श्री अमोल अनंत केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ग्रहांकीत प्रेम… ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

पाडगावकरांची माफी मागून सादर करतोय

 ‘ग्रहांकीत प्रेम ‘ 📝❣️

 

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

तुमच्या आमच्या पत्रिकेत अगदी सेम नसतं

 

काय म्हणता?

या ओळी चिल्लर वाटतात?

काव्याच्या दृष्टीने अगदी थिल्लर वाटतात?

 

असल्या तर असू दे

फसल्या तर फसु दे

तरीसुद्धा 

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

तुमच्या आमच्या पत्रिकेत अगदी सेम नसतं 💕

 

पंचमातील शुक्राकडून 

प्रेम करता येतं

सप्तमातील ‘राहू’ कडून

आंतरजातीय होता येतं

घरचा विरोध पत्करून

गुरुजींना धरता येतं

‘गुण-मिलन’ न करता ही 3️⃣6️⃣

पळून जाता येतं 

 

म्हणूनच म्हणतो, –

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

तुमच्या आमच्या पत्रिकेत अगदी सेम नसतं 💞

 

जसं डोक्यात राग घातलेल्या ‘मेषेच’ असतं

तसंच डंख मारणाऱ्या ‘ वृश्चिकेचं ‘ असतं

या राशी आपल्या मानणा-या मंगळालाही 

प्रेमाचं मर्म चांगलच माहित असतं 

 

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

तुमच्या आमच्या पत्रिकेत अगदी सेम नसतं 💕

 

नटण्या मुरणा-या ‘ वृषभेला ‘

समतोल ‘तुळेची ‘ साथ असते

राशी स्वामी ‘शुक्राचे’ मात्र

‘शनिशी ‘ अधेमधे नाते तुटते

‘प्रजापती’ ची उलटी भूमिका

पालकांना अधून मधून डसत असते 

( जरा बघता का हो पत्रिका म्हणत

ज्योतिषाकडे त्यांची विनंती असते) 

त्यांनाही परत तेच सांगतो…

 

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

तुमच्या आमच्या पत्रिकेत अगदी सेम नसतं ❤‍🔥

 

असाच एक जण चक्क मला म्हणाला,

आम्ही कधी पत्रिकेच्या 

मागे लागलो नाही

दोन मुलं झाली तरी

त्यांचीही पत्रिका काढली नाही

 

आमचं काही नडलं का?

पत्रिकेशिवाय अडलं का?

 

त्याला वाटलं मला पटलं!

तेंव्हा मी इतकचं म्हणलं 

 

कर्म कर्म कर्म म्हणजे कर्म असतं

ते ही सगळ्यांच्या पत्रिकेत सेम नसतं 💘

 

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments