श्रीमती उज्ज्वला केळकर

? विविधा ?

☆ उदे ग अंबे उदे  भाग १ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

अश्विन महिना लागला, की शुद्ध प्रतिपदेपासून  नवमीपर्यंत नऊ दिवस, आणि हो, नऊ रात्रीसुद्धा नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू होते. नवरात्रोत्सव हा देवीचा उत्सव. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर अखील भारतातील देवीस्थाने गजबजून जातात. देवीच्या मंदिरातून श्रद्धाळू भाविकांची अपार गर्दी उसळते. ‘उदे ग अंबे  उदे’  म्हणत देवीच्या उदयाची आकांक्षा बाळगली जाते. तिला आवाहन केलं जातं.

आदिशक्तीच्या मातृस्वरुपाला अंबा,  जगदंबा़, किंवा अंबाभवानी म्हणतात. याच शक्तीने, प्रकृतीने,  निर्गुणाला चेतवून अखंड ब्रह्मांडाची निर्मिती केली. तीच जन्मदात्री,  धात्री, पालनकर्ती आणि रक्षणकर्तीही. हीच महालक्ष्मी,  महासरस्वती,  महाकाली या रुपांनी त्रिविध आणि त्रिगुणात्मक बनते. तिची नाना रुपे आहेत. तिला नाना नावांनी ओळखले जाते. तिची स्थाने जशी अनेक आहेत, तशीच तिच्याठायी मानवी मनाने वेगवेगळी सामर्थ्ये कल्पिली आहेत. भवानी,  रेणुका,  चामुंडा,  शांतादुर्गा,  पद्मावती, संतोषी, जोगेश्वरी,  शाकांबरी  ही त्यापैकीच काही नावे.

महालक्ष्मी हे जगदंबेचेच एक रूप आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर,  मुंबई,  केळशी,  आडिवरे, कुडाळ, वाई इ. ठिकाणी महालक्ष्मीची मंदिरे आहेत,  तथापि कोल्हापुरातील महालक्ष्मीच्या स्थानाचे महात्म्य खूप आहे. तिच्या नावाने पिठा-मिठाचा जोगवा’ मागत कोल्हापूरला जाताना भाविक महिला म्हणतात,

‘कोल्हापूरवासिनी ग अंबे दे दर्शन मजसी

तुझ्या कृपेने जाती लयाला पापांच्या राशी’

आपल्याला पिठा-मिठाचा जोगवा’ सत्वर’ घालायला ती सांगते. कारण तिला दूरवर कोल्हापूरला जायचय. देवीला बांगड्या,  हार-गजरे अर्पण करायचेत. साडी-चोळी नेसवून खण-नारळाने तिची ओटी भरायचीय. ती सौभाग्याची देवता आहे,  असा स्त्रियांचा विश्वास आहे. लोकमानसात हे विचार,  संस्कार,  श्रद्धा,  भावना खूप खोलवर रुजलेल्या आहेत.

कोल्हापूरवासिनी अंबाबाई, हे पार्वतीचं रूप, की लक्ष्मीचं, याबद्दल अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. पुराणकथा व अन्य ग्रांथिक आधार बघितले, तर ती शिवाची पार्वती आहे, तसेच विष्णूची लक्ष्मीही आहे, असे सांगणार्‍या कथा आपल्याला वाचायला मिळतात.

कोल्हापूर हे आद्य आणि महत्वाचं शक्तिीपीठ आहे. महत्वाच्या साडेतीन पीठातील ते पहिले महत्वाचे पीठ. या शक्तिपीठांबद्दल अशी कथा सांगितली जाते, की दक्ष प्रजापती आणि असिक्वीनी यांना जगदंबेच्या वरदानाने सती नावाची एक सर्वज्ञ व अवतारी कन्या झाली. तिने शंकराशी विवाह केला. दक्षाला ते पसंत नव्हते. पुढे दक्षराजाने एक यज्ञ केला. त्यात सतीचा अपमान झाला, म्हणून तिने यज्ञवुंâडात उडी घेतली. त्यामुळे शंकर संतप्त झाला. त्याने यज्ञकुंडातून अर्धवट जळलेले निष्प्राण शरीर बाहेर काढले व ते खांद्यावर टाकून त्याने तांडव सुरू केले. त्यामुळे सगळी पृथ्वी भयभीत झाली, तेव्हा नारायणाने शिवालायातून बाहे काढण्यासाठी आपल्या सुदर्शन चक्राने व धनुष्यबाणाने मागच्यामागे सतीच्या देहाचे अवयव तोडण्यास सुरुवातकेली. या पवित्र देहाचे अवयव पृथ्वीवर १०८ ठिकाणी पडले. तिथे  तिथे शक्तिपीठे निर्माण झाली. कोल्हापूर (किंवा  पूर्वी यालाच करवीर नगरी म्हणत) इथे सतीच्या हृदयापासूनचा वरचा भाग पडला. सर्व अवयवात मस्तक हे प्रधान,  त्यामुळे सर्व शक्तिीपीठात कोल्हापूर हे सर्वोच्च व आद्य शक्तिपीठ मानले जाते. दुसरे शक्तिपीठ म्हणजे तुळजापूरची भवानी. तिसरे म्हणजे माहूरची रेणुका व अर्धे पीठ म्हणजे वणीची सप्तशृंगनिवासिनी.

कोल्हापूरवासिनी अंबाबाई, हे लक्ष्मीचं, रूप आहे,  असं सांगणारी कथाही पुराणातआहे. एकदा काश्यपऋषी यज्ञ करत असताना, त्याचा हविर्भाग कुणाला अर्पण करणार असे नारदाने विचारले,  असता कोणती देवता यासाठी योग्य, असा विचार सुरू झाला. मग ते ठरण्याची जबाबदारी भृगु ऋषींवर टाकण्यात आली. ते प्रथम ब्रह्मलोकी गेले. नंतर कैलासावर शंकराकडे गेले, पण या दोघांनीही त्यांची दखल घेतली नाही. ते रागावून वैकुंठाला गेले. तिथेही विष्णू-लक्ष्मी बोलत होते. त्यांचे  काही भृगुऋषींकडे लक्ष गेले नाही. ते संतापले आणि  त्यांनी विष्णूच्या छातीवर लाथ मारली. पुढे विष्णुचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांनी ऋषींचे स्वागत केले आणि म्हणाले, ‘आपल्यासारख्या महात्म्याचे दर्शन मोठ्या पुण्याईने होते. माझ्या खडकासारख्या छातीवर लाथ मारल्याने आपले पाऊल दुखावले तर नाही ना?  बोला मीआपले काय प्रीयकरू?’ त्यांचा हा दिव्य भाव पाहून भृगुऋषींचा राग पळून गेला. त्यांनी आपल्या पावलाचे चिन्ह कायमचे छातीवर धारण करायला सांगितले व ते मृत्यूलोकी निघून गेले व तिथे जाऊन त्यांनी विष्णू हाच हविर्भागदेण्यासाठी योग्य आहे,  असे सांगितले. तेव्हापासून’ भक्तवत्सलांछन’ हे बिरुद विष्णूदेवाने अलंकाराप्रमाणे मिरवले आहे.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
4 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments