श्री उमेश सूर्यवंशी

? विविधा ?

☆ भेटवस्तू… ☆ श्री उमेश सूर्यवंशी 

भेटवस्तू… किती गोड आणि आनंददायक शब्द आहे. कुणालाही भेटवस्तू हा शब्द नक्कीच आवडणार. मानवी मनांत चांगल्या कामाकरता शाबासकी म्हणून आणि प्रोत्साहन म्हणून भेटवस्तू देण्याची स्तुत्य परंपरा आहे. लहान मुलामुलीना जितका आनंद या भेटवस्तूने होतो तितकाच आनंद तरुणाला आणि वृध्दांना देखील होतो हे सत्य आहे. भेटवस्तू या शब्दाचा अर्थच मुळी एक विशिष्ट जाणीव मनामध्ये पेरत असतो.

भेटवस्तू…,आनंदाचा ठेवा आहे, समाधानी तृप्ती आहे, प्रोत्साहनाची  शाबासकी आहे. भेटवस्तू   घेताना फारशी नियमावली नसतेच मुळी. कारण भेटवस्तू नाकारण्याची अपवादात्मक उदाहरणे वगळता सर्वत्र भेटवस्तू स्विकारण्याचा पायंडा असतो. याचकरीता मग भेटवस्तू म्हणून काय दिले पाहिजे याची योग्य जाणीव झाली पाहिजे.बरेचदा अनेक स्पर्धात भेटवस्तू म्हणून लहान मुलांना विशिष्ट खेळणी, स्त्रीयांना गृहोपयोगी वस्तू, तरुणाईला फॕशनेबल वस्तू आणि वृध्दांना उपयोगी पडणारी वस्तू निवडतात. एका अर्थाने यामध्ये गैर काहीच नाही. या प्रत्येक वस्तुमागे आनंद हा नक्कीच मिळतो. परंतु या भेटवस्तू मनुष्याला कितपत प्रोत्साहन देतात याविषयी वाजवी शंका उपस्थित केली पाहिजे. शाबासकी याचा अर्थ केवळ पाठीवर थाप अशी नसावी तर मेंदूला चालना अशी असली पाहिजे. मतभेदाला वाव ठेवून इथे एक विचार प्रसूत करतोय. तो असा की, कोणत्याही वयोगटाला त्याच्या पुढील आयुष्यात आनंद, गृहोपयोगी, फॕशनेबल आणि उपयोगी अशा भेटवस्तू देताना…एक चांगले पुस्तक हाच पर्याय उपलब्ध असावा. पुस्तक मनुष्याचे मस्तक घडवते. अनेकजण आजकाल हा पायंडा जपताय हे स्तुत्य आहे.लहानांसाठी बालकथेची आणि थोरामोठ्यांची चरित्रे, स्त्रीकरता गृहोपयोगी आणि स्त्रीवादी साहित्य, तरुणाईकरता वैचारिक व ललित साहित्य, वृध्दाःकरता करमणूक करणारे व इतर साहित्य दिले तर आनंद व प्रोत्साहन याचबरोबर मेंदूचा योग्य व्यायाम घडू शकतो. पुस्तके ही भेटवस्तू कोणत्याही कार्यक्रमाचा पहिला योग्य पर्याय असतो याची जाणीव व्हावी.

आजकाल कोण वाचतय ? हे नकारात्मक पालूपद आळवण्यात अर्थ नाही. पुस्तकासारखी भेटवस्तू केवळ त्याच व्यक्तीला नव्हे तर त्याच्या सानिध्यातील अनेकांच्या हिताची कृती घडवण्यात एक योग्य भुमिका बजावत असते. याचा अर्थ पुस्तकाची भेटवस्तू केवळ वैयक्तिक आनंदाचा, समाधानाचा, तृप्तीचा व प्रोत्साहनाचा भाग होणार नसून तो काही सार्वत्रिक पातळीवर आनंद, समाधान, तृप्ती व प्रोत्साहन पेरत असतो. मानवी जीवनात सामुदायिक हिताची ही कल्पना कृतीत येणे हीच… मनुष्याने मनुष्याला द्यावयाची खरी भेटवस्तू आहे.

©  श्री उमेश सूर्यवंशी

मो 9922784065

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments