मनमंजुषेतून
☆ “लाईफ विदाऊट पुणे…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆
दहा वर्ष.
दहा वर्ष झाली रेवाच्या लग्नाला.
खरंच कळलं नाही. भुर्रकन उडून गेली ही वर्ष.
आठवतंय तर..
किती तरी चांगली स्थळं नाकारलेली तिनं.
बरं झालं. नाहीतर, रवी कसा मिळाला असता तिला ?
कारण ?.. कारण एकच… पुण्याबाहेर जायचं नाही… पुणं रक्तात… नसानसात… रोमारोमात.
.. ‘पुणं’ जगण्याचा आॅक्सीजन.
रेवा विदाऊट पुणे ? शक्यच नाही.
रेवानं आधीपासूनच ठरवलेलं. “मुलगा कसाही असला, तरी चालेल. काळा कुट्ट, तिरळा, टकला.
दोन खोल्यांत सुखानं संसार करीन. पण… पुण्यातला हवा… “
अगदी आयटी वाल्यांनाही, सरळ नाही म्हणायची ती.
‘अय्यो… यांचा काय भरवसा ? म्हणायला आज हिंजवडीत… उद्या उठून चालायला लागतील, बंगलोरला.
नाहीतर हैद्राबादला… परवा एकदम स्टेटस् ला. नको रे बाबा.. ‘
नशीब काढलं पोरीनं. रवी मिळाला तिला. शनवारात माहेर… नारायणात सासर. अगदी मुठेला सुद्धा ओलांडायला नको.
सुख म्हणजे दुसरं काय असतं ? हेच…
नारायणात पत्र्या मारूतीशी तिचं सासर.
“परशुराम क्षुधाशांती गृह”.. अस्सल मराठमोळ्या चवीचं, धो धो चालणारं हाॅटेल.
रवी, गल्ल्यावर बसणारी तिसरी पिढी… हाॅटेलमधल्या कामगारांचीही तिसरी पिढी. रवीच्या आजोबांनी चालू केलेलं.
तिथलं थालीपीठ, साबुदाण्याची खिचडी, आणि साजूक तुपातला अस्सल बदामी शिरा.. अजून बरच काही.
एकही पदार्थ कधी शिल्लक रहायचा नाही.
हाॅटेल पहिल्यापासून फेमस… टोकन सिस्टम. दोन मजली हाॅटेल… जागा कमी पडायची. मोस्ट अवेटींग वेटींग..
तिसऱ्या, चौथ्या मजल्यावर घर… ऐसपैस… प्रशस्त.
रवी हाॅटेलमधे कमीच असायचा. त्याचे बाबाच सांभाळायचे हाॅटेल. रवीनं रीतसर हाॅटेल मॅनेजमेंट केलेलं.
आयटी कंपनीतली दोन कॅन्टीन्स घेतलेली चालवायला. त्याच्याकडे चांगली टीम होती. थोडी धावपळ व्हायची. मस्त बस्तान बसलं होतं.
रवी तसा मवाळ… करलो दुनिया मुठ्ठीमें टाईप. रेवाच्या मुठीतला प्राणी. सासू सासरे प्रेमळ. साठ डेसीबल्सच्या वरच्या आवाजाची सवयच नव्हती घराला.
रेवा तिच्या माहेरी, शनवारात नर्सरी स्कूल चालवायची. लग्न झाल्यावर रवी म्हणाला…
” कॅरी आॅन रेवा… “
रवीनं नळस्टाॅपला एक बऱ्यापैकी मोठी जागा घेतली. सध्या भाड्यानेच.
रेवाचं नर्सरी स्कूल झोकात. ” लिटील एन्जल्स “
त्यांच्या घरात पण आलीय, आता एक लिटील एन्जल… तन्वी.
तन्वी आता जरा, मोठी झालीय. आजीबरोबर मस्त राहते. रेवा दिवसभर तिच्या नर्सरी स्कूलमधे बिझी.
पुढच्या वर्षी तन्वी पण जायला लागेल. घरची शाळा.
एकंदर काय ? रेवा जाम खुष होती. ” जिंदगी का सफर… ” काहीच suffer नव्हतं.
– – अचानक काल विनायकराव… रवीच्या बाबांचे सख्खे मित्र. परशुरामला रहायचे. मोठ्ठी वाडी होती त्यांची… डोंगरउतारी… वाशिष्ठीकडे तोंड करून. अप्रतिम नजारा दिसायचा. ऐसपैस मोठ्ठं घर. नुकतंच बांधलेलं. समीर.. त्यांचा एकुलता एक मुलगा आस्ट्रेलियात असतो. इकडे परत यायची शक्यता नाही.
तिथं दोघंच म्हातारा म्हातारी. बऱ्याच वेळा जाऊन आलीयेत, सगळी तिथं. दोन घरात खूप घरोबा.
काल रात्री विनायकराव अचानक आले. बऱ्याच वेळ रवीशी, त्याच्या बाबांशी बोलणं चाललेलं. रेवा, तिची सासू स्वयपाकघरात. जेवणं आटोपली. सगळी हाॅलमधे जमली. रवीच्या बाबांनी सुरुवात केली.
.. ” विनायकनं एक प्रोपोजल ठेवलंय. परशुरामला त्याची वाडी, तुम्ही बघितलीच आहे. तिथं एक हाॅलीडे रिसाॅर्ट डेव्हलप करतोय तो. समीरनं… त्याच्या लेकानं, बऱ्याच डाॅलर्सचा रतीब घातलाय तिथं. काम पूर्ण होत आलंय. पंचवीस तीस एसी रूम्स… काॅन्फरन्स हाॅल… स्विमिंग पूल… ईनडोअर गेम्स… प्युअर व्हेज रेस्टाॅरंट… सगळ्या थ्री स्टार फॅसिलिटीज … सगळा सेट अप रेडी आहे. समीर काही इकडे येणार नाहीये.
रवीला पार्टनरशीप ऑफर करतोय तो. मला वाटतं रवीनं जावं. फूड इंडस्ट्रीजचा त्याला एक्सपिरीयन्स आहेच. हाॅलीडे होम थ्रू बरंच शिकायला मिळेल. इथलं हाॅटेल अजून काही वर्ष तरी मी नक्की सांभाळीन.
निदान वर्षभर तरी जावं. नाही आवडलं तर, ये परत… “
रवी कनफ्युजलेला. तो रेवा की नस नस से वाकीफ. पुण्याबाहेर पडायचं ? शक्यच नाही… त्याचा डिसीजन ठरलेला… बायकोशी दुश्मनी ?.. नको रे बाबा ?
तो नाही म्हणणार, एवढ्यात रेवा उवाच.
” बाबा, आम्ही तयार आहोत. पण एकच वर्ष. जास्त नाही. पुढे मागे पुण्यात एखाद मोठ्ठ हाॅटेल, चालवायला घेवू आपण. हा एक्पेरीअन्स खूप काही शिकवून जाईल. “
…. अजूबा… रेवानं सोप्पं गणित मांडलेलं. एकच वर्ष तर काढायचंय. यूऽऽ कट जायेगा..
खरं सांगू ? एक नाही, साडेचार वर्ष झालीयेत आता. “वाशिष्ठी दर्शन मोटेल” जोरात चाललंय. विनायकराव आणि काकू खूष.
समीर तर रवीला म्हणतोय, ‘तूच सांभाळ सगळं, लाईफटाईम. ‘
वाडीतल्या रिकाम्या जागेवर, रेवाचं स्कूल उभं राहिलंय… ‘समीर फायनान्स’च्या सहकार्यानं.
चिपळूणातलं पहिलं आय सी एस ई स्कूल… जोरात चालंलय. ” पुण्याच्या बाईंची शाळा ” फेमस झालीये.
तन्वीही मस्त रमलीये. रेवा पुणं विसरलीय बहुतेक.
परवाचीच गोष्ट… एक निवांत संध्याकाळ. रेवा आणि रवी गॅलरीत उभे…काॅफीच्या सोबतीला समोरची वाशिष्ठी.. वळणदार, नागमोडी.
“रेवा, मै तुम्हे कभी समझ ही नही पाया…. पुणं सोडून, तू कशी काय राहिलीस इथं ?”
रेवानं मोठ्ठा पाॅझ घेतला.
“रव्या, कोण म्हणतंय मी पुण्यापासून लांब आहे ? पुणं इथंच आहे, माझ्यासोबत.
पुणं म्हणजे फक्त पिनकोड नाहीये… पुणं म्हणजे संस्कार… पुणं म्हणजे लाईन ऑफ थिंकींग… पुणं म्हणजे वर्क कल्चर.. जे फक्त पुण्यात राहूनच, शिकता येतं. आज तू अन् मी इथं, आपापलं छोटसं विश्व उभारू शकलो ते याच संस्काराच्या जीवावर. आहे ते शिस्तीत सांभाळायचं, वाढवत न्यायचं. फुकाचा माज करायचा नाही. स्वतःची ओळख निर्माण करायची. अटकेपार डंका फडकवायचा. अन्… रिटायरमेंनंतर पुण्यात परत यायचं….. हे असलं, अस्सल जगणं, म्हणजेच पुणं… मी चुकत होते रव्या.. पुण्यापासून लांब गेलं की, पुण्याची किंमत कळते. माणूस शहाणा होतो. प्रगती करतो. “पुण्या”च्या वाटेवर चालू लागतो.
अस्सल पुणेकरानं, दोन चार वर्ष बाहेर काढावीतच… ते जाऊ दे. ही शाळा मला बारावीपर्यंत न्यायचीय.
तुझं हाॅटेल बारा महीने फुल्ल रहायला हवं.. ”
“होणार.. असंच होणार. वाशिष्ठीच्या साक्षीनं… ओंकारेश्वराच्या आशीर्वादानं… एकदा लेकीचं लग्न झालं, की जाऊ पुण्याला परत. अजून एक, जावई मात्र पुण्यातलाच हवा.. “
खरंय.. रेवा पुण्याशिवाय राहूच शकत नाही. रग रग में पुणे.. ” ये बयो लवकर परत…पुणं वाट बघतंय. ”
– – ‘पुण्या’ची गणना कोण करी ?”
© श्री कौस्तुभ केळकर नगरवाला
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈