मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ सप्तपर्णी…. ☆ श्री विजय गावडे

श्री विजय गावडे

? क्षण सृजनाचे ?

☆ सप्तपर्णी…. ☆ श्री विजय गावडे ☆  

दोनेक महिन्यापूर्वी मोहोराने भारलेले सातिवनाचे (सप्तपर्णीचे) डेरेदार वृक्ष आता मुंडावळ्यागत लोम्बणाऱ्या शेंगानी लगडलेत.  फळेच्छुक इतरही वृक्षवल्ली आपापल्या तान्हूल्या फळांचे लाड करतांना दिसताहेत.  वने आणि मने दोन्ही प्रफूल्लीत करणारी हि निसर्ग किमया आपसूकच कवितेत उतरते ती अशी

 

सप्तपर्णी

 

शेंगाळले सातिवन

वने झाली आबादान

रायवनातून घुमे

काक – कोकीळ कुंजन

 

कानी घुमतो पारवा

अंगी झोंबतो गारवा

गार गार वाऱ्यातून

मंद सुगंध वहावा

 

फुले कोमेजून आता

फळे सानुली रांगती

जंगलाच्या राऊळात

गोड अंगाई झडती

 

कोण फळानी बहरे

कोणी  लगडे शेंगानी

निसर्गाचं जसं देणं

घेई धरती भरुनी

 

भारावून वेडे पक्षी

गाती सुरात कवने

रानी वनि जणू भरे

गितस्पर्धा आवर्तने

 

मात करुनी असंख्य

निसर्गाच्या कोपांवर

दिसा मासी सावरे

धरणीमायेचा पदर

 

उठा आतातरी गेली

गत वरसाची खंत

घेऊ भरारी नव्याने

आसमंत ये कवेत.

 

© श्री विजय गावडे

कांदिवली, मुंबई

मो 9755096301 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈