सुश्री नीता कुलकर्णी
☆ “आनंद शांततेतला…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
आम्ही मैत्रिणी दापोलीला ट्रीपला गेलो होतो. तिथे उंच सावळा तरतरीत असा शंकर आम्हाला गाईड म्हणून मदत करत होता. तो अत्यंत नम्र आणि शांत होता. तिथेच राहणारा असल्याने त्याला पूर्ण दापोली माहीत होते. दिवसभर तिथे हिंडलो. संध्याकाळी शंकरने सहजपणे विचारले,
” तुम्हाला डॉल्फिन बघायला आवडेल का?”
” इथे दिसतात?”
” हो… पण पहाटेच समुद्रात लांबवर जावे लागेल मग तुम्हाला डॉल्फिन दिसतील. “
“खरच.. का? आम्ही परत विचारले. “
“हो… मात्र अगदी सकाळी लवकरच निघूयात “
आम्ही” बरं ” म्हणालो. खुश झालो होतो.
शंकर यायच्या आत आम्ही सगळ्याजणी तयार होतो. भल्या पहाटे निघालो. तेव्हा समुद्रात मोठ्या लाटा येत होत्या. जोरात आवाज येत होता. समुद्र खवळला होता. ईतका की.. त्या आवाजाची भिती वाटत होती…
तो म्हणाला, ” जसं जसं पुढे जाऊ तसा समुद्र शांत होत जातो. काळजी करू नका. “
समुद्रात आतं आतं जायला लागलो. खरचं मग आवाज कमी कमी झाला. गाणी, गप्पा सुरू होत्या.
एका ठराविक ठिकाणी गेल्यावर त्याने बोट थांबवली. वरती निळं आभाळ आणि खाली निळाशार समुद्र… बाकी आसपास काहीही नव्हते.
तो म्हणाला…
“आता कोणी एक शब्दही बोलू नका. काही वेळातच तुम्हाला डॉल्फिन दिसायला लागतील.. “
क्षणातच शांतता पसरली एकदम निरव शांतता….
खरोखरच ती जाणवत होती अजून काही क्षण गेले…..
आसपासचे पाणी स्थीर झाले..
आणि अचानक समोरच पाण्यावर डॉल्फिन दिसायला लागले…
त्यांचा तो खेळ कितीतरी वेळ आम्ही पाहत होतो…
काहीतरी वेगळेच अनुभवायला मिळाले…
त्या अफाट समुद्रात चोहीकडे पाणी फक्त आमची बोट…..
आणि ते डॉल्फिन ते सुळकन् पाण्याच्या वर येत होते. नाचत होते. परत आत जात होते. त्याचे पाणी कारंजा सारखे ऊडत होते.
काही वेळेस शांतता असायची आणि परत त्यांचा खेळ सुरू होऊन तो रंगात यायचा…
सहज नैसर्गिक असं त्यांचं चालू असेल पण ते बघताना विलक्षण गंमत वाटत होती.
आम्ही त्यात रंगुन गेलो होतो…….
इथे डॉल्फिन बघायला मिळतील असे आम्हाला वाटलेच नव्हते. त्यामुळे अजूनच आनंद झाला होता.
“चला निघूया आता… “
असा शंकरचा आवाज आल्यावर आम्ही भानावर आलो.
कोणाला परत जावं अस वाटत नव्हतं.. पण बराच वेळ झाला होता निघणं भाग होतं..
येताना शंकरनी परत बोट थांबवली म्हणाला,
” तुम्हाला अजून एक गंमत दाखवतो खाली बघा”
आम्ही सगळ्याजणी खाली बघायला लागलो..
तिथे समुद्राचा तळ दिसत होता.. नितळ स्वच्छ…
रंगीबेरंगी दगड, वाळू, नाजूक असे शंख शिंपले… त्यातले छोटे छोटे रंगीबेरंगी मासे ईकडे तिकडे जात होते. त्यांचा अनुपम्य खेळ चालला होता..
स्तब्धच झालो…
खाली त्यांच अस एक जग होत…
अगदी भारावून गेलो होतो…
किती तरी वेळ बघत होतो..
विलक्षण गोड निरामय आनंद देणार असं ते होतं.
त्या शांततेतला आनंद आम्ही घेतला………
निसर्ग शिकवतो आपल्याला कोलाहाला पासून दूर दूर जायचे.
नि:शब्द शांत बसायचे…
मगच आतले ते अनाकलनीय गूढगर्भी….
कधी न जाणवलेले दिसते….
स्पंदने जाणवतात…
शब्दांची आवश्यकता नसते….
आज पहाटे शंकरची आठवण आली. त्यानी दाखवले म्हणून आम्ही ते पाहू शकलो त्याचा अर्थ समजून घेऊ शकलो. असे दाखवणारा शंकर भेटला… याचाही मला आनंद झाला. निघताना आम्ही त्याचे खूप कौतुक केले… त्याला दिलेले बक्षीस तो घेत पण नव्हता.. शांतपणे हसत होता.. आम्हीच त्याला बळजबरीने ते घ्यायला लावले…
मनात आलं तो अनुभव आपल्याला परत कसा बरं मिळेल…. विचार केल्यावर एक लक्षात आलं… त्यासाठी बाहेरच जायला हव अस नाही.. घरी पण शांत बसता येईल की… म्हटलं बघू प्रयोग करून…
शांतपणे बसले. मनात आलं आज आपल्याच अंतरंगातच जरा डोकावून बघू…
हळूहळू आत जायला लागले
मन शांत करत खोलवर गेले
होतं का ते पारदर्शी?
होतं का ते स्वच्छ?
लक्षात आलं ती जबाबदारी माझी बाहेरचं जग खूप बघून झालं आता पुरे…
अर्थात हे इतकं सोपं नाही आचरणात आणणं त्यातूनही अवघड..
पण लक्षात आलं..
ही वाटचाल करताना मार्गदर्शन करायला शिकवायला आपले संत आहेतच….
रामदास स्वामींची आठवण झाली…
” बैसोनी निवांत शुद्ध करा चित्त तया सुख अंतपार नाही येऊनी अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसलीया”
ऋषीमुनी निसर्गाच्या एकांतात जाऊन तप का करत असतं याचा थोडासा उलगडा झाला…
प्रयत्न करत राहू…
कधी न बघितलेले डॉल्फिन आम्हाला बघायला मिळाले….
इथेही असंच काहीतरी आनंदाच गवसेल…
माहित नसलेलही काही समजेल… ही श्रद्धा ठेवूनच प्रयत्न करायचा फळ देणारा तो आहेच…
☆
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
पुणे
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈