सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ अज्ञेयाचे रुद्धद्वार… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆ अज्ञेयाचे रुद्धद्वार…. स्व. वि. दा. सावरकर ☆

ज्या घरापासुनी मार्ग सर्व फुटणारे

येणार घरासी मार्ग त्याचि ते सारे ॥ ध्रु.॥

ऐकोनि तुझ्या भाटांच्या

गप्पांसि गोड त्या त्यांच्या,

व्यापांसि विसावा माझ्या

जीवासि ये घरीं तुमच्या

ठोठावित थकलो! अजुनि नुघडती बा रे ।

आंतूनि तुझी तीं बंद सदोदित दारें ॥१॥

विस्तीर्ण अनंता भूमी

कवणाहि कुणाच्या धामीं

ठोठावित बसण्याहूनी

घेईन विसावा लव मी

येईन पुन्हा ना तुझ्या घरा ज्याची रे ।

हीं वज्र कठिणशी बंद सदोदित दारे ॥२॥

ज्या गाति कथा राजांच्या

सोनेरि राजवाड्यांच्या

मी पथें पुराणज्ञांच्या

जावया घरा त्या त्यांच्या

चाललो युगांच्या क्रोशशिला गणितां रे ।

तो पथा अंति घर एक तुझें तें सारें ॥३॥

दुंदुभी नगारे शृंगे

गर्जती ध्वनीचे दंगे

क्रांतिचे वीर रणरंगे

बेभान नाचती नंगे

मी जात मिसळुनी त्यांत त्या पथें जों रे ।

अंतासि उभें घर तेंचि तुझें सामोरे ॥४॥

कोठूनि आणखी कोठे

चिंता न किमपि करिता ते

ही मिरवणूक जी मातें

नटनटुनि थटुनि या वाटे

ये रिघूं तींत तों नाचनाचता मारे ।

पथ शिरे स्मशानी! ज्यांत तुझें ते घर रे ॥५॥

सोडुनी गलबला सारा

एकान्त पथा मग धरिला

देताति तारका ज्याला

ओसाडशा उजेडाला

चढ उतार घेतां उंचनिंच वळणारे ।

अजि मार्ग तो हि ये त्याचि घरासी परि रे ॥६॥

जरि राजमार्ग जे मोठे

तुझियाचि घराचे ते ते

घर अन्य असेलचि कोठे

या अरुंद आळीतुनि तें

मी म्हणुनि अणूंच्या बोगबोगद्यांतुनि रे ।

हिंडुनी बघे घर अन्ति तुझे सामोरें ॥७॥

घर दुजे बांधु देईना

आपुले कुणा उघडीना!

या यत्न असा चालेना

बसवे न सोडुनी यत्ना

ठोठावित अजि मी म्हणुनि पुनरपी बा रे ।

तीं तुझ्या घराची बंद सदोदित दारे ॥८॥

कवी – वि. दा. सावरकर

या कवितेचा आकृतीबंध मोठा लोभस आहे. प्रत्येक  कडव्यात यमकाने अलंकृत चार छोट्या ओळी व तद्नंतर प्रत्येक  कडव्यात ध्रुवपदाशी नातं सांगणाऱ्या दोन मोठ्या ओळी. सर्व आठ कडव्यांतल्या या सोळा मोठ्या ओळी व ध्रुवपदाच्या दोन अशा अठराच्या अठरा ओळी अज्ञाताच्या बंद घरा/दाराविषयी भाष्य करतात व संबोधनात्मक, रे (अरे) ने  संपतात. यामुळे कवीची आर्तता, अगतिकता अधोरेखित होते तसेच यामुळे कविता एवढी गेय होते की आपण ती वाचतावाचताच गुणगुणू लागतो.

सावरकरांनी ही कविता ते अंदमानात २५+२५ अशी ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते, तेंव्हा लिहिलेली आहे. आपण कल्पनाही करू शकणार नाही, की ५० वर्षांचा तुरुंगवास झालेल्या माणसाची मनःस्थिती कशी असेल. त्यातून  तो माणूस असा की ज्याला मातृभूमीसाठी फक्त राजकीय नाही तर सामाजिक क्रांती देखिल घडवून आणण्याची तीव्र इच्छा होती. तुरुंगवासांत आपलं जीवन व्यर्थ  जाणार. आपल्या हातून देशसेवा घडणार नाही या विचाराने त्यांना हतबलतेची जाणीव झाली असेल. हे विश्व संचलित व नियंत्रित करणार्‍या अज्ञात शक्तीला याचा जाब विचारावा किंवा त्यालाच यातून बाहेर पडण्याचा मार्ग पुसावा असं वाटलं असेल. किंवा कदाचित मृत्यूने येथून सुटका केली तर पुन्हा भारतमातेच्या उदरी जन्म घेऊन  परदास्यातून तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करावे असंही त्यांना वाटलं असेल. यासाठी त्या अज्ञाताच्या घराचा बंद दरवाजा किती काळ आपण ठोठावत आहोत पण तो उघडतच नाही असा आक्रोश सावरकर या कवितेत  करत आहेत. ही आठ कडव्यांची कविता सावरकरांच्या त्यावेळच्या मनःस्थितीचं दर्शन घडविते.

ध्रु.) अज्ञाताचं घर हे जीवनमृत्यूच्या आदिपासून अंतापर्यंतच्या चक्राकार मार्गावरचे स्थान आहे. जीवनाचे सगळे मार्ग येथूनच सुरू होतात व याच रस्त्याला येऊन मिळतात.

1) सावरकर त्या अज्ञातास उद्देशून म्हणतात, तुझे स्तुतीपाठक म्हणतात म्हणून, मी त्यांच्यावर विश्वसलो, मला वाटले की तुझ्या घरी मला थोडा विसावा मिळेल. पण तुझ्या घराचं बंद दार ठोठावून मी दमलो तरी ते उघडतच नाही.

2) ही भूमी विशाल आहे. तुझ्या घराचं न उघडणारं दार असं ठोठावित बसण्यापेक्षा मी कुणाच्याही घरी जाऊन थोडी विश्रांती घेईन पण तुझ्या घरापाशी येणार नाही कारण ही वज्राप्रमाणे कठीण असलेली तुझ्या घराची दारे सदोदित बंदच असतात.

3) पोथ्यापुराणांतून ज्ञानी माणसांनी सांगितलेल्या राजे राजवाड्यांच्या कथा ऐकून, त्यांच्या मार्गावरून मी युगांचे ‘मैलाचे दगड’ओलांडत त्यांच्या घरी जाऊ लागलो तर त्या मार्गाच्या शेवटी तुझेच घर होते.

4) दुंदुभि, नगारे यांच्या आवाजांच्या कल्लोळात क्रांतीवीर जेथे बेभान होऊन नाचत होते त्या मार्गावर मी त्यांच्यातलाच एक होऊन चालू लागलो तर त्या मार्गाच्या शेवटी पण तुझेच घर होते.

5) मी नटून थटून या मिरवणुकीत सामील झालो. ही मिरवणूक कुठून कुठे जात आहे हे ठाऊक नसतानाही नाचत नाचत त्या वाटेवरून जाऊ लागलो तर ती वाट स्मशानात जाऊन पोचली व तिथेही तुझेच घर होते.

6) हे सगळं सोडून मग मी मिणमिणत्या प्रकाशातल्या, उदास अशा एकांत मार्गावरून जाऊ लागलो. तो उंच सखल रस्ता चढ उताराचा, वळणावळणाचा होता पण तो सुध्दा शेवटी तुझ्या घरापाशीच जाऊन पोचला.

7) तुझ्या घराकडे जाणारा राजमार्ग  सोडून मी दुसर्‍या घराच्या शोधार्थ अरुंद रस्त्यावरून, अणुरेणूंच्या बोगद्यातून जाऊन पाहिलं पण शेवटी तुझ्या घरापाशीच येऊन पोचलो.

8) तू आपलं घर उघडत नाहीस, दुसरं बांधू देत नाहीस. माझे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत पण मला प्रयत्न सोडून देऊन बसणं पण प्रशस्त वाटत नाही म्हणून मी पुनःश्च तुझ्या घराची बंद दारं ठोठावत आहे.

सावरकर अज्ञात शक्तीला उद्देशून म्हणतात, ” जीवनाचे सर्व मार्ग जर तुझ्यापाशी येतात व तुझ्यापासून सुरू होतात तर आता माझ्या जीवनाचा मार्ग मला अशा ठिकाणी घेऊन आला आहे की मला पुढचा मार्गच दिसत नाही. म्हणून  तू मला मार्ग दाखव जेणेकरून मी माझ्या देशसेवेला अंतरणार नाही. यासाठी मी तुझ्या घराचे बंद दार ठोठावतो आहे. तू  दार उघडतच नाहीस म्हणून मी निरनिराळ्या मार्गांनी जाऊन दुसरे पर्याय शोधून पाहिले पण सगळे मार्ग  शेवटी तुझ्या बंद दाराशीच येतात. तू तुझे दार उघडत नाहीस, दुसरे घर बांधू देत नाहीस म्हणजे तू सोडून दुसरं कोणी मला या परिस्थितीतून बाहेर काढू शकेल अशी शक्यता तूच निर्माण केली नाहीस वा करू दिली नाहीस म्हणून मी पुनःपुन्हा तुझेच दार ठोठावत आहे व ठोठावत राहेन” असं सावरकर त्या अज्ञात शक्तीला ठणकावून सांगत आहेत.

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments