सौ.ज्योत्स्ना तानवडे

? जीवनरंग ?

☆ खेळी…भाग 2 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

(मधुराकडे पाहताना रागिणीला एकदम शेवंताची आठवण झाली.)

रागिणीच्या घरासमोरच्या प्लॉटमध्ये वाॅचमन म्हणून तिचा नवरा आणि ती राहत होते. त्यांना तीन लहान मुले होती. शेवंता काही घरी घरकाम करी. नवरा रोज दारू पिऊन यायचा. त्यावरून दोघांचे भांडण व्हायचे.तो सतत तिला ‘घरातून चालती हो’ म्हणायचा. पण तिने कधी घर सोडले नाही. दारू उतरली की नवरा एकदम सरळसोट व्हायचा. एक शब्दही बोलायचा नाही.हे नेहमीचेच होते.

पण काल सकाळी दोघांचे भांडण आणि मुलांचे रडणे खूपच जोरजोरात ऐकू येऊ लागले. दंगा ऐकून रागिणीने पाहिले तर, शेवंता खरंच घर सोडून चालली होती. मागे धावणाऱ्या मुलांना धपाटे घालत दूर ढकलत होती.धाकट्या मुलाने तिच्या पायाला मिठी घातली. नवरा म्हणत होता,” जा,जा. चालती हो.”

शेवंता ओरडली,” चाललीयाच म्या. रोज मरमर राबायचं, वर आनि तुजा मार खायाचा.कंच्या द्येवानं सांगितलया.त्यापरास जातीया म्या.”

“अग, खुशाल जाना. कोन आडवतंय तुला?  तुजी आनि मुलांची ब्याद गेली ,का म्या माज्या मनापरमानं जगाय मोकळा हुईन.”

 शेवंता उसळलीच,” अरं वारं, र वा.बरा मोकळा व्हशील तू.म्या तशी सोडणार न्हाय तुला.  म्या कशाला मुलांना घेऊन जातीया? मुलं तुजी बी हाईत.ती तुजी तुला लखलाभ व्हवू देत. त्यांचं काय करायचं ते तुजं तू बग. म्या निघाले.”

 नवरा एकदम सटपटलाच.” काय म्हणालीस तू ?  ए माजी बाय, आसं काय करू नगस बग.आगं मुलांचं म्या काय करू?तू त्यांना गपगुमान घेऊन जा बग.”

 कमरेवर हात ठेवत शेवंता ठसक्यात म्हणाली,” आजाबात नेनार नाय. नीट आईक म्या काय सांगतीया ते.म्या नेनार नाय. या घरात लगीन करून येताना म्या येकलीच आली व्हती. आता जातानाबी म्या येकलीच जानार हाय. मुलांचं भ्या मला दावू नगस. म्या येकलीच जानार म्हनजे येकलीच जाणार.”

 आता मात्र नवऱ्याची दारू खाडकन उतरली. पुढे धावत तो शेवंताला अडवू लागला. हात जोडून गयावया करू लागला. मुलं पण तिला बिलगली. तो पुन्हा पुन्हा सांगत होता,” अगं,पुन्ना म्या दारुला हात लावनार न्हाई. खरं सांगतो.तुला तरासबी देणार न्हाई. पन तू घर मोडू नगस. चल घरात चल.” नवऱ्याच्या विनवणीनं तिनं मुलांना जवळ घेतलं आणि ती घरात परत गेली .

क्रमशः….

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

सातारा 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments