मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – एक अफलातून सोमवार ! – ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 😂 चं म त ग ! 😅 एक अफलातून सोमवार ! 💃☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“अहो उठा, पाच वाजून गेले!”

“हो गं, जरा गजर तर होऊ दे “

“मी दोनदा गजर बंद केलाय म्हटलं!”

“दोनदा ?”

“मग, साडे चारचा गजर  एकदा त्याच्या वेळेला झाला तेव्हा आणि मी बंद केल्यावर snooz ला जाऊन परत पाच वाजता झाला तेंव्हा “

“अरे बापरे, म्हणजे आता वाजले तरी किती ?”

“साडेपाच वाजत आले, मला पण सगळे आटपून आठ पाच पकडायची आहे”

“जाऊ दे, आज कंटाळा आलाय ऑफिसला जायला”

“हे तुमच दर सोमवारच झालंय हल्ली”

“हल्ली म्हणजे?”

“हल्ली म्हणजे डोंबिवलीला रहायला आल्यापासून म्हणतेय मी”

“हो, पण फ्लॅटात रहायची हौस कोणाला होती?”

“म्हणजे, हौस काय मला एकटीलाच होती? उलट आपल्या गिरगांवातल्या जागेपासून, माझी आर्यन education ची शाळा हाकेच्या अंतरावर आणि तुमच BMCच ऑफिस दोन बस स्टॉपवर होतं.”

“हो नां, मग मी जे म्हणतोय ते बरोबरच आहे ना?”

“काय डोंबलाच बरोबर?

अहो, तुम्हांलाच BMC मधे प्रमोशन मिळाल्यावर गिरगांवातल्या चाळीतल्या दोन खोल्या, काडेपेटीच्या आकाराच्या वाटायला लागल्या  आणि तुम्ही तसं बोलून पण दाखवत होतात हजारदा, विसरले नाही मी अजून.”

“अग म्हणून तर मी गिरगांवातली जागा विकून ठाण्याला वन बेडची जागा घेऊया म्हटलं, तर तुझ्या आईनं खोडा घातला त्यात”

“उगाच माझ्या आईला दोष देवू नका यात”

“का, का दोष देवू नको? तिच्यामुळेच तर आपण येवून पडलो ना डोंबिवलीला?”

“हो क्का, मग मला आता एक सांगा, तुम्ही जी ठाण्याला वन बेड बघितली होती, ती कुठेशी होती हो ?”

“कुठेशी म्हणजे तुला जस काही माहितच नाही, वाघबीळला!”

“हां, म्हणजे सांगायला ठाण्याला राहतो, पण स्टेशन पासून रिक्षाने फक्त वीस मिनिटावर, काय बरोबर ना ?”

“अग पण तिथे सुद्धा हजारो लोकं राहून, नोकरी साठी रोज मुंबई गाठतातच ना ?”

“बरोबर, पण त्याच वीस मिनिटापैकी फक्त दहा मिनिट पुढे ट्रेनने प्रवास करून तुम्ही डोंबिवलीला पोचता त्याच काय ?”

“ते जरी खरं असलं तरी आपली जागा स्टेशनपासून लांब असल्यामुळे, इथे डोंबिवलीला उतरल्यावर सुद्धा रिक्षाच्या भल्या मोठया लायनीत, वीस वीस मिनिट उभ रहावं लागतच ना?”

“हो, पण या सगळ्या गोष्टीत तुम्ही एक महत्वाचं विसरताय ?”

“काय, दोन सोसायटया सोडून तुझी आई रहाते ते?”

“ते तर आहेच, पण त्या वाघबीळच्या जागेच्या बजेट मध्ये माझ्या आईने आपल्याला डोंबिवलीला दोन बेडची जागा मिळवून दिली ते!”

“अग हो, पण ठाणा म्हटलं की कसं ऐकायला जरा बरं वाटत आणि शिवाय स्टेटस वाढल्यावर त्या प्रमाणे नको का रहायला?”

“हवं ना, मी कुठे नाही म्हणत्ये ? मग त्या चांगल्या BMC च्या quarters मिळत होत्या मोठया, त्या का नाही घेतल्यात हो ? म्हणजे ही वेळ आली नसती नां?”

“तुला ना काही कळत नाही”

“काय, काय कळत नाही?”

“अग, quarters घेतली की house allowance मिळत नाही आणि शिवाय तिकडे सुद्धा रोज ऑफिस मधल्या लोकांचेच चेहरे बघायचे ना?”

“मग इथे गोपाळ नगर मधल्या आपल्या आराधना सोसायटीत तुमचे शेजारी पाजारी रोज बदलतात की काय ?”

“अग तसं नाही, पण नाही म्हटलं तरी मॉनिटरी लॉस हा होतोच होतो आणि शिवाय…”

“ही तुमची पळवाट झाली”

“अग पळवाट वगैरे काही नाही. Quarters न घेण्यात दुसरा पण एक महत्वाचा मुद्दा आहेच.”

“अस्स, तो कोणता?”

“अग रिटायर झाल्यावर quarters सोडावी लागते आणि त्या जागेची आपल्याला नंतर इतकी सवय झालेली असते, की रिटायरमेंट येई पर्यंत आपण विसरूनच जातो, की आता काही महिन्यातच आपल्याला ही जागा सोडायची आहे आणि रहायची दुसरी सोय करावी लागणार आहे आता ते”

“हो ना, पण आता आपण काही quarters मधे रहात नाही त्यामुळे ती भीती नाही! तेव्हा आता उठा आणि पाणी

जायच्या आत सगळं आवरून ऑफीसला पळा”

“अग खरंच कंटाळा आलाय आज.  तू पण दांडी मारतेस का ?”

“अशक्य, आताच नवीन वर्ष सुरु झालय आणि परीक्षा…”

“मी तुला कधी सांगतो का गं दांडी मारायला ? आज जरा आग्रह करतोय तर एवढा काय भाव खातेस”

“पुरे, पुरे, तुम्ही आता जाताय अंघोळीला का मी जाऊ ?”

“असं काय ते ?आज जरा मजा करू, गोपी टॉकीजला पिच्चर टाकू आणि मॉडर्न प्राईड मध्ये मस्त हादडू”

“अरे बापरे, आज कसले डोहाळे लागलेत एका माणसाला?”

“म्हणजे नवरे मंडळीच विसरतात असं नाही तर ?”

“मी नाही समजले तुम्हाला काय म्हणायचं आहे ते, उगाच आमच्या सारखं कोड्यात बोलू नका, सरळ काय ते सांगा”

“म्हणजे तुम्ही बायका कोड्यात बोलता हे मान्य आहे तर तुला ?”

“आता बऱ्या बोलाने सांगणार आहात की जाऊ मी अंघोळीला?”

“मॅडम आज जर का तुमचा वाढदिवस असता आणि मी तो विसरलो असतो, तर अख्ख घर डोक्यावर घेतल असत आपण !”

“होच मुळी, आपल्या एकुलत्या एक बायकोचा वाढदिवस नवरा विसरतो म्हणजे काय?”

“आणि नवऱ्याचा वाढदिवस बायको विसरली तर चालतं वाटतं मॅडम ?”

“Oh my God, सॉरी सॉरी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !”

“It’s OK, थँक्स! मग काय  आज मी सांगितलेला प्रोग्राम follow करणार की दुसरं काही विशेष तुमच्या डोक्यात आहे मॅडम ?”

“दुसरं काही विशेष नाही, पण आज एक काम मात्र मी न चुकता नक्कीच करणार आहे”

“काय सांगतेस काय, खरंच?”

“खरंच म्हणजे? तुम्हाला माहित्ये मी शाळेत मुलांना खरं बोलायला शिकवते आणि स्वतः चुकून सुद्धा खोटं बोलत नाही.”

“अग हो, पण आज एक काम नक्की करणार आहेस म्हणजे काय करणार आहेस, ते आणखी सस्पेन्स न वाढवता सांगशील का प्लिज?”

“सांगते ना, आज कुठल्याही परिस्थितीत आठ पाच चुकवायची नाही म्हणजे नाही !”

© श्री प्रमोद वामन वर्तक

२४-०१-२०२३

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈