मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘बाई आणि मुलं ’ – सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

??

☆ ‘बाई आणि मुलं ’ – सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

मुलं विसरतात आईला

मुलं विसरतात बाईंना…… 

 

कोणे एके काळी, 

जी त्यांच्यासाठी आणतात फुलं

शिक्षकदिनाच्या दिवशी.. 

आणतात केक 

वाढदिवसाच्या दिवशी…… 

 

लिहितात ‘माझे आवडते शिक्षक’ विषयावरचा निबंध.                                       

डोळ्यांतून ओसंडतो

भक्तिभाव त्यांच्यासाठी…… 

 

करतात वर्णन आईजवळ

त्यांच्या ‘कित्ती कित्ती

सुंदर शिकवण्याचे,

पुस्तकापलीकडची आयुष्यभराची 

शिदोरी दिल्याचे’…… 

 

कधी कधी 

वयस्क असूनही

तशा न दिसण्याचे…… 

 

‘सेंड ऑफ’च्या दिवशी

डिश संपवून जाताना

पाया वगैरे पडतात

कोणी कोणी थांबून

गिफ्ट बिफ्ट देतात…… 

 

मग परीक्षा होतात..

रिझल्ट लागतात..

वर्षे उलटतात..

कॅलेंडरे बदलतात..

लग्ने वगैरे सुद्धा होतात

एखाद-दुस-याची आमंत्रणेही येतात…… 

 

कधी तरी कोणी भेटतं

रस्त्यातच वाकून पाया पडतं

कधी तरी कळतं

अमकी परदेशी गेली

तमका सायंटिस्ट झाला

तमकी डॉक्टर झाली

तमका ॲक्टर झाला….. 

 

बाई थकतात

फोनच्या रिंग्ज 

वाजेनाशा होतात

बाई कुठेतरी नाव वाचतात

मा. अमुक.. सुप्रसिद्ध तमुक..

बाई फोन नंबर शोधतात

मिळाला नाही तर मिळवतात

मेसेज की फोन.. विचार करतात…. 

 

तिकडची रिंग वाजत रहाते

“येईलच फोन त्याचा उलट!”

बाईंना वाटत रहाते

किती जाईल हरखून,

करेल चौकशी भरभरून,

आठवतील वर्गातले सगळे हास्यविनोद

त्यालाही फिरून फिरून!

म्हणेल, “आता भेटायलाच येतो

बायकोला दाखवायला आणतो.”

बेल वाजल्याचे भास होतात

बाई कितीदा तरी फोन बघतात….. 

 

तास, दिवस, वर्षॆ उलटतात

अनेक काळे केस पांढरे होतात…

मग कुठल्याश्या वृत्तपत्राच्या कोप-यात

श्रद्धांजलीच्या रकान्यात

लहानशा चौकोनात

येते छापून – ज्येष्ठ.. प्रसिद्ध वगैरे

यांचे दु:खद निधन झाल्याचे

बाईंचा काळापांढरा फोटो

आणि मागे कोणी नसल्याचे….. 

 

मग घणघणू लागतात फोन हातातले

याचे त्याला, त्याचे याला

कोणाकोणाचे कोणाकोणाला

‘किती छान शिकवायच्या बाई!

किती कडक होत्या बाई

तरी किती हसवायच्या बाई!’

कोणाकोणाला आवंढे येतात

कोणाच्या डोळ्यात अश्रू येतात

कोणीकोणी तर ढसाढसा रडतात…

 

कोणी एक घरी जातो

बाईंच्या फोटोला हार घालतो

उदास तसाच बसून राहतो…. 

 

भिंतीवरच्या फोटोत

आता बाई शांत असतात

त्यांच्या पिंडाला लगेच

कितीतरी कावळे शिवतात…. 

लेखिका :  संजीवनी बोकील

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈