श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “असाही एक हृदयस्पर्शी खटला”  – लेखक – अज्ञात ☆  प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

* सातारा न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला. * 

“ वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठा भाऊ मला संधीच देत नाही “ – त्या साठी लहान भावाने न्यायालयात मोठ्या भावाविरूद्ध दावा ठोकला…..

“ वयाची 90 वर्ष पार केलेल्या आईवडिलांना माझ्याकडे सुपूर्त करावे. मी ही त्यांचा मुलगा आहे. माझाही आईवडिलांना सांभाळण्याचा अधिकार आहे. माझ्या आईवडिलांची माझा मोठा भाऊ अत्यंत उत्तम प्रकारे गेली २५ वर्ष सेवा करत आहे. आता मोठा भाऊही वयस्कर झाला आहे. त्याला आता आईवडिलांना नीट सांभाळताना त्रास होईल. तेव्हा येथून पुढे मला आईवडिलांची सेवा करण्याची संधी द्यावी. आईवडिलांचे खुप प्रेम मोठ्या भावाच्या घराला मिळाले आहे. आता माझ्या मुलांनाही आजोबा आजीचा सहवास लाभला पाहिजे व आम्हाला आमच्या दैवताची सेवा करता आली पाहिजे. माझा मोठा भाऊ अत्यंत मोठ्या मनाचा आहे. त्याने आईवडिलांचा अत्यंत चांगला सांभाळ केला आहे. पण आता तोच थकला आहे. मला त्याचीही चिंता वाटते. त्याचीही सेवा मला करायची आहे. तेव्हा मला माझे आईवडील हवे आहेत.”…

…. आई-वडिलांना सांभाळण्यासाठी दोन्ही भाऊ कोर्टात भांडत आहेत, हा विलक्षण प्रकार आहे. आईवडिलांना न सांभाळणाऱ्या नालायक अवलादींच्या गालफडात लावलेली ही जबरदस्त चपराक आहे.

जजसाहेब तर चकीतच झाले. जेथे आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारा जमाना असताना तेथे ही श्रावणबाळे कशी जन्माला आली? जजला निकाल देता येइना. त्यांनी आई वडिलांनाच विचारले, ‘ आपली काय इच्छा आहे? ‘.. तेव्हा ते म्हणाले ‘ जजसाहेब आपणच सांगा काय ते. ’

…. तेव्हा जजने निकाल लहान भावाच्या बाजूने दिला. आईवडिलांना लहान भावाच्या ताब्यात दिले. तसा मोठा भाऊ धाय मोकलून रडू लागला. आईवडिलांना दुरावणार याचे त्याला खुप दु:ख झाले.

धन्य ते आईवडिल, ज्यांनी इतके उच्च संस्कार मुलांना दिले. या कलियुगात आईवडिलांना मारहाण करणारे जन्माला आले आहेत. आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे आय. आय. टी. इंजिनियर्स आहेत, सनदी अधिकारी व नोकरदार कर्मचारी आहेत, उच्चभ्रू डाॅक्टर्स आहेत. विशेष म्हणजे मुलांवर संस्कार घडवण्याची जबाबदारी असलेले शिक्षक शिक्षिका आहेत. कळस म्हणजे न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायाधिशांचे आई वडिल वृध्दाश्रमात आहेत. या देशात शिकून परदेशात नोकरी करणारे महाभाग आहेत. जे देशसेवा करायची सोडून परकियांचे नोकरदार झाले आहेत. परत आई वडिलांना विसरले आहेत. परदेशात ज्यांची मुले आहेत अशा कित्येकांची अवस्था निपुत्रिकांसारखी झालेली आहे. शेतकरी आत्महत्या करतात पण आईवडिलांना सांभाळतात. पण या शिक्षित, उच्चशिक्षित अवलादी पार बिघडल्या आहेत. कृतघ्न झाल्या आहेत. आईवडिलांच्या अंत्यविधीला या अवलादी हजर देखिल राहत नाहीत.

– – वरील घटना आजकालच्या बिघडलेल्या मुलांना बोध देणारी आहे. वृध्दाश्रमात झालेली वाढ ही भारतीय संस्कृतीची सर्वात मोठी अधोगती आहे.

लेखक : अनामिक 

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments