श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ अप्सरा… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
☆
गवाक्षात तू प्रभात समयी, गुंफीत होती वेणी
मुखचंद्रावर मेघ दाटले, भास होतसे मनी
ओले कुंतल, बिंदू टपकती, जल सिंचन भुवरी
मन झुरते अन् तुला बघुनी कविता स्फुरे अंतरी ||१||
*
काजळ नयनी, कुंकुम भाळी, कर्णफुले साजरी
उभार वक्षावरी रुळतसे, मोत्यांची गळसरी
मंद वायुने आंचल ढळता, नजर होई बावरी
मन झुरते अन् तुला बघुनी कविता स्फुरे अंतरी ||२||
*
उषा रंगली तव गालावर, कमल उमलले जळी
तेज तनुचे पाहून लाजे, न्हालेली चांदणी
केशकलापी तुवा खोवली, पुष्पे नानापरी
मन झुरते अन् तुला बघुनी कविता स्फुरे अंतरी ||३||
*
लावण्याची लतीका भासे, भूवरची अप्सरा
तुला घडवतां ब्रम्हाचा ग, मूड लागला खरा
प्रसन्न वदना, चंचल नयना, दृष्टी फेक मजवरी
मन झुरते अन् तुला बघुनी कविता स्फुरे अंतरी ||४||
*
केशभुषा तव सरे साजणी, बघशी जव दर्पणी
भास होतसे तुला मनाशी, कुणी बघते चोरुनी
नागीण काळी घेऊन हाती, वक्षावर झटकिशी
वेणीसंगे मला गुंफिले, चतुराई तव कशी ? ||५||
☆
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈