? वाचताना वेचलेले ?

☆ सुस्वागतम् की स्वागतम्?श्री अनिल कुमकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलु साबणे जोशी

हा अनुभव बारामतीतच नाट्यसंमेलनाच्या वेळी आला. त्या नाट्यसंमेलनाचा एक भाग म्हणून विद्याधर गोखल्यांच्या हस्ते कवी मोरोपंतांच्या प्रतिमेचे पूजन आयोजित केले होते. ठरलेल्या वेळी गोखले, जब्बार पटेल वगैरे प्रतिमा पूजनासाठी सिद्धेश्वर मंदिरामागच्या मोरोपंत स्मारकाच्या जागेत आले. त्या वेळी तो जुना वाडा होता. मोरोपंतांच्या खोलीची नि बाहेरची सजावट करण्याचे काम माझ्याकडे दिले गेले होते. मी बाहेर पताका वगैरे लावून रांगोळीने ‘सुस्वागतम्’ असा शब्द लिहून ठेवला होता.

गोखल्यांनी प्रतिमेचे पूजन केले. नंतर त्यांना ‘चार शब्द’ बोलण्याची विनंती केली गेली. गोखल्यांनी कवी मोरोपंतांबद्दल, स्मारकाच्या व्यवस्थेबद्दल गौरवोद्गार काढले. पण त्यानंतर मात्र “रांगोळी छान काढली आहे, पण मराठीच्या शुद्धलेखनाची किमान मोरोपंतांच्या बारामतीत तरी हेळसांड होऊ नये”, असे शब्द ऐकवले.

रांगोळीत “सुस्वागतम्” हा एकच शब्द होता. त्यात काय चुकले हे मला कळेना. शिवाय गोखल्यांनी ‘चार शब्द’ बोलताना जाहीरपणे हे सांगितल्याने काहीशी अपमानकारक स्थिती झाली होती. शेवटी त्यांनीच खुलासा केला.

“सुस्वागतम् या शब्दाचे मूळ ‘ग’ या संस्कृतमधील धातूमध्ये आहे. त्याला व्याकरणाच्या नियमानुसार ‘तम्’ हा प्रत्यय लागून गतम् असा शब्द बनतो. गतम् शब्दाला ‘आ’ हा उपसर्ग लागून ‘आगतम्’ असा शब्द बनतो. त्या आगतम् शब्दाला ‘सु’ हा आणखी एक उपसर्ग लागून तो शब्द ‘स्वागतम्’ असा बनतो. एकदा ‘सु’ हा उपसर्ग लावल्यावर पुन्हा ‘सु’ लावून “सु सु” का करता? ” असे त्यांनी बोलून दाखवले.

त्या वेळी सगळ्यांच्या समोर चूक काढल्यामुळे गोखल्यांचा मनातून राग आला होता. पण पुढे त्यातूनच व्याकरणाचा अभ्यास कमी पडतो आहे, हे जाणवले. माझ्या शुद्धलेखनाबद्दल नि मराठीच्या भाषिक प्रभुत्वाबद्दल कौतुकाचे शब्द अनेक वेळा ऐकायला मिळतात. त्याचे श्रेय कै. गोखल्यांचे आहे. त्यांच्यामुळेच मराठी, संस्कृत व्याकरणाचा अभ्यास नि गुजराथी, कानडी, बंगाली, उर्दू वगैरे लिपी शिकाव्या वाटल्या.  नाट्यसंमेलनाच्या वेळच्या या घटनेला आता निदान २५ वर्षे तरी झाली असतील. पण अजूनही व्याकरणाचा अभ्यास करावा वाटतो. हे सगळे गोखल्यांमुळे घडले. 🙂

 – श्री अनिल कुमकर

संग्राहिका : सुश्री सुलु साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments