श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
दमदार साथ…
श्री आशिष बिवलकर ☆
☆
७) चित्रकाव्य —
“ दमदार साथ “ कवी : आशिष बिवलकर
चित्रकाव्य : “ दमदार साथ…. “
दमदार अशीच साथ लागते,
सहजीवन सोबत काढतांना |
थकत नाही तिची पाऊलं,
संसाराचा गाडा ओढतांना |
संसाराच्या तव्यावर,
पहिले चटके, मग भाकर |
कष्ट उपासल्याशिवाय,
जीवन नसते ते सुकर |
देह जरी वाकला,
तरी सोसत असते कळ |
गात्र जरी थकली,
तरी तीच देत राहते बळ |
काडी काडी जमवत,
पक्षीण घरटे बांधते |
सूत ज्याच्याशी जुळले,
त्याच्या संगे सुखे नांदते |
ऊन वारा पाऊस सोसत,
संसाराची घडी बसवते |
लाज कशाची न बाळगता,
त्याच्या संगे कष्ट उपसते |
जन्माजन्माची गाठ बांधत,
भाळी कुंकू अभिमानाने मिरविते |
साधीभोळी जरी असली तरी,
संसाराचा गाडा त्याच्या संगे खेचते|
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈