?जीवनरंग ?

☆ नावात काय आहे ?….अ.ल.क. – सुश्री कल्याणी पाठक ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी  ☆

१ —

“आजकालच्या मुलींचं कसलं बाई फॅड? लग्नानंतरही माहेरचं नाव लावतात ! एकदा लग्न झालं की सासरचीच ओळख हवी मुलीला ! आपली पूर्वापार रीत आहे ती!” आजेसासूबाई सूनेजवळ सांगत होत्या.

“कसली पूर्वापार रीत आजी? ” नातसून बोलली.. “ अगदी जुन्या काळातील स्त्रियादेखील त्यांच्या माहेरच्या नावानं ओळखल्या जायच्या..! महापतिव्रता म्हणून पुजली जाणारी सीता देखील जनकाची जानकी, विदेह राजाची वैदेही अन् मिथिलेची राजकन्या मैथिली म्हणून ओळखली जाते.. कौशल देशाची कौसल्या, कैकेय देशाची कैकेयी, द्रुपद राजाची द्रौपदी, गांधार देशाची गांधारी….. ” 

“हे खरंय हो तुझं..” आजेसासूबाईंनी चूक मान्य केली….. ” पर्वतराजाची कन्या ती पार्वती अन् गिरीकन्या गिरिजा..!” त्या हसत म्हणाल्या.. ” सगळ्याच पतिव्रता.. पण माहेरची ओळख जपली त्यांनी.. आपणही जपायला हवीच !” आजेसासूबाई विचारमग्न झाल्या..

*****

२—

” नाव सांगा !” दवाखान्यात नाव लिहून घेणाऱ्या कर्मचाऱ्यानं घोगऱ्या आवाजात विचारलं.

” नंदिनी जोगळेकर “

विचारणाऱ्याची नजर सांगणारीच्या गळ्याकडे.. भुवया उंचावलेल्या.. चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव अन् पुन्हा तोच खर्जातला आवाज ..” कुमारी लिहू का सौभाग्यवती? “

” काहीच लिहू नकोस.. नुसतं नंदिनी जोगळेकर पुरेसं आहे !”

विचारणारा खांदे उडवत पुन्हा कामाला लागला..

*****

३ —

“आपलं नाव? ” कुठल्याशा गाण्याच्या कार्यक्रमाकरिता गायकांच्या नोंदणीवेळी विचारलं गेलं.

” राधिका आपटे मिरासदार..” 

“आता ह्यातलं सासरचं आडनाव कोणतं अन् माहेरचं कोणतं एवढं सांगून टाका बुवा !” समोरून बेधडक प्रश्न.

” स्पष्टीकरण देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ‘राधिका आपटे मिरासदार’ ही माझी ओळख आहे.. दॅट्स इट !”

” काय पण आजकालच्या बायका..!” समोरून बेदरकार  प्रतिक्रिया.

*****

४  —

” नमस्कार, मी मिस्टर सानवी जोगळेकर.. मला जोगळेकर मॅडमला भेटायचंय..” समिहननं रिसेप्शनला विचारलं अन् त्याच्या आजूबाजूला खसखस पिकली.

” अगं हा समिहन मुजुमदार.. जोगळेकर मॅडमचा नवरा.. हादेखील मोठ्या पदावर आहे.. मॅडमइतकाच !” कुणीतरी माहिती पुरवली.

” पण ही काय ओळख सांगायची पद्धत झाली ? बायकोने नवऱ्याच्या नावाने ओळख दिली तर ठीक आहे.. पण हे नवऱ्यानं बायकोच्या नावानं ओळख देणं जरा विचित्र नाही वाटत ?” कुणीतरी कुजबुजलं..

” नाही वाटत..” समिहननंच उत्तर दिलं.. आणि बायको कर्तबगार असेल तर मुळीच नाही वाटत.. उलट अभिमानच वाटतो.. प्राचीन ग्रंथांतूनही दाखले आहेत.. प्रत्यक्ष महादेवांनी स्वतःला उमाकांत म्हणवून घेतलंय.. अन् विष्णूंनी रमाकांत.. रामालाही सीताकांत म्हणून ओळख आहेच की, शिवाय विठोबाला रखुमाईवल्लभ!

सारेच निशब्द !——

लेखिका : सुश्री कल्याणी पाठक

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments