सौ राधिका -माजगावकर- पंडित
☆ ‘माझी शिदोरी… खवय्येगिरी, पुणेकर…’ भाग-२६ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
खवय्येगिरी, पुणेकर…
गणेशोत्सव बघायला बाहेर पडल्यावर दणकून चालल्यावर सणकून भूक लागायची. अर्ध शतकापूर्वी पुणेकरांनाही बाहेरचं खाण्याचा शौक होता, पण अर्थाजनाला मर्यादा असल्यामुळे पदार्थ घेण्याला आणि खाण्यालाही निर्बंध असायचा. आप्पा बळवन्त चौकातून पुढे गेल्यावर भडभुंजाची भट्टी लागते. आतल्या बाजूला सतत भट्टी रसरसलेली असायची. 1 की. ज्वारी तांदूळ घेऊन, आई, काकू तिथून लाह्या फोडून आणायच्या. लालबुंद झालेल्या मोठ्या कढईत वाळू टाकून त्यात जोंधळे टाकले की फटाफट चांदण्यासारख्या चांदणी आकाराच्या शुभ्र लाह्या उमलून यायच्या. एरवी कंटाळा करणारे आम्ही, इथे मात्र आवर्जून जायचो कारण वाळूच्या उबेतून बाहेर पडलेले गरमागरम चणे फुटाणे, लाह्यांचे प्रकार बोकणा भरून खाता येत होते ना! म्हणून तर ही धडपड. तर अशा भडभुंज्याकडे हारीनें लावलेली आमच्या बजेटमध्ये बसणारी, कोरडी भेळ घेऊन आम्ही गणपती बघायला बाहेर पडल्यावर, पायाबरोबर तोंडही चालायचे. आमच्या मोठ्या बहिणी, जातांना बरोबर वर्तमानपत्र घ्यायच्या. नाहीनाही! वाचायला नाही हो! भेळ पसरून खायला पेपर हवा ना, अहो! तेव्हा कुठे होत्या पेपर डिश ? एखाद्या ओट्यावर ठाण मांडून कागदावरच्या कोरड्या भेळेच्या दहा मिनिटात फडशा पाडत होतो आम्ही. भेळ वाल्याकडची सणसणीत मिरची खातांना डोळे पांढरे झाले तर, बरोबर घेतलेल्या प्रवासी फिरकीच्या तांब्यातलं पाणी एका दमात रिकामं व्हायचं. तेव्हां काही आता सारखा बिसलेरीचा शोध लागला नव्हता. आमचा आपला स्वच्छ, चकचकीत घासलेला फिरकीचा तांब्याच बरा होता. पुण्यात सगळे गणपती बघायला, अगदी अख्ख पुणं पालथं घातलं जायचं. खाऊ गल्लीतली कोपऱ्यावरची हॉटेलं आम्हाला खुणवायची हो! पण बजेट ? हॉटेल बिल बसायला हवं ना त्यात! मग काय भेळेवरच भागवून आम्ही पुढे सरकायचो.
टिळक रोडवरचं जीवन, बादशाही, फडतरे चौकातले स्वीट होम, सदाशिव पेठेजवळचं पेशवाई, दत्त उपाहारगृह, आनंद विलासची मिसळ, घावन, संतोष भुवनची पुरी भाजी आणि बेडेकरांची प्रसिद्ध मिसळ हे सारं सारं काही नजरेआड करून प्रभा विश्रांती गृहाकडे आमचे पाय वळायचे. कारण तिथला बटाटेवडा स्वस्त आणि मस्त असायचा. तो वडा मात्र आम्ही दणकून हादडायचो. कारण तो चवदार आणि फ्रॉकच्या खिशाला परवडेल असा म्हणजे फक्त चार आण्याला मिळायचा. चवीला चवदार चटणी असायचीचं वाढणाऱ्याला जरा मस्का मारला की दोन चमचे चटणी जास्तच मिळायची.
श्रीमंत पोरं मात्र केसांचा कोंबडा उडवत, बापाच्या पैशावर, सिगरेटचा धूर सोडत, इम्प्रेशन पाडायला पोरींना रीगल, गुडलक कॅफे, सनराइज, पुना कॉफी हाऊस, मध्ये स्पेशल ‘च्या’प्यायला घेऊन जायची. सोळाव्या वरीसातलं धोक्याचं पाऊल, या रेस्टॉरंट मध्येच घसरायचं. म्हणजे प्रेमात पडायचं. त्यावेळी ‘मेळे’ असायचे. गजानन वाटवे, जोस्ना भोळे यांचा कार्यक्रम ऐकण्याऐवजी, ‘केला इशारा जाता जाता ‘करण्यातच प्रियकर प्रेयसींचा वेळ जायचा. तिकडे चोरून बघत कानाडोळा करुन आम्ही आप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी परिसरात यायचो. पण घरी परततांना अचरबचर न खाण्याने, मन आणि पोट शांत असायचं.
जास्तीत जास्त पाच रुपये खर्च करणारे आम्ही, आजच्या पिढीला दोन, पाच हजार खर्च करून बिल देतांना बघतो नां, तेव्हां आम्ही अचंबित होतो. बाई गं! खाण्यावर हा केवढा खर्च?त्यांचेही बरोबर आहे म्हणा खाण्याचे दिवस आहेत त्यांचे. आणि मिळवतायेत पण ते तेवढे पैसे. माझ्या भावाला शरद आप्पाला आणि बहिणीला लीलाला कुलकर्णी भेळ फार आवडायचीनु. म. वि हायस्कूल कडे जातांना आनंदाश्रमाच्या अलीकडे छोट्याशा कोपऱ्यात श्री. कुलकर्णीनी आपला भेळेचा संसार मांडला होता. वाहनं चुकवत ओल्या वेळेचे बोकणे भरतांना भेळ खाणाऱ्यांची त्रेधा तिरपीट उडायची पण ती ‘हटके’ भेळ खायला लोकं सहाच्या आत धडपडत हजेरी लावायचीचं. कुलकर्णी भेळ, गोड आणि चविष्ट बनवायचे पण त्यांच्या जिभेवर मात्र तिखट होतं. त्यांचा काटेकोर नियमच होता, सहानंतर, भेळेच दुकान बंद होणार आहे. सहाच्या पुढे काटा गेल्यावर ते स्पष्ट सांगायचे, “वेळ संपली, आता तुम्ही निघा. उद्या भेटू. ” शिष्ठ वाटणारे हे कुलकर्णी मनाने उमदे होते. दुर्दैवाने माझा भाऊ स्वर्गवासी झाला. त्याची नेहमी तिथे हजेरी असायची. माझ्या वडिलांची काही उधारी तर राह्यली नाही ना?असं विचारायला नंतर माझा भाचा हेमंत त्यांच्याकडे गेला व वडील नसल्याची दुःखद बातमी त्यांनी कुलकर्णींना सांगितल्यावर ते ताडकन उठले, हेमंतला जवळ घेऊन सगळ्यांसमोर उभं करून म्हणाले, ” ह्याला म्हणतात संस्कार. शरद माजगावकरांनी कधीच उधारी ठेवली नाही. लोक उधारी बाकी ठेवतात, पैसे बुडवतात. तोंड लपवतात पण हा त्यांचा मुलगा वडिलांच्या पश्चात त्यांची उधारी राह्यली आहे का? हे विचारायला इथे आला आहे. अशी पितृऋण फेडणारी मुलं ह्या जगांत आहेत. मग तुम्ही सांगा! कोण म्हणतं आजची पिढी बेजबाबदार आहे म्हणून. सगळे गिऱ्हाईक कुलकर्णीच्या कौतुकाने भारावले. आणि माझ्या भाच्याकडे कौतुकाने बघायला लागले. अशी होती ती सुसंस्कारित त्यावेळीची पिढी. त्यांच्या संस्काराच्या पायावर आजच्या आदर्श पिढीची इमारत उभी आहे, नाही का! भेळवाल्या कुलकर्णींना आणि वाचकहो तुम्हालाही धन्यवाद.
– क्रमशः भाग २६
© सौ राधिका -माजगावकर- पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈