श्री सुहास रघुनाथ पंडित
पुस्तकावर बोलू काही
☆ “जीवनरंग” – लेखिका : सौ. पुष्पा प्रभुदेसाई ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : जीवनरंग
लेखिका : सौ. पुष्पा प्रभूदेसाई, मो. ९४०३५७०९८७
प्रकाशक : अथर्व प्रकाशन, कोल्हापूर
९८५०६९९९११
मूल्य : रु. ३२०/-
☆ जीवनरंग —विविधरंगी जीवनाचे चित्रण ☆
मिरज येथील सो. पुष्पा प्रभूदेसाई यांचे ‘जीवनरंग’ हे पहिलेच पुस्तक. ते २०२१ मध्ये प्रकाशित झाले आहे. लेखिकेने स्वतःचा परिचय करून देताना स्वतःला ‘गृहिणी ‘ असे म्हटले आहे. त्यामुळे संसाराशी संबंधित कथा किंवा लेख वाचायला मिळतील अशी अपेक्षा होती. पण हा लेख संग्रह वाचून झाल्यावर वाटू लागले की लेखिका ही फक्त गृहिणी नसून तिच्यात एक प्राध्यापिका लपलेली आहे व या लेखसंग्रहामुळे ती आपल्या समोर आली आहे. असे म्हणण्याचे कारण म्हणजे, या संग्रहातील लेख हे विविध विषयांवरील व अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहीलेले आहेत. केवळ विषयांची विविधता नव्हे तर तो विषय स्वतः समजून घेऊन तो दुस-यालाही समजावून सांगायचा आहे ही तळमळ त्यांच्या लेखनातून दिसून येते. यातील अनेक लेख पूर्वी दैनिके, दिवाळी अंक यातून प्रकाशित झाले आहेत. काही लेख निरनिराळ्या निबंध स्पर्धांना पाठवलेले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी स्पर्धेत पुरस्कारही मिळवले आहेत, ज्यात राज्य स्तरीय प्रथम पुरस्कारांचाही समावेश आहे. यावरुनच या लेखांच्या अभ्यासपूर्णतेची कल्पना येईल.
विषय साधा असो किंवा विशेष माहितीपूर्ण, अत्यंत साधी, सोपी, सरळ भाषा असल्यामुळे कोणताच लेख कंटाळवाणा वाटत नाही. उलट, लेखिकेने स्वतःची मते मांडताना काही काव्य पंक्ती, सुभाषिते यांचा वापर केलेला असल्यामुळे लेखांचे लालित्य वाढत गेले आहे. लेखिकेला पशू, पक्षी यांबद्दल विशेष सहानुभूती असल्यामुळे त्यांच्याविषयी लिहीताना मात्र त्यांच्यातील गृहिणी दिसून येते. तसेच आपला देश आणि थोर विभूती यांच्याविषयी लिहीताना त्यांच्या मनातील देशप्रेम व आदर अगदी सहजपणे व्यक्त होतो. त्यांच्यावर लहानपणापासून झालेले संस्कार व त्यांनी त्यांची केलेली जपणूक त्यांच्या लेखनातून सहजपणे प्रतिबिंबित होते.
या लेखसंग्रहात एकूण सत्ताविस लेख समाविष्ट आहेत. काही लेख आकाराने लहान असले तरी विषयांची गरज लक्षात घेऊन लेखन केले असल्यामुळे त्यात अपुरेपण जाणवत नाही. आकाराने मोठे असलेले लेख हे माहीतपूर्ण व अभ्यासपूर्ण आहेत. लेखाच्या आकारापेक्षा आशय महत्वाचा असल्यामुळे सर्वच लेख वाचनीय झाले आहेत.
या लेखसंग्रहात निसर्ग, पर्यावरण, देश, देव, धर्म, समाज, पशुपक्षी, वृद्धांचे प्रश्न, सामाजिक संस्थांचा परिचय, पुस्तक परिचय, नदीजोड प्रकल्प, भारतीय रेल्वे अशा अनेक विषयांवर लेख लिहीलेले आहेत.
‘मला भावलेला गणेश ‘ या पहिल्याच लेखातून त्यांनी गणेशाच्या त्यांच्या कल्पना सांगताना ज्ञानमय, विज्ञानमय अशा गणेशाचे दर्शन घडवले आहे.
‘पर्यावरण आणि मी ‘ आणि ‘वटवृक्षाची सावली ‘ या दोन लेखांमध्ये लेखिकेने पर्यावरणाचे महत्त्व, त्याची होणारी हेळसांड, निसर्गाविषयीची माणसाची उदासीनता याविषयी सविस्तरपणे लिहीले आहे. वटवृक्षाचा इतिहास, महत्व, पौराणिक संदर्भ देऊन या वृक्षाचे जतन करणे कसे महत्वाचे आहे हे पटवून दिले आहे.
‘ अखंड सावधपण ‘ या लेखात निसर्गातील लहानसहान पशुपक्षी हे सतत किती सावध असतात व त्यांचा हा सावधपणा माणसाने कसा शिकण्यासारखा आहे हे पटवून दिले आहे. अमीबा, वाळवी, मुंग्या, झुरळ यांसारखे कीटक, नाकतोडा, टोळ, मधमाशा, कुंभारीण यांसारख्याचे सावधपण, विविध जलचरांचे सावधपणा, बदक, राजहंस, कोंबडी, सुगरण पक्षीण या सा-यांविषयी लिहिलेले वाचताना मनोरंजन तर होतेच पण आपले ज्ञानही वाढते. याशिवाय अस्वल, गेंडा, मोर, कुत्रा यांविषयीही त्यांनी लिहिले आहे. निसर्गात प्राणी, पक्षी सावध असतातच पण झाडांना देखील सावधपणा असतो, संवेदना असतात हे प्रयोगाने सिद्ध झाले आहे असेही त्यांनी नमूद केले आहे. हे संपूर्ण लेखन वाचताना लेखिकेच्या निरीक्षण शक्तीचे कौतुक करावेसे वाटते.
‘सहवासातून जीवन घडते’ हा लेख म्हणजे सर्व प्राणिमात्रांविषयी लेखिकेला असलेले प्रेम, सहानुभूती यांचे दर्शन घडवणारा लेख आहे. वृक्ष, वेली, वनस्पती यांच्यापासून उत्तम नैसर्गिक औषधे मिळत असतात. त्यांचे जतन, संवर्धन कसे करावे याविषयी सांगणारा लेख म्हणजे ‘वनौषधी संरक्षण’. काही दिवस चालवलेल्या स्वतःच्या टेलिफोन बूथ सेवेतून त्यांनी जपलेली समरसता ‘ सामाजिक समरसता ‘ या लेखातून स्पष्ट होते.
समान विकासासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नदीजोड प्रकल्प असे लेखिकेने आवर्जून सांगितले आहे. त्यांनी लिहीलेला ‘ नदीजोड प्रकल्प ‘ हा लेख अत्यंत अभ्यासपूर्ण लिहीलेला लेख आहे. या प्रकल्पाची ज्याला काहीही माहिती नाही त्याने हा लेख वाचल्यास संपूर्ण प्रकल्पाची कल्पना येऊ शकते.
असाच आणखी एक अभ्यासपूर्ण लेख म्हणजे ‘ भारतीय समृद्ध रेल्वे ‘ हा होय. भारतातील पहिल्या रेल्वेपासून अगदी या लेखाच्या लेखनापर्यंत झालेल्या प्रगतीचा आलेखच त्यांनी मांडला आहे. भारतीय रेल्वेचा व्याप किती मोठा आहे व तिला समृद्ध का म्हटले आहे हे लेख वाचल्यावरच समजून येईल.
‘ विवेकानंद स्थापित रामकृष्ण मिशनचे ऐतिहासिक कार्य’ या लेखातही त्यांनी मिशनचा सुरुवातीपासूचा इतिहास कथन केला आहे. सुरुवातीची बिकट अवस्था व नंतर होत गेलेला विस्तार व कार्य पाहून मन थक्क होते.
जनावरांसाठी समाजसेवा करणा-या संस्था, स्थानिक लोक, स्वतः:चा सहभाग याविषयी त्या ‘ माणुसकिचे व्रत ‘ या लेखात लिहीतात. दुस-या एका लेखात त्या त्यांना आवडलेल्या एका पुस्तकाविषयी लिहीतात. ‘ विश्व चैतन्याचे विज्ञान ‘ या डॉ. रघुनाथ शुक्ल या प्रकांड पंडित शास्त्रज्ञाचे हे पुस्तक असून अध्यात्म आणि विज्ञान यातील ज्ञानाचा संगम घडवणारे हे पुस्तक एकदा तरी वाचावे असे आहे याची खात्री पटवून देणारा हा लेख आहे.
‘आनंदाचे डोही ‘ हे अमरनाथ यात्रेचे सुंदर प्रवास वर्णन आहे तर ‘ एक झोका ‘ हे ‘ व्यक्तीचित्रणं.!. ‘ भक्तीयोग ‘ या लेखातून गीतेतील भक्तीयोगाविषयी त्या लिहितात. काही लेखांची शिर्षके त्यातील विषय स्पष्ट करतात. उदा. – मुलांना कसे वाढवावे ?, वृद्धाश्रमाची गरज काय आहे ?, विधुर(एक आत्मचिंतन) इत्यादी. पूर्वीची दिवाळी आणि आताची दिवाळी सण म्हणून एकच असले तरी ती साजरी करण्याची पद्धत कशी बदलत गेली आहे हे त्यांनी ‘ दिवाळी–कालची आणि आजची ‘ या लेखातून पटवून दिले आहे. मराठी भाषेविषयीचे त्यांचे प्रेम आणि आदर ‘ मराठीचा बोलू कौतुके ‘ या लेखातून व्यक्त होते.
जगताना आपण जीवन भरभरुन अनुभवणे आणि त्याचे विविध रंग इतरांनाही उलगडून दाखवणे यात लेखिका सौ. पुष्पा प्रभूदेसाई यशस्वी झाल्या आहेत. म्हणूनच या लेखसंग्रहाचे ‘जीवनरंग ‘ हे शिर्षक सार्थ ठरते. याच वृत्तीने त्यांनी अधिकाधिक लिहावे व जीवनाच्या सर्व अंगांचे दर्शन घडवावे यासाठी त्यांना शुभेच्छा.!
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈