सौ. विद्या वसंत पराडकर

?विविधा ?

☆ महिला दिना निमित्त – स्त्री शक्तीला मानाचा मुजरा ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

(नमस्कार रसिकहो! जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव करून भारतीय स्त्रीशक्तीला प्रस्तुत लेखाद्वारे मानाचा मुजरा प्रदान करीत आहे.)

भारतीय संस्कृतीत ‘स्त्रीला’ अनन्य साधारण स्थान आहे. पुरातन काळापासून आजच्या अत्याधुनिक युगापर्यंत ती ‘शक्ती देवता’ म्हणून ओळखल्या जाते.  ती मांगल्य, सुचिता, पावित्र्य यांची मूर्ती आहे.  प्रेम, वात्सल्य, ममता यांची कीर्ती आहे.  नररत्नांची खाण आहे. कुटुंबाची शान आहे. समाजाची मान आहे.

आजची स्त्री उच्चविद्याविभूषित आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती आपल्या कर्तव्य कर्मात उभी आहे.  चूल व मूल ही दोन्ही क्षेत्रे सांभाळून तिने आर्थिक बाजूही सांभाळली आहे.  खरेच कुटुंबाची ती ‘कणा’ आहे. स्वाभिमान,अस्मिता हा तिचा बाणा आहे.  जवळ जवळ सर्वच क्षेत्रे तिने आज पादाक्रांत केली आहे.  केवळ पृथ्वीवरच नव्हे तर अंतराळात जाणारी भारतीय पहिली स्त्री कल्पना चावला हिने हा मान मिळविला आहे.

स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या.  प्रतिभाताई पाटील यांनी पहिल्या राष्ट्रपती पदाचे स्थान भुषविले आहे. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे असेल तर स्वाती महाडिक व सुप्रिया म्हात्रे यांचे देता येईल.  तसेच अगदी अलीकडे अंतराळात गेलेली भारतीय महिला म्हणजे शिरीष बंदला ही होय.

स्त्रीचे महत्व हे नदीसारखे असते. म्हणून केवळ प्रसंगोचित तिचा उदो उदो न करता नेहमीच तिला शाश्वत मानबिंदू देणे समाजाचे कर्तव्य नव्हे का?  कोणत्याही विकृत भावनेला बळी न पडता समाजाने तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे.  या नवीन दृष्टिकोनाचे पालन केल्यास आज आपण समाजात तिचे भेसुर, भयान, निंदास्पद अपमानकारक चित्र बघतो ते मिटविण्यास मदत होईल.  स्त्री एक आदर्श माता आहे. याचा अंगीकार केल्यास जिजाबाई ला शिवबा निर्माण करता येईल.  नव्या युगाला औरंगजेबाची गरज नसून शिवबाची नितांत गरज आहे.  शिवरायाचा आदर्श व आदर म्हणजेच स्त्रीत्वाचा गौरव होईल व स्त्रीत्वाचा गौरव हाच तिला केलेला  मानाचा मुजरा होईल. म्हणूनच कवी म्हणतो,

| मूर्तिमंत लक्ष्मी तू घरादारांची

     कुशल अष्टपैलू मंत्री तू जीवनाची

    शिल्पकार तू नवनिर्मितीची

     खाण असे तू नररत्नांची |

  | दुर्गा असे तू जीवन संघर्षाची

    कालिका भासे तू रौद्ररुपाची

    राणी असे तू स्वातंत्र लक्ष्मीची

    संगम देवता तू शक्तीयुक्तीची |

  | ढाल असे तू कुटुंब देशाची

    प्रतिकाराच्या तलवारीची

    कीर्तिवंत तू कर्मभूमीची

    सदा वंदनीय तू युगायुगांची |

या स्त्रीच्या यशोगाथेचा गौरव करून माझ्या लिखाणाला पूर्णविराम देते

 

© सौ. विद्या वसंत पराडकर

पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments