श्री अरविंद लिमये
विविधा
☆ ‘एक सजग प्रवासी..!’ ☆ श्री अरविंद लिमये ☆
आयुष्यात अनेक माणसे आपल्याला भेटतात. त्यातली बरीचशी चटकन् विसरली जातात. अगदी मोजकीच दीर्घकाळ स्मरणात रहातात. क्वचितच कुणी असं असतं जे अगदी क्षणार्धात जवळून निघून गेले तरी त्याची सावली आपल्याला चिकटून बसावी. माझ्या आयुष्यात विविध व्यक्तीरेखांमधून मला भेटत राहिलेली कलाक्षेत्रातील अशी एक व्यक्ती म्हणजे डाॅ. श्रीराम लागू!
त्यांची मराठी नाटके, त्यातल्या त्यांच्या अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक या तिन्ही महत्त्वाच्या भूमिका, गुजराथी नाटके आणि त्यांच्या भूमिका असलेले असंख्य हिंदी-मराठी चित्रपट हा त्यांच्या कलाक्षेत्रातील पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासवाटेचा विस्तृत पट! एक रसिक म्हणून माझ्या जडणघडणीत वेगवेगळ्या टप्प्यांवर डाॅ. लागूंच्या अनेक भूमिकांनी मला प्रभावितही केलेलं आहे !
त्यांचा मी पाहिलेला ‘पिंजरा हा पहिला चित्रपट. आणि ‘नटसम्राट’ हे पहिले नाटक. या परस्पर वेगळ्या पण सकस आशयाच्या दोन्ही कलाकृतींनी नाटक-चित्रपटांकडे केवळ करमणूक म्हणून न पहाता आस्वादक म्हणून पहाण्याची नवी दृष्टी मला दिली होती हे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते!
नाटक ही त्यांची मनापासूनची आवड. पण ‘ती आपली फक्त आवडच नाही तर तो आपला श्वासच आहे’ हे त्यांना उत्कटतेने जाणवलं ते खूप नंतर. हे जाणवण्याचा तो क्षणच त्यांच्या आयुष्याला नवं वळण देणारा तर ठरलाच आणि मराठी रंगभूमी आणि नाट्यरसिकांच्या दृष्टीने भाग्याचाही!
त्यांना चित्रकार व्हायची इच्छा. वडील स्वतः डॉक्टर. त्यांची इच्छा न् सल्ला प्रमाण मानून यांनी सायन्स साईडला पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधे प्रवेश घेतला. तिथे केमिस्ट्रीचे प्राध्यापक असणारे श्री. भालबा केळकर, आणि फर्ग्युसन ही डाॅ. लागूंसाठी नाट्यसंस्कार करणारी सुरुवातीची केंद्रेच ठरली!
बी. जे. मेडिकलच्या पहिल्या वर्षी केलेल्या एका नाटकामुळे लहानपणी मनात रुतलेली स्टेजची भीती अलगद निघून गेली. तिथल्या पाच वर्षांत लग्नाची बेडी, भावबंधन सारखी पाच नाटके आणि वीस एकांकिका त्यांनी केल्या. त्याकाळात त्यांच्यावर नानासाहेब फाटक, बाबूराव पेंढारकर, केशवराव दाते, मामा पेंडसे असे दिग्गज, तसेच अत्रे, गडकरींची नाटके, प्रभातचे चित्रपट, वाचनाची आवड रुजवणारे साने गुरुजी, य. गो. जोशी, फडके-खांडेकर यांचे साहित्य यांचा प्रभाव होता. त्यातून विकसित होत जाणारी त्यांची अभिरुची पुढे पु. शी. रेगेंच्या कविता आणि जी. ए. कुलकर्णींच्या कथांनी अधिक समृध्द केली. ब्रेख्तच्या नवनाट्यशैलीने त्यांना नाटकाकडे पहाण्याचा वेगळा दृष्टीकोन दिला.
पुण्यात ई एन टी सर्जन म्हणून प्रॅक्टीस सुरु केल्यानंतर मनाच्या विरंगुळ्यासाठी एक हौस, आवड म्हणून सुरु झालेल्या सुरुवातीच्या प्रवासवाटेवरची नाटकेही रुढ वाट सोडून वेगळ्या वाटा शोधणारी होती याची साक्ष देतात ‘वेड्याचं घर उन्हात’ ‘गिधाडे’, ‘आधे-अधुरे’ ही नाटके!
पुढे वैद्यकीय अनुभवासाठी ते न्यूझीलंड, लंडनला गेले तेव्हा अभ्यासूवृत्तीने पहाता आलेल्या पाश्च्यात्य रंगभूमीवरील अनेक नाटके व हाॅलीवूड चित्रपटांनी त्यांना प्रभावित केले !
त्यानंतर आफ्रिकेत वैद्यकीय व्यवसायासाठी स्थायिक झाल्यानंतर मात्र नाटकापासून ते खऱ्या अर्थाने दुरावले. नाटक हा आपला श्वास आहे हे त्या दुरावलेपणाच्या घुसमटीतून त्यांना तिव्रतेने जाणवू लागल्यानंतर त्या अस्वस्थेतून बाहेर पडण्यासाठी ‘यापुढे आपण फक्त नाटकच करायचे’ हे ठामपणे ठरवून तिथले तीन वर्षांपासूनचे स्थैर्य सोडून ते स्वदेशी परतले. आतल्या आवाजाला तत्पर तरीही विचारपूर्वक दिलेला त्यांचा प्रतिसाद त्यांची निर्णयक्षमता आणि सजगता ठळकपणे अधोरेखित करणारा ठरतो. आणि या वळणावर सुरु होतो त्यांचा व्यावसायिक रंगभूमीवरचा प्रवास!
इथे आल्यानंतर सहा महिन्यांचा दीर्घकाळ प्रतिक्षा केल्यानंतर त्यांना पहिले व्यावसायिक नाटक मिळाले ते ‘इथे ओशाळला मृत्यू’ !
कदा व्यवसाय म्हणून नाटकच करायचे हे ठरले की तडजोडी आल्याच. पण डाॅक्टरांचं वैशिष्ट्य हे की त्यावेळी प्रभाकर पणशीकरांच्या नाट्यसंपदेचे काशिनाथ घाणेकरांनी मतभेद होऊन सोडलेले ‘इथे ओशाळला मृत्यू’ हे नाटक जेव्हा मिळाले तेव्हाही ते त्यांनी गरज असूनही हव्यासाने स्विकारले नाही तर स्वतःच्या अटींवरच स्विकारले. काशिनाथ घाणेकरांनी पूर्वी स्टाईलाइज्ड पध्दतीने केलेली आणि प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिलेली संभाजीची भूमिका त्याच पध्दतीने साकारण्याचा सोपा मार्ग न स्विकारता स्वतःच्या अभ्यासू, चौकस आणि चिकित्सक पध्दतीने सखोल विचार करुन त्या व्यक्तीरेखेला त्यांनी वेगळा आयाम दिला. दिग्दर्शकाशी चर्चा करुन संभाजीच्या भूमिकेला त्यातल्या मूळ रंगातल्या भडक छटा कांहीशा सौम्य करीत त्या व्यक्तीरेखेच्या प्रवासाचा नैसर्गिक आलेख निश्चित केला. त्यानंतर लगेच आले ते सुरेश खरे लिखित ‘काचेचा चंद्र’ हे नाटक. या नाटकातील खलनायकी व्यक्तीरेखेच्या क्रूरपणात त्यांनी मुरवलेला थंडपणा प्रेक्षकांच्या अक्षरशः अंगावर येणारा असायचा. माफक अल्पाक्षरी संवादांना भेदक नजरेची साथ देत जिवंत केलेला त्यांचा खलनायक हा तोवरच्या खलनायकांच्या रुढ प्रतिमांना छेद देणारा होता!
च्या सर्वच नाटकांचा आणि भूमिकांचा विस्तृत आढावा इथे अपेक्षित नाही न् शक्यही नाही. हा वेध आहे आयुष्य असो वा कलाक्षेत्र या दोन्ही प्रवासावाटांवरील प्रत्येक टप्प्यावर विचारपूर्वक निर्णय घेताना प्रत्येकवेळी त्यांनी दाखवलेल्या सजगतेचा! हा धागा मनात ठेवून त्यांच्या नाटकांची ‘अग्निपंख’ ‘आकाश पेलताना’ ‘आत्मकथा’ ‘गुरु महाराज गुरु’ ‘दुभंग’ ‘पप्पा सांगा कुणाचे’ ‘प्रतिमा’ ‘प्रेमाची गोष्ट’ ‘नटसम्राट’ ‘हिमालयाची सावली’ ‘कस्तुरीमृग’ ही प्रतिनिधिक नावे जरी पाहिली तरी त्यांची नाटके स्विकारण्यातली सजगता आणि त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिकांचा आवाका नक्कीच प्रकर्षाने जाणवेल. रंगभूमीवरील त्यांच्या प्रवासाची ही दिशा त्यांचं नाटकावरील प्रेम तर दर्शवतेच आणि ते कसे डोळस होते हेही !
नाटकांबरोबरीनेच पुढे पिंजरा, सामना, सिंहासन, मुक्ता, सुगंधी कटृटा, देवकीनंदन गोपाला अशा अनेक चित्रपटांनी त्यांच्यासाठी रेखलेल्या मराठी चित्रपटसृष्टीतील प्रवासवाटेने त्यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीची दारे खुली तर केलीच आणि तिथे त्यांचे उत्स्फुर्त स्वागतही झाले!
तिथे सरसकट सगळ्याच भूमिका रुढ अर्थाने दुय्यमच असल्या तरीही अगदी तद्दन व्यावसायिक चित्रपटातल्या अशा छोट्या व्यक्तीरेखांमधल्यासुध्दा खास रंगछटा शोधून त्यांनी त्या व्यक्तिरेखा लक्षवेधी बनवून हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे खास स्थान निर्माण केले होते. त्यामुळेच कांही वेगळे, कलात्मक चित्रपट आकाराला येत असताना त्यातील महत्त्वाच्या भूमिकांसाठी सुजाण दिग्दर्शकांनी डाॅ. लागूंचीच आवर्जून निवड केली होती. गांधी, कस्तुरी, गहराई, सौतन, गजब, घरौंदा सदमा, सरफरोश, अनकही यासारख्या इतरही मुख्य प्रवाहाबाहेरच्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका याची साक्ष देणाऱ्या ठरतील.
नाटक आणि चित्रपटक्षेत्रतील प्रदीर्घ वाटचालीत फिल्मफेअर न् कालिदास सन्मानासारख्या असंख्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानीतही केलेले आहे.
हिंदी चित्रपटातील कारकिर्द अशी दिमाखात सुरू असताना शूटिंगच्या सलग तारखांमुळे त्यांना जवळजवळ अडीच वर्षे एकही नाटक करता आलेले नव्हते. याबद्दलची अस्वस्थता जशी वाढत गेली तेव्हा पुन्हा एकदा योग्य आणि खंबीर निर्णय घेण्याचा कसोटी पहाणारा क्षण पुढे उभा ठाकला. त्याक्षणीही अंगभूत सजगतेने त्यांनी आतल्या आवाजाला दिलेला प्रतिसाद खरोखरच कौतुकास्पद होता. डॉक्टर लागूनी त्या क्षणी तथाकथित यश, प्रसिद्धी आणि पैसा यांच्या मोहात न अडकता शनिवार-रविवार हे आठवड्यातले दोन दिवस शूटींगसाठी तारखा न देता ते खास मनासारखी नाटके करता यावीत म्हणून राखून ठेवायचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर त्या तारखांचा वापर व्यावसायिक नाटकांसाठी न करता त्या स्वतःच्या ‘रुपवेध’ या संस्थेतर्फे छबीलदासच्या छोट्या रंगमंचावर करायच्या अनेक प्रायोगिक नाटकांसाठी राखून ठेवल्या. त्यांच्या ‘गार्बो’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’, उध्वस्त धर्मशाळा, अॅंटिगनी अशी व्यावसायिक विचार बाजूला ठेऊन केलेल्या नाटकांनी प्रायोगिक रंगभूमी निश्चितच समृध्द केली आहे!
हे सगळं करीत असताना समाजाबद्दलची कृतज्ञता म्हणून ते अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीशी जोडले तर गेलेच आणि त्या समाजाभिमुख कार्यासाठी निधी उभा करण्याकरता ‘सामाजिक कृतज्ञता निधी’च्या माध्यमातून खूप पूर्वी गाजलेली एकच प्याला, लग्नाची बेडी यासारखी अनेक नाटके, विना-मानधन काम करणारे अनेक प्रसिध्द कलाकार सोबत घेऊन लोकांपर्यंत पोचवली. अशा कलाकारांची मोट बांधून प्रत्येक नाटक कष्टपूर्वक बसवून मर्यादीत प्रयोग संख्येचे उद्दिष्ट गावोगावचे अथक दौरे करुन पूर्ण होताच लगोलग दुसऱ्या नाटकाकडे वळणे सहजसोपे आणि सहजसाध्य नव्हतेच. आणि तरीही केवळ सामाजिक कृतज्ञतेच्या जाणिवेने त्यांनी आपला संकल्प दृढ निश्चयाने तडीस नेला होता हे कौतुकास्पदच म्हणायला हवे.
त्यांच्या कलाक्षेत्रातील वाटावळणांचा हा धावता आढावा! समोर येणारं आयुष्य येईल तसं स्विकारुन जगत रहाणारे बरेचजण असतात. येईल ती परिस्थिती सजगतेने विचारपूर्वक स्विकारुन स्वतःची वेगळी वाट निर्माण करणारे मात्र मोजकेच असतात. आपला जीवनप्रवास सजगतेने करणाऱ्या अशा दुर्मिळ व्यक्तींपैकीच एक अशा डाॅ. श्रीराम लागू यांच्या कलाप्रवासातील सजग वाटचालीचा यथाशक्ती घेतलेला हा वेध माझ्यासाठी त्यांच्या नाटक-चित्रपटांइतकंच निखळ समाधान देणारा ठरलाय एवढं खरं!
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈