श्री सचिन वसंत पाटील

? विविधा ?

☆ खरं प्रेम… ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

माणूस जन्मल्याबरोबर पहिलं प्रेम अनुभवतो ते म्हणजे आईचं. इथून पुढे प्रेम नावाची अडीच अक्षरे आयुष्यभर आपली साथसोबत करतात. स्त्रीची पुरुषाबरोबर प्रियकर प्रेयसी सोडून पंचवीस-तीस नाती आहेत. पण रस्त्याने एखादी जोडी बोलत निघाली की आपण उगी कुजबुज करीत रहातो. प्रेम अनेक प्रकारचं असतं पण आपण एकाच प्रेमाला धरून बसतो. ही आपल्या कमकुवत समाजाची मानसिकता आहे.

जशी पोटाची भूक असते तशीच प्रेमाचीही भूक असते हे आपण विसरून जातो. माणसाला आयुष्यात सगळं काही मिळालं आणि प्रेम नाही मिळालं तर त्याचं जीवन यशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. प्रेम श्रीमंताचं असतं तसंच गरीबाचंही असतं. प्रेम राजाचं असतं तसंच शिपायाचंही असतं आणि भिका-याचंही प्रेमच असतं. थोडक्यात प्रेम कुणाचं कुणावरही असतं. जीवनात येऊन ज्यानं प्रेम केलं नाही त्यानं जीवनात येऊन काहीच केलं नाही असं म्हणता येईल. प्रेम आहे म्हणून तर या जगातला प्रत्येक माणूस एकमेकांशी बांधला गेला आहे. प्रेमच असा एक धागा आहे जो प्रत्येक जीवमात्रात गुंफला गेला आहे.

काॅलेज वयातलं प्रेम खूप वेगळं असतं. एखाद्या कसबी शिल्पकाराने मुर्तीला घाटदार कोरीव बनवत जावे तसा नुकत्याच वयात आलेल्या पोरीचा उमलत फुलत येणारा तो दैवी आकार. खरोखरच निसर्गाची किमया अफाट आहे. एखाद्या लहान शेंबड्या पोरीची घडत जाणारी सुंदरी बघत रहावी वाटते. त्रयस्तपणे पहाताना अँजेलोच्या अर्धवट गुढ पेंटींगची सर तिला येईल का? की मोनालिसाच्या गुढहास्य चित्रासारखं तेही गुपितच राहील कुणास ठाऊक? या सगळ्या कलाकृती निसर्गाने मानवाकडून करून घेतलेल्या. एका पोरीची बनलेली सुंदरी हीसुद्धा एक कलाकृतीच. आपोआप घडलेली. कुणाच्या मनात असो कुणाच्या मनात नसो न सांगता सवरता केलेली.

कधी कुरणात मोराचं नाचणं बघतो. प्रियेसाठी त्याचा तो नाच बघण्यासारखा असतो. कुठे बागेत फांदीवर चिमणा चिमणीशी गुलगुल करीत असतो. हिरव्यागार वनराईच्या कुशीत कुठेतरी दाट गवतात एकमेकाला घट्ट मिठी मारून विहार करणारी सापाची जोडी पाहिली की मन व्याकुळ होतं. स्वप्नातल्या जोडीदाराला हाका घालीत राहातं. धनुकलीनं कापूस पिंजावा तसं अंगातला कण नि् कण कुणीतरी पिंजत राहातं. मग एखादी गोरीगोमटी दिसली की मन तिच्यापाठी धावतं. तिचा एखादा नेत्रकटाक्ष झेलण्यासाठी अतुर होतं. नकळत मनातल्या जोडीदाराच्या स्वप्नांना खतपाणी घातलं जातं. एखादी हसून बोललीच तर हीच माझी प्राणसखी असं वाटत राहातं. आतापर्यंत आपण हिलाच तर शोधत होतो. कुठं लपली होती ही? परत एकदा स्वप्नांचं पीक तरारून येतं. पण तात्पुरतंच. पुन्हा मनाला संस्कारांचा दोरखंड लावला जातो. आपल्याला शिकलं पाहिजे. घराचं दैन्य कमी केलं पाहिजे हा विचार मनाला भरकटू देत नाही.

शेक्सपियरच्या प्रेमात प्रश्न नसतात मग तुमच्या माझ्या प्रेमात का येतात? फक्त प्रश्न… पण त्याची उत्तरं कुठं आहेत? गंगेची गंगोत्री तशी प्रश्नांची गंगोत्री. एक करंगळीभर पाण्याची धार… पुढे पाण्याचा विशाल सागर. एक गुंता मग सगळी मनाची गुलाबी गुंतागुंत… कुमार वयात मनाला न सुटणारे प्रेमळ प्रश्न…. या प्रश्नांची उत्तरे कोण देईल?

वि. स. खांडेकरांची ‘पहिलं प्रेम’ कादंबरी वाचली त्यावेळी पण असंच वाटलं, प्रेम हे खोटंच असतं, मग ते पहिलं असुदे अगर दुसरं. या जगातील स्वार्थी माणसं या प्रेमाचा तेवढीच मजा किंवा टाईमपास म्हणून उपयोग करीत असावीत. पण या जगात खरं प्रेम आहे बरंका. राधा-कृष्णासारखं आणि कृष्ण-मिरेसारखं सुद्धा प्रेम आहे. अाणि बायको बर्फासारखी पडली असताना तिच्यावर बलात्कार करणारेही या समाजात आहेत. पण हातावर बोटं मोजण्याइतकं का होईना खरंच खरं प्रेम आहे. मला एवढंच समजलं जे प्रेमासाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जगतात बाकी सगळे जगायचं नाटक करतात.

काय होतं, ज्यावेळी आपल्या मनातील प्रेमाला खुरडत जगावं लागतं त्यावेळी खुरडत जगायचीच त्याला सवय लागते. असं जगणं म्हणजेच जीवन असाच एक समज होतो. तोच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाहिला जातो. हा भार आपण निर्विकारपणे वाहत असतो. आपण खऱ्या प्रेमाला मनाच्या कोनाड्यात दाबून टाकतो. मग जगणं आणि खरं जीवन यांची ताटातूट होते. अशा तर्‍हेने खरं जीवन आपण कधी जगतच नाही. खरं प्रेम कुणावर कधी करतच नाही. खरं प्रेम खूप थोडे लोक करतात हे प्रेम या गुलाबी अक्षरामागे दडलेलं एक सत्य आहे. ते तुम्हाला नाकारता येणार नाही… मला नाकारता येणार नाही… कुणालाच नाकारता येणार नाही..! पण तरीही खरं प्रेम खर्रच आहे हो..!!

©  श्री सचिन वसंत पाटील

कर्नाळ, सांगली. मोबा. ८२७५३७७०४९.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments