श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? मनमंजुषेतून ?

☆ प्रिय माउली ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

प्रिय माउली,

बा विठ्ठला,

देवा, तू असा आहेस ना? मनाने तू माउली आहेस आणि दिसतोस मात्र लेकरासाठी, कुटुंबासाठी उन्हांत राबलेल्या, उन्हानं रापलेल्या बापासारखा…

आमच्या सारख्या सामान्य जीवांना तुला नक्की कोणत्या नावाने हाक मारावी असा संभ्रम पडतो…

मी तुला माउलीच म्हणेन इथून पुढे…

खरं सांगू का?

प्रपंचातील कटकटींनी आम्ही पार वैतागून जातो, आम्हाला माहीत असते या सर्वांस आम्हीच किमान ५०% तरी जबाबदार आहोत. (खरेतर आम्ही १००% जबाबदार असतो, पण ती जबाबदारी घेण्या इतपत शहाणपण आणि सामर्थ्य आमच्या अंगी नाही रे…) पण सर्व दोष आम्ही तुला देतो, तुला माहित असते की लेकरू कावले आहे…, राग व्यक्त करायला त्याला माझ्या शिवाय कोणी नाही, म्हणून तू सर्व शांतपणे ऐकून घेतोस…, देवा, अगदी मनातलं सांगतो, तुझ्यासारखे शांतपणे, एकाग्र चित्ताने ऐकून घेणारे कोणीही नाही रे या जगात…, तू आमचे गाऱ्हाणे ऐकून घेतोस ना, तिथेच आमचे ५०% दुःख निवळते… आणि बाकी राहिलेले दुःख वागविण्याची ताकद तुझ्या दर्शनाने मिळते…

तुला वाटेल, आज एकादशी आहे म्हणून हा बोलत असेल…

तसे नाही देवा, वरील विचार कायम आमच्या मनात असतो, पण आज तुझ्या घरी तुझे लाडके भक्त आले आहेत, साक्षात ज्ञानेश्वर माउली, तुकोबा, जनी, चोखोबा, नामदेव,… कित्ती जणांची नावे घेऊ…? खरी माहेर वाशीण घरी आली की घराच्या गड्याला ही गोडधोड खायला मिळते, एखादं वस्त्र मिळत, अगदीच काही मिळालं नाही तर मालकाचे चार प्रेमाचे शब्द मिळतात, आमच्या सारख्या सामान्य भक्ताला ते अमृता सारखे नाहीत काय?

देवा तुझ्या डोळ्यांत पाणी आले न? अरे या दोन गोड अमृत असलेल्या शब्दांसाठीच आम्ही वर्षभर आसुसलेले असतो…

देवा, अपार काळजी मागे सोडून तुझ्या दर्शनासाठी येतो, जे पायाने वारी करू शकत नाहीत, ते मनाने वारी करतात…

विठू माउली,

तुला सगळंच ठावे…, तरीपण तुझे कौतुक तुला आपल्या लेकरांकडून ऐकायचे असते, म्हणून माझ्या लेखणीतून तू ते लिहून घेतलेस ना…

तूच खरा खेळिया, आणि आम्ही तुझ्या हातातले खेळणे…

अरे हो, हिने तुझ्याकडे मागण्यासाठी मोठी यादी दिली होती… पण तू चंद्रभागेत स्नान करताना वाहून गेली… आता, घरी गेल्यावर मी तिला काय सांगू…?

अरे मी काही सुदामा नाही की तू मला सोन्याची नगरी भेट द्यावी…

एकच कर, माझी आणि माझ्या पत्नीची मागण्याची इच्छाच नष्ट कर…

हे तुला करायला आवडेल…

तुझ्या मनातलं बोललो ना…?

मी तुझेच लेकरू आहे, तुझ्या मनातलं थोडेसे मला कळणारच…

बरं, आता परतीला निघतो…

जाताना रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन जातो…

देवा, आणखी एक गोष्ट मागाविशी वाटते… मागू का?

तू नाही बोलायच्या आधीच मागतो…

…… तुझ्या नामाचे प्रेम दे……! देशील ना?

तुझाच,

एक वारकरी…!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments