??

☆ संग्रहालयाच्या बुरुजावरून ☘️ श्री रमेश जावीर 

सन १९९३ ते १९९७ पर्यंत मी रयत शिक्षण संस्थेच्या ठक्कर बाप्पा विद्यालय, गांधी टेकडी, मारूल हवेली, तालुका पाटण, जिल्हा सातारा येथे सहाय्यक शिक्षक म्हणून होतो. तेव्हा माझा होलिया काव्यसंग्रह व  वाजप कथासंग्रह प्रकाशित झाला होता .आणि मला काष्ट शिल्प निर्मितीचा छंद जडला होता. मी भाग शाळा, दिवशी मध्ये कार्यरत होतो. भाग शाळा दिवशीमध्ये मला पाठवण्याचे कारण कवी संमेलन, तसेच सामाजिक चळवळीत मी वरचेवर जात असे आणि माझ्या तिथल्या उपस्थितीबाबत वर्तमानपत्रातून बातम्या येत असत. ते आमच्या तत्कालीन मुख्याध्यापकांना आवडत नव्हते. भाग शाळा दिवशी ही ढेबेवाडीच्या खोऱ्यात होती. नागमोडी घाट, सागाची उंचच्या उंच झाडे, ग्रामीण भागात जनावरे राखणारी माणसे, विहरणारे पक्षी, दऱ्याखोऱ्यातून वाड्याबस्यातून शिक्षणासाठी आलेली मुले, हे वातावरण पाहून अध्यापन करायला मजा येत असे. माझा मुख्य विषय इंग्रजी असला तरी मला चित्रकला, शिल्पकला, अक्षरलेखन, भाषण, कथाकथन,काव्यवाचन, इत्यादी कला अवगत असल्यामुळे मी विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होतो. विद्यार्थ्यांशी हितगुज साधत मी अध्यापन करीत असे. त्यामुळे शनिवारी रविवारी,आणि  सुट्टीच्या दिवशीसुद्धा विद्यार्थी माझ्यासोबत घुटमळत असत. दिवशीच्या हायस्कूलजवळ रस्त्यालगत एक सागाचे वठलेले खोड होते. मी चार-पाच विद्यार्थ्यांना सोबत घेतले आणि ते खोड हलवून उताराला ढकलून दिले. नको असलेल्या मुळ्या विद्यार्थ्यांकडून मागून घेतलेल्या कुऱ्हाडीच्या साह्याने तोडल्या .आणि थोडे संस्कारीत केले. आणि काय आश्चर्य…  त्यामध्ये उतरलेला गरुड….. बैठक म्हणजे दोन पंख बैठकीला, चार मुळ्या मान, डोके, चोच….. गरुडाचा हुबेहूब आकार मिळाला. या काष्ट- शिल्प निर्मितीसाठी दोन महिने राबत होतो.  त्याचे वजन अंदाजे 25 किलो असून काष्ट-शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना निर्माण झाला आहे.  या काष्ट- शिल्पाचे प्रदर्शन वाघोली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, देवापुर, तालुका मान, जिल्हा सातारा ,अनगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर ,मरवडे, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर, आटपाडी, जिल्हा सांगली, इत्यादी ठिकाणी झाले आहे. याचे सविस्तर वर्णन मी माझ्या ‘क्षमताधिष्ठित सप्तरंगी कला ‘ या ललित लेख संग्रहामध्ये केले आहे. या ललित लेख संग्रहाला ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षक पुरस्कार‘ प्राप्त झाला आहे. ३४ वर्षे सेवा कालावधीमध्ये मला माझा द्वेष करणाऱ्या व्यक्ती भेटल्या, तशाच तितक्याच सन्मानाने वागणूक देणाऱ्यासुद्धा भेटल्या. अशा आंबट गोड आशयाचे प्रसंग सांगण्यासारखे भरपूर आहेत.

 

© श्री रमेश जावीर 

खरसुंडी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments