सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 1 ☆ सौ. अमृता देशपांडे  

मला आज लिहायचं आहे

” डोळ्यातले पाणी ” या विषयावर.  आश्चर्य वाटलं ना! रडणं म्हणजे नकारात्मक वृत्तीचं आणि भावनांचं प्रकटीकरण.  धैर्य, पराक्रम,  सकारात्मक विचार,  सहिष्णुता,  हास्य या सर्वापुढे

‘ रडणं ‘ ही एक हलक्या किंवा खालच्या दर्जाची वृत्ती,  असा सर्वसाधारण समज.  रडणे या क्रियेशी संबंधित जेवढे काही वाक्प्रचार आहेत,  ते त्या क्रियेची अनावश्यकता आणि दुर्लक्षितता व्यक्त करतात .

” हिची रड काही संपत नाही” , ” जरा काही झालं की लागला मुळूमुळू रडायला “, ” अरे, पुरूषासारखा पुरूष तू, आणि रडतोस?” अशी अनेक वाक्ये आहेत.  त्यामुळे रडणं हे मनाचा कमकुवतपणा दर्शवितं  अशी पूर्वीपासून समजूत रूढ झाली आहे.

खरंतर ‘ रडणं ‘ किती नैसर्गिक आहे.  ” हसणं ” या प्रकारात स्मितहास्य,  हास्याचा गडगडाट, गालातल्या गालात हसणे, खुक् कन हसणे, खुद्कन हसणे, असे विविध पोटप्रकार आहेत. तसंच, रडणं किंवा डोळ्यातलं पाणी  यालाही अनेक नावे आहेत. अश्रू पाझरणे, आसवं गाळणे, टिपं गाळणे, गंगाजमुना,  डोळे वहाणे,  डोळे डबडबणे,  इत्यादि….

माणसाच्या मनाचा आरसा म्हणजे त्याचे डोळे. डोळे जितके पारदर्शी,  तितकंच डोळ्यातलं पाणी ही पारदर्शी असतं. डोळ्यातले पाणी म्हणजे मनातल्या भावनांचं न लपवता येणारं अदृश्य रूप. मग त्या भावना दुःखाच्या असोत वा आनंदाच्या,  कौतुकाच्या असोत वा कृतार्थतेच्या,  यशाच्या असोत वा अपयशाच्या,  प्रेमाच्या असोत किंवा संतापाच्या, उपकाराच्या असोत वा लाचारीच्या, भूतकाळाशी निगडीत असोत किंवा वर्तमानाशी, विरहाच्या असोत वा पुनर्मीलनाच्या.  मनातल्या या सगळ्या भावनांच्या कल्लोळाचं सदृश्य रूप म्हणजे डोळ्यातले पाणी.  कधी कधी भावनांच्या दाटून आलेल्या उमाळ्यापुढे व्यक्त होताना शब्द कमी पडतात, ते काम अश्रू करतात.

(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments