श्री सुहास रघुनाथ पंडित

❤️ मनमंजुषेतून ❤️

☆ माधुकरी… — लेखक – श्री विकास वाळुंजकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

मौजीबंधनात अडकलेला गोडबोल्यांचा सुनील “ॐ भवती भिक्षांदेही” असे म्हणत समोर उभा राहिला. जेमतेम सात आठ वर्षाचा हा बटू. गोरापान. काळेभोर पाणीदार डोळे. छानपैकी चकोट केलेला. हातात दंड. दुस-या हातात झोळी. नेसणीला लंगोटी. गळ्यात जानवे. त्याचे हे रुपडे पाहून भिक्षांदेहीचा खराखुरा अनुभव दृष्टीसमोरून तरळून गेला.

असाच सातआठ वर्षांचा असेन. पित्याचे छत्र हरवलेले. काबाडकष्ट करून घाम गाळणाऱ्या आईपासूनही दुरावलेला. खूप खूप दूर गेलेला मी. व्यास गुरूकुल नावाच्या एका आश्रमात होतो.

ही गोष्ट असावी. १९५७ ते १९६१ या दरम्यानची. कोवळं वय. जग काय ? कशाचीच माहिती नव्हती. ॥ॐ भवती भिक्षांदेही॥ म्हणत दररोज दहा घरून प्रत्येकाने माधुकरी आणायची. अशी शिस्त होती आश्रमात. दुपारी बारा वाजता निघायचो. झोळीत ॲल्युमिनियमची ताटली, वाडगा असायचा. पंचा नेसलेला. दुसरा उपरण्यासारखा अंगावर घेतलेला. अनवाणीच जायचं. पहिलं घर होतं घाणेकरांचं. आजीआजोबा आणि मनावर परिणाम झालेला तरूण मुलगा. असं त्रिकोणी कुटुंब होतं ते. ॐ भवती म्हणताच घाणेकर आजी भाजीपोळी, आमटी, भात झोळीत घालायच्या.

तिथेच पुढे राहाणाऱ्या चित्तरंजन कोल्हटकरांच्या दारात उभा राहायचो. तिथेही अतिशय प्रेमाने भिक्षा मिळायची. पुढे महाजनांच्या घरात जिना चढून जायचो. दार उघडंच असायचं. त्यांच्या गृहिणीला ऐकू कमी यायचं. ताटकळत वाट पहात उभं राहावं लागायचं. त्या घरात भिंतीवर इंग्रजी कॅलेंडर व सुविचार लावलेले असायचे. भिक्षा मिळेपर्यंत त्यावरील स्पेलिंग पाठ करीत असे.

शेगडीवाले जोशी, गो.भा .लिमये, डाळवाले जोशी, आपटे रिक्षावाले, माई परांजपे आणि शेवट डाॅ. मोनॅकाका भिडे. अशी घरं मला नेमून दिलेली होती. या सर्व कुटुंबांतून  मिळालेले ताजे सकस पदार्थ आश्रमात घेऊन यायचे. मोठ्या पातेल्यातून ते ठेवायचे. नंतर मोठी मुलं वाढप्याचे काम करायची. वदनी कवळ म्हणत आम्ही त्या संमिश्र पदार्थांचा आस्वाद घ्यायचो.

दोन्ही वेळेस तेच पदार्थ. भिक्षांदेहीला प्रतिसाद देणारी ही सगळी घरं. सदाशिव पेठेत भिकारदास मारूतीच्या पिछाडीला होती. आज माहित नाही त्या घरांचं स्टेट्स काय आहे ते. पण या प्रत्येक घरातील प्रेमळ माणसं मनांत कायमची घर करून बसली आहेत माझ्या.

डाॅ. भिड्यांच्या घरात पाचपन्नास मांजरं होती. माझ्या मागोमाग तीही दारात यायची. शंभरीतल्या भिडे आजी मला आणि मांजरांना एकाचवेळी अन्नदान करायच्या. खूप गंमत वाटायची त्या घरात. गोभांच्या लिमये वहिनी तर सणावाराला थेट स्वयंपाकघरात बोलवायच्या. कधी पुरणपोळी, कधी जिलेबी, कधी शिरा खाऊ घालायच्या. म्हणायच्या, “बाळा. ताटात वाढलं तर हे गोडधोड तुला कसं मिळेल? ते तर वाटण्यावारी जाईल. बस खाऊन जा. ” वहिनींच्या त्या रूपात मला आईच भेटायची.

माई परांजपे तर वाट पहात बसायच्या. माधुकरी वाढल्याशिवाय जेवायचं नाही, असं व्रतच केलं होतं त्यांनी. ते घर मी कधीच चुकवीत नसे. आपटे रिक्षावाले म्हणजे त्या गल्लीतले समाजसेवकच होते. मुलं शाळेत पोचविता पोचविता त्यांची उडणारी धांदल. त्यांचं ते अंधारं दोन खोल्यांचं घर. नऊवारी साडीतल्या आपटे काकू. धुण धुताधुता लगबगीनं भिक्षा वाढण्यासाठी चालणारी त्यांची धडपड, माझ्या बाल मनावर कायमची कोरली गेली आहे.

भिक्षेच्या रुपाने मी समाजपुरुषच पाहात होतो. नियतीच्या रुपाने तो मला जगवत होता. संघर्ष शिकविणा-या या समाजपुरुषाचे दर्शन फारच अफलातून होते. असं माधुकरी मागणं आताशा दिसत नाही. त्यात गैर काहीच नव्हते.  चित्तरंजन कोल्हटकर हे नाट्यचित्रपट क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व  होते. हे पुढे खूप उशीराने कळले. पोटाचीच लढाई होती. त्यामुळे नाटक सिनेमा वगैरै असतं, हे कळण्यासारखी परिस्थितीच नव्हती. कोल्हटकरांची तारका पुढे एसपी काॅलेजला बरोबर होती. तेव्हा आपण किती थोर व्यक्तीच्या कुटुंबाशी जोडले गेलो होतो हे लक्षात आले.

भोजनाचे आश्रमातील प्रसंग नजरेसमोरून तरळत असतांनाच गोडबोल्यांचा सुनील “आजोबा. ॥ॐ भवती भिक्षांदेही ॥ वाढतां ना ? ” असं म्हणाला. मी ताळ्यावर आलो.

चुरमु-याचा लाडू त्याच्या झोळीत घातला. साठ वर्षापूर्वी हरवलेलं बालपण शोधत बाहेर पडलो. मंगल कार्यालयातून थेट घरी आलो.

(मित्रांनो हे सगळं शब्दश: खरं आहे बरं)

लेखक : श्री विकास वाळुंजकर

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments