सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ कथा… सौ. उज्वला केळकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

रसग्रहण

जे सत्यात नसते ते कधी कधी स्वप्नात दिसते. स्वप्ने कुणीही पहावीत.  कधी कधी स्वप्ने इतकी सुखद असतात की ती संपूच नयेत, त्यातून जाग येऊ नये असेच वाटते.  पण तसे होत नाही.  सुखद स्वप्नांतून सत्यात आल्यानंतर पुन्हा एकदा मळकट वास्तवाची जाणीव मनाला कातरते. काहीशा अशाच भावनांना निरखून लिहिलेली सुश्री उज्ज्वला केळकर यांची ही कविता…

☆ – कथा – सौ. उज्वला केळकर  ☆

मरगळल्या दिशा

गच्च भरलेलं आभाळ

आंधारा वर्ग अधिकच काळवंडलेला

पिसाट वारा छ्प्पर फाडून आत आलेला.

फुटक्या कौलारातून  निथळणारं पाणी

उसवल्या बाहीतून ठिबकतय खांद्यावर

उठवतय शहारा अंगावर.

पोरं टोरं

कळकट, मळकट

केस विस्कटलेली, शर्ट फाटलेली

बसली आहेत, निमूटपणे

कथा ऐकत

कुणा सुशील, सुंदर राजकान्येची

तिला पळवून नेणार्‍या

कुणा दुष्ट भयंकर राक्षसाची

प्रेमळ यक्षाची आणि धाडसी राजपुत्राची.

आणि मग सारा वर्गच जातो बनून यक्षनगरी

चमचमणारी, झगमगणारी

प्रेमळ गुरुजी वाटतात, यक्षांचे राजे

वाटा दाखवणारे, वर देणारे

सारी मुलेच मग बनतात राजपुत्र

भरजरी पोशाख ल्यालेले, तलवार घेतलेले

आणि निघतात सोडवायला

त्या सुशील, सुंदर राजक्न्येला

आणि इतक्यात

शाळेचा शिपाई येतो राक्षस बनून.

घंटेची आरोळी ठोकून,

टाकतो सारी कथाच विस्कटून 

टाकतो सारी कथाच विस्कटून.  

मुक्तछंदातील ही कविता वाचल्यानंतर आपण कुठल्याशा अविकसित,दैन्यावस्थेतल्या दलीत, पीडीत अशा भागात जाऊन पोहोचतो.  तिथले  जीवन अत्यंत निकृष्ट,निकस आहे.  कुठल्याही प्रगतीच्या खाणा खुणा नसलेल्या या भागातल्या शाळेत शिकून जीवनाला फुलवू  पाहणाऱ्या, आकार देऊन पाहणाऱ्या लहान मुलांच्या केविलवाण्या राज्यात व्यथित अंतकरणाने जातो.

मरगळल्या दिशा गच्च भरलेलं आभाळ

अंधारा वर्ग अधिकच काळवंडलेला

पिसाट वारा छप्पर फाडून आत आलेला

फुटक्या कौलारातून निथळणारं पाणी

उसवल्या बाहीतून ठिबकतय खांद्यावर

उठवतय शहारा अंगावर

या काव्यपंक्तीतून कवियत्रीने स्वतःच्या मनातल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत..  असे एक वातावरण जे खरं म्हणजे स्वतः अनुभवलेलं  नसल्यामुळे प्रत्यक्ष दिसणाऱ्या विदारक दृश्यामुळे त्यांचे मन हेलावते. 

एका खेड्यातल्या शाळेचं हे चित्र. आधीच तेथील लोकांचे जीवन दिशाहीन, मरगळलेलं.  त्यातून आकाश ढगांनी भरलेलं, अंधारलेल्या वर्गात अधिकच काळोख आणणारं. नुसतं एवढंच नाही तर त्यातून छप्पर पाडणारा सुसाट वारा आणि गळणारे पाणी जे फाटक्या कपड्यातल्या विद्यार्थ्यांना भिजवत आहे.  त्या बाल विद्यार्थ्यांची ही  शैक्षणिक दशा पाहून कवियत्रीच्या अंगावर अक्षरश: शहारे उभे राहतात.

कळकट मळकट

केस विस्कटलेली शर्ट फाटलेली

बसली आहेत

निमुटपणे

कथा ऐकत

हे कळकट, मळकट, केसावर कधीही कंगवा न फिरवलेली विस्कटलेल्या केसांची, फाटक्या कपड्यातील मुले मात्र गुपचुप शांत बसून गुरुजी सांगत असलेल्या कथेत रमली आहेत.

कुणी सुशील सुंदर राजकन्येची

तिला पळवून नेणाऱ्या

कुणा दुष्ट भयंकर राक्षसाची

प्रेमळ यक्षाची आणि धाडसी राजपुत्राची

गुरुजी सांगत असलेल्या कथेत एक सुंदर राजकन्या आहे.ती सुशीलही आहे. तिला कुणा दुष्ट, भयंकर राक्षसाने पळवलेले आहे. मात्र तिच्या रक्षणासाठी प्रेमळ यक्ष— सेवक, तसेच धैर्यवान राजपुत्र ही आहेत.

 आणि मग सारा वर्गच जातो बनून यक्षनगरी

चमचमणारी झगमगणारी

प्रेमळ गुरुजी वाटतात यक्षाचे राजे

वाटा दाखवणारे वर देणारे

या कथेच्या माध्यमातून ती सारी कळकट मुले खरोखरच मनाने एका जादुई नगरीत— जी चमचमणारी लखलखणारी आहे  तिथे जाऊन रमतात. त्या झगमगाटाने प्रफुल्लित होतात.  त्या क्षणी कथा सांगणारे गुरुजी म्हणजे मुलांना त्या यक्ष नगरीचे सम्राट वाटतात आणि तेच आपल्या आयुष्याची वाट आखणार आहेत, सुंदर जीवनासाठी आशिष देणार आहेत याची खात्री मुलांना वाटते.

 सारी मुलेच बनतात राजपुत्र

 भरजरी पोशाख ल्यालेले

 तलवार घातलेले

 आणि निघतात सोडवायला

 त्या सुशील सुंदर राजकन्येला

कथेत रमलेल्या मुलांना आता वाटायला लागते की ते स्वतःच राजपुत्र आहेत. त्यांच्या अंगावर भरजरी पोशाख आता आहेत.  हातात तलवारी आहेत आणि राक्षसाच्या तावडीत सापडलेल्या सुंदर राजकन्येला सोडवण्यासाठी ते आता समर्थ आहेत.

या चार ओळी म्हणजे उज्वला ताईंच्या या काव्यातला गर्भितार्थ  सांगणाऱ्या, शिखर गाठणाऱ्या ओळी आहेत. वरवर  ही जरी परिकथा वाटत असली, सरळ सरळ अर्थ सांगणारी राजकन्येची गोष्ट  वाटत असली तरी त्या कथेशी मनाने जोडल्या गेलेल्या मुलांचे स्वप्नविश्व, भाव विश्व फुलवणारी आहे. भरजरी पोशाख, तलवारी,राजकन्या,राजपुत्र, राक्षस हे रूपकात्मक शब्द आहेत. यातून कधीतरी मरगळलेल्या जीवनाला सौंदर्य आणि गळून गेलेल्या मनाला आत्मविश्वास मिळण्याची आशा दिसून येते. या कथेतील सुंदर राजकन्या म्हणजे एक सुरेख जीवन आणि राक्षसांच्या तावडीत सापडलेली राजकन्या म्हणजेच या सुंदर जीवनावरचे दारिद्र्याचे मळकट आवरण आणि  ते दूर करण्याचं बळ आपल्याही हातात आहे हा विश्वास त्या मुलांना मिळतो.

आणि इतक्यात

शाळेचा शिपाई येतो राक्षस बनून

घंटेची आरोळी ठोकून

टाकतो सारी कथाच विस्कटून

टाकतो सारी कथाच विस्कटून…

कथेतला सुखद शेवट कल्पित असतानाच तास संपल्याची घंटा शिपाई वाजवतो आणि घंटेचा तो कर्कश्श आवाज ऐकल्यानंतर सुंदर कथेचा सारा पटच उधळून जातो. कथा तिथेच अर्धवट विस्कटून जाते.

इथे उज्वला ताईंनी शाळेच्या शिपायाला राक्षसाची उपमा दिली आहे.  आणि हा राक्षस रुपी शिपाई म्हणजेच मुलांच्या आयुष्यातलं दुःखद वास्तव आहे. राजकन्या, राजपुत्राची कथा म्हणजे सुखद स्वप्न आणि तास संपल्याची घंटा म्हणजे वास्तवाची जाणीव. पुन्हा तेच नैराश्य. तीच उदासीनता.तेच मळकट दैन्य. दिशाहीन आयुष्य.

आणि त्यातूनच उमटणारे अनेक विदारक प्रश्न. या मुलांची आयुष्यं कधी उजळणारच नाहीत का? या मुलांना सुंदर भविष्य बघण्याचा अधिकारच नाही का? प्रगतीचे वारे यांच्यापर्यंत कधी पोहोचणार? शहरे यच्चयावत सुविधांनी सजत असताना खेडोपाडीचे हे दैन्य दूर करण्याचे आवश्यक कार्य कोण, कधी आणि कसे करणार?

उज्ज्वला ताईच्या  कथा या सरळ साध्या कवितेतून जणू  त्यांनी सहृदयतेने  संवेदनशील सामाजिक प्रश्नांनांच स्पर्श केलेला आहे.  काव्यातल्या प्रत्येक ओळीतून झिरपणाऱ्या वेदनांना त्यांनी एक लक्षवेधी सामाजिक स्वरुप दिलेले आहे. आपण सारे आपल्याच  सुखात रमलो आहोत पण आपल्या झोळीतील काही गोजीरवाणी सुखे, आनंद या नुसतेच स्वप्न पाहणाऱ्या मुलांच्या  ओंजळीत कधी पडणार?

या   कवितेतून व्यक्त होणारी उज्वला ताईंची सामाजिक जाणीव, कळकळ ही वंदनीय आहे.

जाता जाता इतकेच म्हणेन,” एक सुंदर संदेश देणारी, डोळे उघडे ठेवून आजूबाजूचे जग सह नुभूतीने पाहायला लावणारी दमदार, अर्थपूर्ण कविता— कथा.”

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments