सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ तिघंच ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

“मि. भागवत, मी काय सांगणार आहे, हे तुम्हाला ठाऊकच आहे. आता त्याचे फारच थोडे दिवस राहिलेत. किती, ते सांगता येणार नाही. तो हॉस्पिटलमध्ये राहिला, तर आम्हाला फायदाच आहे. पण त्याच्याकडे बघून जीव तुटतो. म्हणून सांगतो, त्याचे उरलेले दिवस घरच्या वातावरणात जाऊ देत. तो आनंदी राहील, याची काळजी घ्या. ही इज अ ब्रेव्ह बॉय!  मला कधीही कॉल करा. मी लगेचच येईन.रोज रिपोर्ट करत जा.”

“थँक यू, डॉक्टर.”

त्याला पार्टी आवडते, म्हणून मॉम -डॅडनी पार्टीज अरेंज करायचं ठरवलं. रोज वेगवेगळे ग्रुप्स, रोज वेगवेगळ्या थिम्स, रोज वेगवेगळे मेन्यू, रोज त्याच्या आवडीचे वेगवेगळे केक. आमंत्रणं देताना ‘त्याच्या तब्येतीचा विषय काढू नका, प्लीज.’अशी विनंती करायला विसरायचे नाहीत ते.

अशीच धमाल चालली होती. तोही व्हीलचेअरवरून पार्टीत सामील होत होता.लोक मॉम -डॅडच्या अपरोक्ष त्यांच्या धैर्याची प्रशंसा करत होते.

“खर्च वाढतोय ना रे?”

“जाऊदे गं. लोन घेऊ लागल्यास. पुढे आयुष्य पडलंय लोन फेडायला. पण त्याचा क्षण- न- क्षण आनंदात गेला पाहिजे.”

“हो रे. खुश असतो तो या जल्लोषात.”

त्या दिवशी सर्वांत शेवटी निघाली, मॉमची आतेबहीण. तिला निरोप देताना दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडल्या.

ती निघाल्यावर तोंड धुवायला जाण्यापूर्वी मॉम त्याच्या खोलीत डोकावली.

तसा उशीर झाला होता ;पण तो जागाच होता.

“मॉम, डॅडलाही बोलव  ना.”

तेवढ्यात रुमालाने तोंड -डोळे पुसत डॅडही आलाच.

“मॉम, डॅड, मला ठाऊक आहे-डेथ कोणत्याही मोमेन्टला मला घेऊन जाईल. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे. मला उरलेले दिवस, उरलेल्या मोमेन्ट्स तुमच्याबरोबर घालवायच्या आहेत. फक्त तुमच्याबरोबर. पार्टीत तुम्ही दोघं हरवूनच जाता. मला मिळतच नाहीत.

आजपासून तुम्ही दोघं माझ्याबरोबरच थांबा. मॉम, आजपासून सिस्टर नाही, तू मला भरव. डॅड, तू मला बुक्स वाचून दाखव. आपण तिघं गेम्स खेळूया. प्लीज.

सिस्टर खूप चांगली आहे. शी केअर्स फॉर मी. शी टेक्स गुड केअर ऑफ मी. पण तिला रूमच्या बाहेर थांबायला सांगा. इकडे फक्त आपण तिघंच राहूया. तिघंच.”

 

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Shyam Khaparde

भावपूर्ण रचना