सौ अंजली दिलीप गोखले
वाचतांना वेचलेले
☆ ‘अध्यात्मिक रंग होळीचा…‘ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
☆
आध्यात्मिक रंग होळीचा 🟥🟧🟨🟩🟦🟪
एक दिवस भगवान कृष्ण मथुरेमधील एका रंगारीकडे गेले आणि त्याला म्हणाले की मलाही सर्वांचे कपडे रंगवायचे आहेत… मला ही एक रंगाची बादली देण्यात यावी… हा रंगारी कृष्णभक्तीत आधीच रंगला होता म्हणुन त्याने एक बादली रंगाची भगवंताला दिली…
ती बादली घेऊन भगवान कृष्ण मथुरेमधील एका चौकात उभे राहिले आणि जोरजोरात ओरडून म्हणू लागले की मी सर्वांची वस्त्रे रंगविण्याचे कार्य करीत आहे. ज्याला आपली वस्त्रे रंगवायची आहेत त्यांनी “फुकट” ही वस्त्रे रंगवुन घ्यावी. कोणताही मोबदला देण्याची गरज नाही… हळु हळु लोकांची गर्दी वाढु लागली. कोणी आपले धोतर… तर कोणी आपली साडी… कोणी आपले उपरणं… तर कोणी आपला सदरा देण्यास सुरवात केली. प्रत्येकाने आपला आवडता रंग निवडला. कोणी लाल… तर कोणी पिवळा… कोणी निळा तर कोणी गुलाबी… भगवंत प्रत्येकाची वस्त्रे बादलीत टाकत होता आणि ज्याला जो रंग हवा त्याच रंगात रंगवुनही देत होता.
असे करता करता संध्याकाळ झाली आणि लोकांची गर्दी कमी होण्यास सुरवात झाली. भगवान कृष्ण आपली बादली उचलुन निघणारच होते तेवढ्यात एक अत्यंत साधा पोषाख केलेला माणुस भगवंतासमोर हात जोडुन अत्यंत नम्रपणे उभा राहिला. तो म्हणाला माझे ही एक वस्त्र रंगवुन हवे आहे. भगवंताने पुन्हा रंगाची बादली खाली ठेवली आणि त्याला म्हणाले, दे तुझे वस्त्र… कोणत्या रंगात रंगवून हवे आहे…? ? तो साधा वाटणारा व्यक्ती म्हणाला… त्याच रंगात रंगवून दे जो रंग या बादलीत आहे. अरे कृष्णा… हे भगवंता… सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी बघतो आहे की तुझ्याजवळ बादली एकच आहे पण या बादलीमधून तू सर्व वेगवेगळे रंग काढतो आहेस. ज्याची जशी इच्छा तसा तुझा रंग… पण मला मात्र रंग तुझ्या इच्छेचा हवा आहे.
… कारण कदाचित माझा रंग हा स्वार्थाचा असेल पण तुझा रंग निःस्वार्थाचा आहे… माझा रंग अहंकाराच्या पुर्ततेचा असेल पण तुझा रंग समर्पणाचा आणि भक्तिचा आहे… माझा रंग व्यवहारिक आनंदाचा असेल पण तुझा रंग तर चैतन्याच्या अनुभूतीचा आहे…. म्हणून “जशी तुझी मर्जी तशीच माझी इच्छा”… तुझ्याशिवाय माझे काय अस्तित्व… तू आहेस तरच मी आहे, तु नाही तर मी नाहीच… म्हणून संतांनी लिहिले की….
उसी रंग में रहना रे बंदे,
उसी रंग में रंगना….
जिस रंग में परमेश्वर राखे,
उसी रंग में रंगना….! ! !
☆
लेखक : अज्ञात
संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈