श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ अभंग… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
☆
तुझे बिंदुरूप
अनंताचा अंश
तुझिया डोहाला
अथांगाचा दंश
*
थोडी लौकिकाची
अलौकिक थोडी
आत्मकथेचीही
चाखावी गा गोडी
*
झुंझावीत कधी
दुजांचीही रणे
एकाच अंगणी
किती रणांगणे
*
साती सागरही
जावे तरंगून
आसवात एका
जावे गा बुडून
*
स्वप्न -राजवंश
राहो चिरंतन
एकाची गच्छंती
दुजा सिंहासन
*
फाटेल आभाळ
धराही दुभंग
तूच रचलेला
तारील अभंग!
☆
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈