मेहबूब जमादार
कवितेचा उत्सव
☆ बाप… ☆ मेहबूब जमादार ☆
बाप अथांग आकाश
बाप सागराची खोली
कोणी नाही मोजली
त्याच्या जीवाची काहिली
बाप पूनव चांदण
बाप रवी चा किरण
रात अंधारली तरी
प्रकाशतं त्याचं मन
दुःख आलं किती पोटी
मुखी हसू रिजवितो
सारं गेलं पाण्यात
तरी अश्रू लपवितो
येवो यश अपयश
तरी मातीशी झुंजतो
पायी फाटता चप्पल
अनवाणी तो फिरतो
झालं सागराचं दुःख
क्षणी पिऊन टाकतो
लेख सुखात राहावी
दिनरात तो चिंततो
त्याच्या लेकीला वाटे
सुखी राहो माझा बाप
दिन रात त्याच्या ठायी
पडो सुखाचंच माप
कष्टतो कुटुंबासाठी
काळजात जपे माया
घर भरून वाहते
त्याच्या असण्याची छाया
– मेहबूब जमादार
मु -कासमवाडी पो .पे ठ जि .सांगली
मो .9970900243
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈