पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
मनमंजुषेतून
☆ ‘‘स्वरसंमोहन…’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆
स्वरांची ‘भन्नाट’ जादू काय असते, हे काहीच कलाकारांच्या बाबतीत मी नेहमी अनुभवते. गेले काही दिवस भारतरत्न पं. रवी शंकरजी आणि पद्मविभूषण उ. अली अकबर खाँ साहेब यांच्या जुगलबंदी वादनाच्या आविष्कारातून असाच आनंद घेतेय. त्यातून बाहेर पडूच नये, अशी ही केवळ मोहिनीच नव्हे तर ‘संमोहिनी’ Hypnotism म्हणजे मनावर जडलेली जादू / भुरळ! त्यांचा ‘मांज खमाज’ हा राग तर झपाटल्यागत, माझी पाठच सोडत नाही……..
कुठल्याही शब्दांच्या आधाराविना स्वरांचा भावनाविष्कार काय असतो? तो शब्देविण संवादु अनुभव म्हणजे…… स्वरांचा उत्सव, स्वरांचे लखलखते झाड, अंगावर बरसणा-या स्वरांच्या फुलझडया मिटलेल्या डोळ्यांना दिसू लागतात; आणि अलगद डोळे पाझरू लागतात… हृदयाला टाचणी लागल्यावेळीच असे डोळ्यातून पाणी येते.
अशा उत्कृष्ट शास्त्रीय संगीताचा, आपल्या मानसिकतेवर काय परिणाम होऊ शकतो…. मन उडूबागडू लागते, नाचू लागते, नाट्य करू लागते, ती लय रवीजींनी नृत्य शिकल्यामुळे आपल्याही रक्तात सळसळू लागते, शरीर नागासारखे डोलूही लागते, काळजात सौंदर्य लहरी उमटू लागतात. त्यातून आनंद, प्रेम, लज्जा, लडिवाळपणा, आस, विरह, व्याकुळता, अशा अनेक भावना, केवळ कानापर्यंतच नाही तर थेट हृदयापर्यंत पोहोचवण्याची ताकद नि चित्तवृत्ती उल्हसित करण्याची ताकदही या स्वरांत आहे, म्हणून तर या हातांनी, पाश्चिमात्यांवर, त्यांचे संगीत उपलब्ध असूनही त्यांच्यावर भुरळ पाडली.
हे स्वर ऐकताना ते हृदयापर्यंत पोहोचल्याची जाणीव प्रत्येक रोमरोमांत होते. आपण काहीतरी अद्वितीय, अपूर्व ऐकतोय याची, रक्ताच्या थेंबाथेंबाला, नसानसांत उसळताना, “उभ्या रोमरोमांतुनी चैत्रवाटा… ” अशी अनुभूती येऊ लागते.
दोघेही दिग्गज, पण एकमेकांवर कुरघोडी न करता, गिमिक्स न करता, एकमेकांना पूरक, complementaryवाजवून केवळ स्वरांच्या वेगवेगळ्या सौंदर्यपूर्ण जागा (उपज) घेऊन, आपल्या जाणिवा, रागाबरोबर फुलवतात. शरीराचा प्रत्येक भाग ‘पुलकित’ होतो म्हणजे काय? हे तेव्हा जाणवतं. अवघ्या ३५-४० मिनिटांत अवकाशात न मावणा-या, वैविध्यपूर्ण अनंत जागा. (Varieties)…..
एकासारखी दुसरी शोधून सापडणार नाही. इतक्यांदा पारायणे केली, तरी पुढची जागा ही (pleasant surprise) वेगळाच गोड धक्का देऊन जाते. लयीचे तर काय नि किती किती नानाविध प्रकार…. ? यांना दरवेळी इतके कसे सुचत असेल नि किती अफाट रियाझ केला असेल या मंडळींनी…. दैवी देणगी आणि मेहेनत, परमेशाची कृपा आणि नशिबाची साथ, अशा अनेक गोष्टींचा सुंदर संगम….. या जुगलबंदीला अजून एक साथ अत्यंत मधुर हात असलेल्या अब्बाजींची… ! म्हणजे पद्मविभूषण उस्ताद अल्लारखाँ खाँ साहेब, जणू स्वत:चा गोडवा असूनही, दुधात विरघळलेल्या साखरेसारखी! कुठेही अवास्तव स्तोम न माजवणारी!
भारतरत्न पं. रवीजींसारखेच दुसरे असेच गाणारे भारतरत्न म्हणजे गानसम्राज्ञी लतादीदी! पुण्यात दीदींच्या ८५ व्या वाढदिवसाला माझे गुरू पद्मश्री पं. हृदयनाथजी मंगेशकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात, मी पं. रवीशंकरजींनी ‘अनुराधा’ चित्रपटासाठी स्वरबद्ध केलेली… ‘जाने कैसे सपनों में… ’, ‘हाये रे वो दिन… ’, ‘कैसे दिन बीते… ’ अशी एकाहून एक सुंदर गाणी सादर केली. त्यावेळी साक्षात् पं. रवीजींना थेट भेटल्यासारख्या, बाळासाहेबांच्या (गुरुजींच्या) प्रेम व आदर या भावना उचंबळून आल्या, ज्या त्यांनी स्टेजवरून श्रोत्यांसमोर व्यक्तही केल्या. एका दिग्गजाने दुस-या दिग्गजाला दिलेली ही सलामी! या दिग्गजांची काय ‘उंची’ आहे याचे मोजमाप करणारी पट्टी आमच्याजवळ उपलब्धच नाही, ही खरी गंमत आहे! थेट हिमालयाच्या शिखराकडे आश्चर्याने आणि कौतुकाने आपण फक्त पहात राहावे, अशी ही सारी ईश्वरीय वरदान लाभलेली मंडळी! त्यासाठी हिमालयाच्या निदान पायथ्याशी तरी पोहोचावे लागते!
त्यादिवशी बाळासाहेबांनी, मी रवीजींची गाणी गाऊन त्यांची आठवण करून दिल्याबद्दल, माझे पुन्हा पुन्हा आभार का मानले, हे मला ‘आज’ कळतंय ! त्यावेळी फक्त आश्चर्यच वाटलं होतं. पंडितजींच्या शेवटच्या आजारपणात ICUत असताना त्यांनी बाळासाहेब व दीदींची ‘मीरा’ ऐकली… हे सारे अमेरिकेहून फोन वर झालेले संभाषण, त्यांचा सहवास, या सर्व गोष्टी आठवून, बाळासाहेब काहीसे भावूक झाले होते. एक अनुपम सौंदर्याची अखेर आठवून ते का गदगद झाले होते? हे मला आज ‘मांज खमाज’ ऐकताना वारंवार जाणवत राहिले आणि राहीलही… अशी संगीतातली थोर माणसे आता होणे नाही; म्हणूनच वाटते की; या वेड लावणा-या, संमोहन घालणा-या व्यक्तींच्या कार्यात सतत सान्निध्यात रहाणे, त्याचा अभ्यास करणे, त्यात चिंब चिंब भिजून जाणे हेच या काळात आपले उन्नयन आहे. हीच स्वर्गीय स्वरांची अनुभूती आहे.
© पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈