सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
कवितेचा उत्सव
☆ निरोप… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
(एका भारतीय सैनिकाच्या नववधूच्या भावना.. लग्नानंतर दोनच दिवसांनी तिचा पती कर्तव्यपूर्तीसाठी सीमेवर जायला निघाला आहे. ती त्याला सांगतेय…)
☆
हातात चुडा हा हिरवा
मी आताच होता भरला
अन् रंग मेंदीचा हिरवा
नुकताच लाल हा झाला
*
मी भाळावर रेखियेला
पूर्णचंद्र, सौभाग्याचा
या गळ्यात नाही रूळला
सर मणी मंगळसूत्राचा
*
शेजेवर विखुरलेला
हा गंध फुलांचा ताजा
ओठांनी कसा स्मरावा
निसटता स्पर्श तो तुझा.
*
कर्तव्याप्रतीची तव निष्ठा
ठाऊक आहेच मजला
पुसुनी क्षणात अश्रूंना
मी औक्षण केले तुजला
*
हा वीरपत्नीचा बाणा
मी अंगिकारला आता
तू सुपुत्र भारतभूचा
अभिमान तुझा तिरंगा
*
जोडून दोन्ही मी हाता
प्रार्थीन या भगवंताला
विजयश्री लाभो तुजला
रक्षावे मम सौभाग्याला.
*
भेटीची आस ही तुझ्या
क्षणोक्षणी माझिया मना
विजयाची तुझिया वार्ता
सुखवू दे मम गात्रांना.
☆
© सुश्री प्रणिता खंडकर
दिनांक.. १९/०३/२०२५
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈