श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ एकच आता तुम्हा सांगतो☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

नका उभारू पुतळे अमुचे नकोच जयजयकार

तिथी,जयंती नकोच आता,नको स्वार्थाचा बाजार

खूप सोसले मूकपणाने नकोत कसलेही उपचार

नको आरत्या,नको भाषणे,नको फुलांचे हार

नकोच आता सत्याग्रहही सत्य कुठे उरले  ?

उपोषणाची नको नाटके खाणे अजीर्ण  झाले

मेळावे अन् सभा नको त्या नकोच कुठले धरणे

ध्येय  सोडूनी भरकटणारी नकोत आंदोलने

एकच आता तुम्हा सांगतो,नसलो जरी तुमच्यात

कणकण अमुचा झिजला होता या भूमीच्या सेवेत

आमच्यासाठी नका करू रे,विचार पुढचा करा जरा

इतिहासाच्या पानावरती लिहाल का मजकुर  खरा ?

स्वातंत्र्याच्या नावाखाली काय काय तुम्ही भोगियले

हक्क सांगता खुशाल  तुम्ही,कर्तव्या का विस्मरले ?

तुमच्या नंतर असतील  त्यांनी कुठे टेकवावा माथा  ?

काय सांगतील तुमची महती ,गातील का तुमची गाथा ?

क्षणभर थांबा,वळून  एकदा पहा तुम्हाला काय दिसे ?

वर्तमान हा भविष्य  घडवी काय  तुम्हाला ज्ञात  नसे ?

एकदाच रे विचार  करुनी एकदाच रे सत्य  वदा

असे वागणे निर्मिल  का गौरवशाली पुन्हा भारता ?

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments