श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवितेचा उत्सव
☆ सांभाळ तू…. ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆
रोजचे सारे तरी…. सांभाळ तू
ना कशाची खातरी..सांभाळ तू
संकटांची वादळे घोंगावता
धीर-ज्योती अंतरी…सांभाळ तू
बंगला लाभेल ना लाभेलही
ही सुखाची ओसरी…सांभाळ तू
वाट हिरवाळीतुनी आहे जरी
खोल बाजूंना दरी… सांभाळ तू
सांत्वने येतील खोटी भेटण्या
आसवांच्या त्या सरी…सांभाळ तू
वाद..द्वेषा..मत्सरा.. दुर्लक्षुनी
बोलण्याची बासरी…सांभाळ तू
काम..घामावीण खोटा दाम रे
जी मिळे ती चाकरी…सांभाळ तू
भोग.. संपत्ती..न किर्ती..स्थावरे
आस ही नाही खरी…सांभाळ तू
खीर.. पोळी उत्सवांची भोजने
रोजची ही भाकरी…सांभाळ तू
लोक थट्टेखोर.. घेणारे मजा
वादळे मौनांतरी…सांभाळ तू
राहू दे स्वप्नात स्वप्नींची नभे
आपुली माती बरी…सांभाळ तू
सोबतीला वृध्द हे, सत्संग हा
या उबेच्या चादरी…सांभाळ तू
दुर्लभाचा लाभ..जाई हातचे
‘ठेव सारी’ तोवरी…सांभाळ तू
वेळ.. जागा …’घात’ ना पाहे कधी
आपुल्याही त्या घरी…सांभाळ तू
वाहता आजन्म तू धारांसवे
काठ हा आतातरी…सांभाळ तू
© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈