सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ तीन माहेरं… भाग-२ – मूळ गुजराती लेखिका : सुश्री गिरिमा घारेखान – हिन्दी अनुवाद : श्री रजनीकांत शाह ☆ मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पाहिले – त्यानंतरचं वर्ष कसं गेलं, मला कळलंच नाही. माझा मेंदू वर्षभर जसा काही मूर्छित अवस्थेतच होता. मला इतकंच आठवतं, माझे आई-बाबा मला घरी नेण्यासाठी वारंवार येत असत आणि माझ्या सासू-सासर्यांचे दु:खी चेहरे बघून मी त्यांना येत नाही असं म्हणत असे. आपल्याला आश्चर्य वाटेल, की तोरलच्या दुसर्या वाढदिवसानंतर, त्यांनीच माझ्या दुसर्या लग्नासाठी मला तयार केले. मलाही वर्षाभरात लक्षात आलं होतं, की एका तेवीस वर्षाच्या विधवेसाठी एकटीने पूर्ण आयुष्य घालवणं किती मुश्कील आहे. माझे मोठे दीर आणि जाऊबाई तोरलला दत्तक घायला तयार होते, पण मीदेखील एक अट घातली, ‘जो माझ्यासोबत तोरलचाही स्वीकार करेल, त्याच्याशीच मी लग्न करेन.’) आता इथून पुढे —-
एके दिवशी माझ्या सासर्यांनी, तुषारने दिलेली, ‘जीवनसाथी हवा’, ही जाहिरात वाचली.
त्यात लिहिलं होतं, एका मुलाचा बाप, तरुण विधुर, याला जीवनसाथी हवा आहे. माझ्या सासर्यांनी शोध घेतला. मालवच्या जन्मानंतर हेमा दीदीचा मृत्यु झाला होता. मी व तुषार भेटलो. तो मला तोरलसह स्वीकारणार होता. तो म्हणाला, ‘आईशिवाय मूल कसं कासावीस होतं, ते मला माझ्या मालववरून लक्षात येतय. आई असताना तोरलला आईपासून दूर कशाला ठेवायचं?’
माझ्या आई-वडलांना समजावत, माझ्या सासू-सासर्यांनीच माझं कन्यादान केलं. माझे मोठे दीर माझे भाऊ बनले. मी आणि तुषार प्रेमाच्या बंधनात बांधलो गेलो. आमचा चतुष्कोनी परिवार पंचकोनीय बनवायचा नाही, हा निर्णय आम्ही दोघांनी घेतला. मालव आणि तोरल थोडे मोठे झाले, तेव्हा आम्ही सगळं त्या दोघांना सांगितलं. बाहेरून कुठून तरी कळलं असतं, तर आपली फसवणूक करताहेत, असं त्यांना वाटलं असतं. म्हणूनच हेमा दीदी आणि मिनेशच्या मृत्युनंतर दहा वर्षांनी त्यांच्याकडून श्राद्धविधी करवला. वातावरण शांत होतं आणि मी अगदी स्तब्ध. ‘सावत्र आई’ आणि ‘सावत्र बाप’ या शब्दांना आपल्या समाजाने केवढं भयंकर रूप दिलय! ते जीवतोड प्रेमही करू शकतात, हे तोरलला तुषारबरोबर आणि मालवला मेघाबरोबर पाहिलं, तरच कळेल.
त्या दिवशी तुषार आणि मेघा माझ्या आदराच्या सर्वोच्च शिखरावर आरूढ झाले. मला वाटू लागलं, ती दोघे नि:स्वार्थ प्रेमाचे साक्षात उदाहरण आहेत. या संसारात कुणी तरी दुसर्यासाठी थोडंसं जरी केलं, तरी त्याचा गवभर डांगोरा पिटतात. इथे सावत्र मुलांना आपल्या पापण्यांच्या सावलीत ठेवत हे दोघे आई-वडील जगाला याची खबरदेखील लागू देत नव्हते. माझ्या आणि मेघाच्यामध्ये जो स्नेहबंध निर्माण झाला होता, तो या घटनेनंतर अधीकच दृढ झाला. माझ्या इथल्या अनेक जबाबदार्या तिने आपल्या शिरावर घेतलेल्या होत्या. त्यामुळे मालवच्या व्रतबंधासाठी ती जेव्हा महिनाभर राजकोटला गेली, तेव्हा मला वाटलं, मी माझा उजवा हातच गमावलाय. महिनाभराच्या सुटीनंतर जेव्हा ती परत आली आणि मला फोन केला, तेव्हा मला हुश्श्य झालं. माझी खूप काही कामे राहिली होती. पण तिच्या बोलण्यातून वाटत होतं, की महिन्याची सुट्टी तिला खूप कमी पडली आणि कुणाकडेही मनसोक्त रहाता आलं नाही.
यानंतर जानेवारीत ओणमच्या पार्टीत आम्ही वारंवार भेटत राहिलो. दर वेळी ती नव्या साडीत नटून- थटून येत होती. एकदा तिला सहज विचारलं, ‘राजकोटहून खुपशा साड्या खरेदी करून आणलेल्या दिसताहेत!’
‘नाही दीदी! या सगळ्या साड्या मालवच्या मुंजीच्या वेळी माझ्या माहेरून मला आलेल्या आहेत.’
‘इतक्या?’
‘का बरं? आपल्याला तर माहीतच आहे ना, मला तीन तीन माहेरं आहेत. ’
मी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघत राहिले. मला काहीच कळत नव्हतं. मी म्हंटलं,
‘तीन माहेरं? असं कधी ऐकलं नव्हतं. ’
‘दीदी’, लहान मुलाला समजावावं, तसं मेघा म्हणाली, ‘पहिलं म्हणजे, माझ्या आई-वडलांचं
घर माझं माहेर आहे ना! ’
‘हो! पण मालवचा…’
‘अरे, माझ्या मुलाच्या मुंजीसाठी आजी, आजोबा, मामा यांच्याकडून मामेरा (मामाकडूनआलेली भेट) नाही का होणार? ‘ अगदी सामान्य गोष्ट बोलते आहे, अशा सुरात मेघा म्हणाली. मेघाचे आई-वडील, तिच्या नवर्याच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलाला मामेरा करतील? मी माझं आश्चर्य लपवत तिला विचारलं, ‘आणि दुसरं माहेर? ’
‘अरे दीदी, हेमा दीदीची जागा मी घेतलीय, तेव्हा, तिच्या आई-वडलांची मुलगीच झाले की नाही मी? मी जेव्हा राजकोटला जाते, तेव्हा त्यांच्याकडे जाऊन रहावंच लागत. त्यांनी तर आत्तापासून तोरलच्या लग्नासाठी सोनं खरेदी करायला सुरुवात केलीय आणि मालव तर त्यांचा नातूच आहे ना! आपल्याला सांगू का दीदी, चार-पाच दिवसात माझा फोन झाला नाही, तर त्या लोकांना माझी काळजी वाटू लागते. पुढच्या महिन्यात दोघेही आमच्याकडे राहायला येणार आहेत, तेव्हा मी तुमची भेट घालून देईन. “
मला कळेना, की कोण जास्त वंदनीय आहे? पतीच्या पहिल्या बायकोचे आई-वडील…. त्यांना इतका सन्मान देणारी मेघा की आपल्या मृत मुलीच्या जागी आलेल्या स्त्रीला इतकं प्रेम देणारी ती वृद्ध दंपती?
पण तिसरा धक्का तर आता बसणार होता. जेव्हा मी मेघाला विचारलं, ‘आणि तिसरं माहेर? ’ मग हसत हसत म्हंटलं, ‘वाटतय, तुझे सासू-सासरे खूप चांगले असणार. त्यामुळे तुषारचं घर तुला माहेरच वाटत असेल! होय ना! ’
माझी थट्टा समजून मेघाही हसली. माझा हात धरून म्हणाली, ‘हो! ती दोघे चांगलीच आहेत. पण आपण विसरलात, माझं कन्यादान कुणी केलं? ‘
‘पण ते तर मिनेशचे आई-वडील ना! ते का….? ’
‘आपल्या लक्षात येत नाही दीदी! माझं कन्यादान त्यांनी केलं. म्हणजे मी त्यांची पण मुलगीच झाले ना! मग ते घर पण माझं माहेरच की! मला आणि तुषारला आमच्या दोन्ही मुलांना घेऊन, माझ्या त्या माहेरीही रहायला जावं लागतं. मालवसाठी मामेरा तिथूनही झाला.
‘पण मालव तर तुषारचा….. ’
‘अरे दीदी, आपण माझ्या नणंदेला यशोदेला ओळखत नाही. आमच्या विवाहाच्या वाढदिवसाला सगळे इथे येतील, तेव्हा तिला भेटा. मला दुसरा जन्म तीनेच तर दिलाय. कारण, मिनेश गेल्यानंतर मी जिवंत कुठे होते? फक्त श्वास हेत होते, एवढंच! ’
अश्रुभरल्या डोळ्यांच्या मेघाच्या गळ्यातलं, चांदीच्या घंटेच्या किणकिणाटासारखं हसू तितकच मधुर होतं. माझ्या डोळ्यांच्या मेघातून स्नेहवर्षाव झाला.
मी विचार करू लागले, या तरुणीला, तिच्या पतीला, पुर्या परिवाराला काय नाव देऊ? प्रेमाचं मेघधनुष्य? आपल्या जगात सख्खी भावंडसुद्धा छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडतात. ईर्षा आणि अहंकारासाठी दुसर्याच्या विरुद्ध षडयंत्र रचतात. प्रपंचाच्या भिंती तुटतात आणि दगड ढासळतात. अशा जगात असाही एक संसार वसतोय.
त्यावेळी मला मेघाला साष्टांग दंडवत घालावं, असं वाटू लागलं. मी तिच्या कपाळाचा मुका घेतला आणि तिचे दोन्ही हात हातात घेऊन अवाकशी उभी राहिले.
— समाप्त —
☆☆☆☆☆
मूळ गुजराती कथा – त्रण पियर
मूळ गुजराती लेखिका – सुश्री गिरिमा घारेखान
मो. – ८९८०२०५९०९
हिन्दी अनुवाद – तीन मैके
अनुवादक – श्री रजनीकांत शाह
मो – 9924567512
मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈