?पुस्तकावर बोलू काही?

☆ “अंतराळवेध” – लेखक : श्री राजीव पुजारी  ☆ परिचय – सौ. सुनीता पुजारी ☆

लेखक – राजीव गजानन पुजारी

प्रकाशक – क्राऊन पब्लिशिंग, अहमदाबाद

पृष्ठ संख्या – २८८

किंमत – ₹ ३५०/-

मागील आठ दिवसांत श्री राजीव पुजारी लिखित ‘अंतराळवेध’ हे पुस्तक वाचले. खरोखर हे पुस्तक म्हणजे अंतराळ क्षेत्रात रस असणाऱ्यांसाठी मोलाचा खजिनाच आहे. पहिल्यांदा लक्ष वेधून घेते ते मुखपृष्ठ. पुस्तकाच्या नावाला साजेसेच हे मुखपृष्ठ आहे. मुखपृष्ठावर भारताला ललामभूत ठरलेला विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हर चांद्रपृष्ठाच्या पार्श्वभूमीवर ठसठशीतपणे उठून दिसतात. वरच्या उजव्या कोपऱ्यात अमेरिकेचा पर्सिव्हिरन्स रोव्हर मंगळभूमीवर कार्यरत दिसतो. वरच्या उजव्या कोपऱ्यात भारताचा मानदंड असणाऱ्या इस्रोचा लोगो दिसतो व दोहोंच्या मध्ये भारतीय अंतराळ क्षेत्राचे जनक डॉ विक्रम साराभाई यांचे छायाचित्र दिसते. पर्सिव्हिरन्सच्या खाली चांद्रयान -३ च्या चंद्रावतरणाचा क्षण अचूक दाखविला असून त्या खाली इस्रोचा प्रक्षेपक अवकाशात झेपवतांना दिसतो. मुखपृष्ठ पाहूनच वाचकांना पुस्तक खरीदण्याचा मोह होतो. मालपृष्ठावर पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती दिली आहे.

पुस्तक एकूण चार विभागात आहे. पहिल्या विभागात नासाची मार्स २०२० मोहीम दहा भागांत विशद करून सांगितली आहे. पहिल्या भागात पर्सिव्हिरन्स रोव्हर विषयी जाणून घेण्याचे सात मुद्दे विस्ताराने सांगितले आहेत. दुसऱ्या भागात प्रथमच दुसऱ्या ग्रहावर स्वायत्त उड्डाण भरणाऱ्या इंजेन्यूटी हेलिकॉप्टर विषयी जाणून घेण्याच्या सहा गोष्टी सांगितल्या आहेत. तिसऱ्या भागात मार्स २०२० मोहिमेविषयी तांत्रिक माहिती सांगितली आहे. चौथ्या भागात मंगळ ग्रहाविषयी व मार्स २०२० यानाच्या प्रक्षेपणाविषयी माहिती दिली आहे. पाचव्या भागात यानाचा मंगळाच्या वातावरणात प्रवेश, अवरोहण व प्रत्यक्ष मंगळावतरण याविषयीची माहिती आहे. सहाव्या भागात यान मंगळावर उतरल्यावर त्याला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागल्या याविषयीची माहिती आहे. सातव्या भागात रोव्हर व खडकाचे नमुने सठविण्याच्या प्रणालीविषयीची माहिती आहे. आठव्या भागात मंगळाकडे जातानाच्या मार्गक्रमणाचे टप्पे, त्या टप्प्यांवर असणारी वैज्ञानिक उपकरणे व मोहिमेचा उद्देश विशद केला आहे. नवव्या भागात रोव्हरला ऊर्जा पुरविणाऱ्या MMRTG विषयी माहिती आहे तसेच उड्डाणापासून ते अवतरणापर्यंत यान व पृथ्वी यांदरम्यान दूरसंभाषण कसकसे होत होते या विषयीची माहिती आहे. दहाव्या भागात यानावर असणारी प्रायोगिक उपकरणे म्हणजे MOXIE व इंजेन्यूटी हेलिकॉप्टर विषयी माहिती दिली आहे तसेच नमुने गोळा करण्याची प्रणाली व एकंदरीतच यानाच्या जुळणीच्यावेळी घेतलेल्या कम्मालीच्या स्वच्छतेसंबंधी अचंबित करणारी माहिती दिली आहे.

पुस्तकाच्या दुसऱ्या विभागात नासा व इस्रोच्या विविध मोहिमांची माहिती दिली आहे. यात LCRD, IXPE, DART, LUCY, जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण, आर्टिमिस योजना व मंगळ नमुने परत योजना या नासाच्या मोहिमा तसेच SSLV-D1, SSLV-D2, चंद्रयान ३, आदित्य एल 1 या इस्रोच्या मोहिमांविषयी साद्दंत माहिती दिली आहे. तसेच गुरूत्वीय लहरींच्या वैश्विक पार्श्वभूमीच्या शोधाविषयी विस्तृत माहिती आहे. हे वाचून लेखकाच्या अंतराळाविषयीच्या सखोल अभ्यासाची अनुभूती येते.

पुस्तकाच्या तिसऱ्या विभागात दोन अंतराळविज्ञान कथा आहेत. पहिली कथा आहे ‘आर्यनची नौका’. हि कथा मानव भविष्यात मंगळावर करू पाहणाऱ्या वसाहतीसंबंधी आहे. सध्या मंगळ जरी शुष्क दिसत असला तरी एकेकाळी तो सुजलाम् सुफलाम् होता. कालांतराने त्याचे चुंबकीय क्षेत्र व वातावरण नाहीसे झाले. याच्या परिणामस्वरूप तो शुष्क झाला. या कथेत इस्रोने मंगळाचे चुंबकीय क्षेत्र व वातावरण कसे पुनरुज्जीवीत केले, ऑक्सिजनची पातळी कशी वाढवली, ध्रुवांजवळील व घळींमधील गोठलेले पाणी द्रवरूपात आणून मंगळ सुजलाम् सुफलाम् कसा केला व पृथ्वीवरील निवडक माणसांनी इथे वसाहत कशी वसवली याचे वैज्ञानिक शक्यतांच्या अगदी निकट जाणारे कल्पचित्र रंगवले आहे.

दुसरी कथा आहे ‘ भेदिले शून्यमंडळा ‘. या कथेत लेखकाच्या स्वप्नात यंत्रमानव मंगळावर जातात. तेथे उत्खनन केल्यावर त्यांना मंगळावर एके काळी वैज्ञानिक दृष्ट्या अत्यंत पुढारलेली जमात होती असे निदर्शनास येते. उत्खननात त्यांना कांही विज्ञान विषयक पुस्तके मिळतात. त्यातील एक पुस्तक कृष्णविवरांसंबंधी असते. त्यात कृष्णविवरात प्रवेश कसा करायचा याचे विवरण असते. तदनुसार लेखक कृष्णविवरात प्रवेश करून धवल विवरातून बाहेर येऊन समांतर विश्वात जातो व पृथ्वीवर भारताने हरलेली मॅच तिथे भारत जिंकल्याचे त्याच्या निदर्शनास येते. दोन्ही कथा वाचतांना लेखकाचा अभ्यास व त्याची कल्पनाशक्ती यांचा कसा उत्कृष्ट मिलाफ झाला आहे याची प्रचिती येते.

चौथ्या भागात भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो, त्याची विविध केंद्रे, तेथे चालणारे संशोधन याची माहिती दिली आहे. तसेच ज्या शास्त्रज्ञांनी इस्रो वाढविण्यासाठी योगदान दिले आहे त्यांची चरित्रे थोडक्यात दिली आहेत.

पुस्तक पेपरबॅक स्वरूपात असून फॉन्ट मोठा असल्याने डोळ्यांना त्रास होत नाही. एकूणच हे  ‘अ मस्ट रीड’ पुस्तक आहे.

परिचय : सौ. सुनीता पुजारी, सांगली 

सांगली (महाराष्ट्र)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments