज कोण? ‘ हे जाणून घ्यायची उत्कट इच्छाही माझ्या मनात निर्माण झाली होती!)
ताई आयुष्यभर अतिशय स्वाभिमानाने जगली होती. आता आयुष्याची अखेरही स्वाभिमानानेच व्हावी अशीच तिची इच्छा होती. म्हणूनच तर पाणी नाका-तोंडात जायची वेळ आली तेव्हा हक्काचा आधार म्हणून तिने गजानन महाराजांना साकडं घातलं होतं आणि त्यांनीही तिचं गा-हाणं ऐकलं होतं. त्या पाच लाखांच्या लाॅटरी-बक्षिसाचा प्रसाद तिला देऊन त्यांनी तिच्या मनावरचं ओझं अलगद उतरवून ठेवलं होतं!
दुःखाचे, अडचणीचे प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यांत येतात, पण त्या प्रतिकूल परिस्थितीचा मनापासून स्वीकार करून त्याला धैर्याने तोंड देतानाही स्वतःचं तत्त्व आणि सत्त्वही निष्ठेने जपणारी माणसं मात्र अपवादात्मकच असतात. माझी ताई आणि केशवराव यांनी ते जपलेलं होतं हे ताईच्या अखेरच्या दिवसांमधल्या ज्या दोन प्रसंगांवरून मला प्रकर्षानं जाणवलं, त्या प्रसंगांनाही माझी आई साक्षी होतीच. तिच्यामुळेच तर त्या दोघांची सत्वशील समाधानीवृत्ती अधोरेखित करणारे ते दोन प्रसंग मला समजू शकले. हे दोन्ही प्रसंग म्हणजे ताई आणि केशवराव या दोघांचीही गजानन महाराजांनी घेतलेली सत्त्वपरीक्षाच होती! आणि म्हणूनच ते दोघेही त्या कसोटीला कसे खरे उतरले हे आवर्जून सांगावेसे वाटते.
ही सत्त्वपरीक्षा सुरू झाली ती ताईला लॉटरीचं बक्षीस लागलं त्या क्षणापासूनच! या बक्षिसाच्या रकमेमुळे कॅन्सर ट्रीटमेंटच्या खर्चाची सगळी आर्थिक गरज परस्पर भागणार होती हे जसं खरं तसंच त्याच क्षणापासून ताईचा परतीचा प्रवास पुढे अधिकच वेगाने सुरू झाला हेही खरं! कारण ती पुढे मग हळूहळू थकतच गेली. तरीसुद्धा तिच्या चेहऱ्यावर मलूलपणाचा लवलेशही नसायचा. तिच्या नजरेतल्या कृतार्थतेच्या रूपातलं एक वेगळंच समाधान तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित झालेलं असे. पण तिच्या थकलेल्या शरीरावर मात्र त्याची कांहीच मात्रा चालत नसल्यासारखी ती असहाय्यपणे पडून असायची.
त्या पार्श्वभूमीवरचा एक प्रसंग. ती भिंतीकडे तोंड करून कुशीवर झोपलेली होती. शेजारीच केशवराव खुर्चीत पेपर वाचत बसले होते. लॉटरीचं बक्षिस लागल्यानंतरच्या आठवड्याभरातली ही गोष्ट. तेव्हा अजित ग्रॅज्युएशननंतर एका सीए-फर्ममधे आर्टिकलशिप करत होता. तो ऑफिसमधून त्या दिवशी परत आला तो एक वेगळाच निरोप घेऊन. आल्या आल्या आपल्या बाबांना तो त्याबद्दलच सांगू लागला. अजितच्या अगदी जवळच्या मित्राचे वडील जे प्रतिष्ठित व्यापारी होते, त्यांच्याकडून आलेला तो प्रस्ताव होता. तिकीट बॅंकेत भरून खात्यावर परस्पर पैसे जमा होताना टॅक्स वजा होऊन पाच लाखांऐवजी साडेतीन लाखच जमा होणार होते. त्याऐवजी बक्षिस मिळालेलं तिकीट घेऊन बक्षिसाचे पूर्ण पाच लाख रूपये द्यायला त्या मित्राचे वडील तयार होते. एरवी होणारी कराची वजावाट न होता त्यांच्या हातात पूर्ण रक्कम यावी हाच त्यांचा हेतू होता. स्वतःचे दोन नंबरचे पैसे चलनात आणण्याचा मार्ग म्हणून मध्यस्थामार्फत हे असे प्रकार सर्रास केले जातात हे मी ऐकून होतो, पण अशा व्यवहारांत आधी ते तिकीट त्या मध्यस्थाकडे सुपूर्द करावे लागते आणि ट्रेझरीकडून अपेक्षित रक्कम त्यांना मिळाली की त्यानंतरच ठरल्याप्रमाणे पूर्ण पैसे लाभार्थीला दिले जातात. पण या प्रस्तावानुसार ताईच्या कुटुंबाबाबतची सद्भावना आणि निकडीची गरज लक्षात घेऊन मित्राचे वडील बक्षिसाची पूर्ण रक्कम तिकीट ताब्यात मिळताच त्याच क्षणी यांना द्यायला तयार होते.
” हे बघ, तू घरी जाऊन तुझ्या बाबांशी हे सगळं बोलून घे आणि त्यांना लगेच माझी भेट घ्यायलाही सांग ” असं ते म्हणाले होते. भिंतीकडे तोंड करून पडून राहिलेल्या ताईने अजितचं बोलणं ऐकलं आणि ते संपताच केशवराव कांही बोलणार एवढ्यांत आपली मान इकडे वळवायचा कसाबसा प्रयत्न करीत क्षीण तरीही ठाम आवाजात ती म्हणाली,
” त्या पैशातल्या फक्त साडेतीन लाख रुपयांवरच आपला अधिकार आहेs.. बाकी पैसे आपले नाहीत. सरकारी नियमाप्रमाणे जे मिळतील तेवढेच पैसे आम्हाला पुरेत. त्यांना त्यांचे पैसे नकोत म्हणून सांग.. “
” अगं, निदान मी काय म्हणतो ते ऐकेपर्यंत थांबायचंस तरी. ” केशवराव हसत म्हणाले.
” तू अगदी माझ्या मनातलं बोललीयस. मी त्याला हेच सांगणार होतो. “
खरं तर गरजू आणि हतबल अवस्थेत कुणालाही मोह पडावा अशा या प्रस्तावाबद्दल त्या दोघांनाही क्षणभरसुद्धा विचार करावासा वाटला नव्हता हे महत्त्वाचं. त्या प्रतिकूल परिस्थितीतही योग्य आणि अयोग्य यातली सीमारेषा त्यांच्या बाबतीत कणभरसुद्धा पुसट झालेली नव्हती. लक्ष्मीचं सात्त्विक रूप आणि मायावी रूप यामधला फरक ओळखण्याइतकं त्या दोघांचंही मन त्याही परिस्थितीत सजग होतं हे मला जास्त महत्त्वाचं आणि कौतुकास्पदही वाटतं!
नेमक्या गरजेच्या क्षणी परमेश्वराकडून मिळालेला हा आधार त्या दोघांनीही किती समतोल मनाने आणि प्रामाणिकपणे स्वीकारलेला होता हे अधोरेखित करणारा असाच हा दुसरा प्रसंग…
बक्षिस मिळालेलं तिकीट बँकेत कलेक्शनसाठी द्यायची वेळ आली तेव्हा ताईचं बचत-खातं बँकेत उघडणं आवश्यक होतं. त्यावेळीही….. ौ
‘अशा परिस्थितीत ‘माझं खातं कशाला उघडायचं? ‘ असंच ती म्हणाली होती. ‘ते कां नको’.. याबाबतचे तिचे विषय अतिशय स्पष्ट होते.
” मी काय हो, आज आहे आणि उद्या नाही, पहाताय तुम्ही. मला या व्यवहारी गोष्टीत आता गुंतवू नका. तुमचं खातं आहेच त्या बँकेत. त्याच खात्यावर बक्षिसाचं तिकीट जमा करायचं. हे पैसे माझ्यासाठी नाही, मी तुमच्यासाठीच मागितलेले होते. “
ताईने केशवरावांना निक्षून सांगितलं. एरवी व्यावहारीकदृष्ट्या विचार केला तरीही तिचं म्हणणं योग्यच होतं. ब्रँच मॅनेजर म्हणून काम करताना ‘डेथक्लेम सेटलमेंट’ साठी वारसदारांना करावी लागणारी यातायात मी उघड्या डोळ्यांनी अनेकदा पाहिलेली होती. तो त्रास आपल्या पश्चात आपल्या माणसांना होऊ नये अशीच ताईची इच्छा असणारच. आणि मलाही तेच योग्य वाटलं होतं. पण केशवरावांची याला तयारी नव्हती. आम्ही सर्वांनी परोपरीने सांगूनही त्यांनी अगदी टोकाच्या हट्टाने सेव्हिंग खातं उघडलं ते ताई आणि अजित यांच्याच जॉईंट नावावर. खात्यावर बक्षिसाचे पैसे जमा झाले तेव्हा ताई हॉस्पिटलमधे अखेरचे दिवस मोजत होती! त्यादिवशी केशवराव दवाखान्यांत गेले ते ताईच्या नावाचं बँक पासबुक सोबत घेऊनच. पासबुकावरचं तिचं नाव आणि तिच्या खात्यांत बक्षिसाची रक्कम जमा झाल्याची नोंद त्यांनी तिला आवर्जून दाखवली..!
‘गजानन महाराजांनी तिला दिलेला प्रसाद होता तो! म्हणून तो तिच्या नावावर जमा होणंच मला आवश्यक वाटलं. आत्ता या क्षणी तिला देण्यासारखं यापेक्षा अधिक मोलाचं माझ्याकडे दुसरं कांहीही नव्हतं. ‘ केशवराव म्हणाले होते! !
ईश्वरी कृपालोभ स्वीकारतानाही तो समतोल वृत्तीने कसा स्विकारावा याचे हे दोन्ही प्रसंग मूर्तिमंत उदाहरण होते! जगायचं कसं आणि कशासाठी हे शिकवणारे हे दोन्ही प्रसंग माझ्या मनावर कोरले गेलेले आहेत. ताई गेली तो दिवस होता १ हे १९९९. आज २५ वर्षं उलटून गेल्यानंतरही नुकतेच घडल्यासारखे ते माझ्या मनात ताजे आहेत!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈