श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ होणार काय आता… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
देहातल्या पशूंचा देहास त्रास आहे
जोवर इथे तयाचा चालूच श्वास आहे
*
इच्छा अनेक भारी आहेत माणसांच्या
झाला गुलाम त्यांचा माणूस खास आहे
*
स्वप्नात पाहतो ते हमखास होत जाते
जागेपणी मनाला होतोच भास आहे
*
दावीत धाक लोका आल्या परंपरेने
त्या आंधळ्या रुढींचा माणूस दास आहे
*
स्वर्गात जायचे तर देवास तू भजावे
धर्मांध माणसांची ही एक आस आहे
*
तू काल माळलेला गजरा सुकून गेला
केसात मोग-याचा मुरला सुवास आहे
*
अंधार घेउनी त्या आल्यात काळ राती
स्वातंत्र्य चोरण्याचा त्यांचा प्रयास आहे
*
होणार काय आता पुढचे पुराण आहे
लागून राहिलेला भलताच ध्यास आहे
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈