श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ सांग दयाघन… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
☆
चहूबाजूंनी कानी पडती भयकंपीत चीत्कार
सांग दयाघन धरतीवर अवतार कधी घेणार
*
धडे घेतले विनम्रतेचे समतेचे बंधुत्वाचे
परस्त्री मातेसमान शिकलो तिजला वंदन करण्याचे
दानव होऊन मानव करतो पाशवी अत्याचार
सांग दयाघन धरतीवर अवतार कधी घेणार
*
रक्षाबंधन भाऊबीज हे उत्सव कोणासाठी?
बहिणी ओवाळिती उजळती मंगलमय ज्योती
वस्त्र खेचणाऱ्या हातांना कलम कोण करणार
सांग दयाघन धरतीवर अवतार कधी घेणार
*
विवाहिता कोवळी बालिका अथवा वृद्धा साठी ची
झडप तयांवर घालती लंघुन सीमालक्ष्मण रेषेची
आज आठवे शिवरायांच्या म्यानातील तलवार
सांग दयाघन धरतीवर अवतार कधी घेणार
*
पिता करी बळजोरी मुलीवर पुत्रही सामील
नरमादीचे नाते न जाणती श्वानच ते केवळ
दुष्ट वासनाकांड आरोपी सुळी कधी चढणार
सांग दयाघन धरतीवर अवतार कधी घेणार
*
हृदयामधी आक्रोश आणखी डोळयांमधि आसवे
मायबहीणींनी सांगा कुठवर दुःख निमुट सोसणार
या बलिदानामधून निश्चित रणरागिणी उठणार
निश्चित रणरागिणी उठणार
सांग दयाघन धरतीवर अवतार कधी घेणार
☆
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈