श्री जगदीश काबरे
☆ “दोन ध्रुव… दोन वाटा…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
साताऱ्याच्या डोंगररांगेत वसलेलं एक खेडं – आंधळीवाडी. नाव तसं विचित्र, पण गाव वाईट नव्हतं. शेकड्याने शेतकरी, थोडे शिक्षक, काही गावसेवक, आणि दोन व्यक्ती ज्यांच्याभोवती गाव फिरत असे त्या होत्या गणू बाबा आणि राहूल मास्तर.
गणू बाबा गावाच्या मंदिराचा पुजारी. तो फक्त मूर्तीपूजक नव्हता तर, लोकांचा ‘आध्यात्मिक आधार’ होता. अंगात केशरी शाल, गळ्यात रुद्राक्ष, कपाळावर भस्म. अर्धे गाव त्याला साक्षात देवदूत मानत असे. बायका त्याच्या पाया पडून प्रसाद घेत, आणि पुरुष त्याच्या सल्ल्याने जीवन जगत.
दुसरीकडे, राहूल मास्तर सरकारी शाळेतील तत्त्वचिंतक ध्येय्यासक्त शिक्षक, पंचविशीतच मास्तर झालेला. पण त्याचा अभ्यास थेट विद्यापीठातील विद्यावाचस्पतीसारखा! चार्वाक, बुद्ध, आंबेडकर, आणि विवेकानंद यांच्या ग्रंथांनी त्याचं ग्रंथालय समृद्ध होतं आणि गावात तात्विक चर्चा घडवून आणणं तो त्याचं कर्तव्य समजत होता.
गणू बाबा म्हणे, “श्रद्धा ठेवा, देव सर्व पाहतो आहे.”
राहूल मास्तर म्हणे, “विचार करा, मानव स्वतःचं भविष्य घडवू शकतो.”
गावात कोणतंही संकट आलं, की ही दोन मते समोरासमोर येत. एकदा पिकांवर किड पडली. तेव्हा गणू बाबा म्हणाला, “मृत्युंजय यज्ञ करू.”
मास्तर म्हणाला, “कृषी अधिकारी बोलावू.”
लोक गोंधळले, पण बहुतेक वेळा जसा विचार मागे पडतो आणि धार्मिक भावना जिंकतात, तसंच यावेळीही झालं आणि वैज्ञानिक विचार मागे पडला. लोकांनी उत्साहाने यज्ञ केला. पण पिकावरील कीड काही गेली नाही. शेवटी कृषी अधिकाऱ्याला बोलवून योग्य त्या रसायनांची फवारणी केल्यावरच कीड गेली. अध्यात्म हरलं आणि विज्ञान जिंकलं. विज्ञानाची महती लोकांना कळली पण अजूनही गावकऱ्यांमध्ये धार्मिक पगडा मात्र घट्ट रुजलेला होता.
गावात एकदा गंभीर साथीचा रोग पसरला. मुलं तापाने फणफणली, वृद्धांना धाप लागली. गणू बाबा म्हणाला, “शिव अभिषेक करूया, रोग निघून जाईल. ”
राहूल मास्तर सरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात धावला, डॉक्टरांना घेऊन आला, आणि लसीकरण सुरू केलं.
पण त्याच्या या कृतीवर टीका झाली. “मास्तर देवावर अविश्वास दाखवतो”, “पाप ओढतो”, असं गावात बोललं गेलं. एकदा तर मंदिरासमोर त्याच्यावर राग व्यक्त करत, काही गावकरी म्हणाले, “हा नास्तिक गावाला अपशकुन आहे.”
राहूल मास्तर जखमी नजरेने पाहत राहिला. पण लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाने जागवण्याचे कठीण कार्य शांतपणे करत राहिला.
खरं पाहता, गणू बाबा आणि राहुल मास्तर दोघेही बालमित्र. लहानपणी एकाच विहिरीवर पोहायला शिकले, एकत्र अभ्यास केला, पण नंतर वाटा वेगळ्या झाल्या. गणूने वडिलांनंतर मंदिराचा कार्यभार हाती घेतला, आणि राहूल पुण्यात शिक्षणासाठी गेला.
गणू बाबा नेहमी म्हणत असे, “मी देवासाठी जगतो.”
राहूल म्हणत असे, “मी माणसासाठी जगतोय… माणसातच देव आहे असे मी समजतो.”
दोन ध्रुवावर दोघे आपण अशी दोघांची दोन टोकांची मते असली तरी त्यांच्या मैत्रीत अंतराय आला नव्हता. दर महिन्याला एकदातरी दोघं झाडाखाली असलेल्या टपरीत चहा घेत आणि गप्पा मारत. गणू बाबा त्याला म्हणे, “तुझं नास्तिकपण मला समजत नाही रे.”
राहुल मास्तर म्हणे, “तुझं आंधळेपण मला सहन होत नाही बाबा.”
… आणि दोघांनाही एकदम हसू फूटायचं.
ती रात्र मात्र गावासाठी काळरात्र ठरली. त्या रात्री मुसळधार पाऊस पडत होता, ओढ्यानं पुर आलेल्या नदीसारखं रौद्र रूप धारण केलं होतं. गणू बाबाचं मंदिर अर्धं पाण्याखाली गेलं होतं, तर राहुल मास्तरचं घर मोडकळीस आलं होतं.
राहूल मास्तरने गावकऱ्यांना शाळेत नेलं. कारण शाळा उंचावर होती. त्याने प्रत्येक घरात जाऊन, पाण्यातून वाट काढत लोकांना बाहेर काढलं. पण गणू बाबा मंदिर सोडायला तयार नव्हता.
“माझा देव आहे इथे. माझी त्याच्यावर निष्ठा आहे. तोच वाचवेल, ” तो म्हणाला.
राहुल मास्तर त्याच्याजवळ गेला. “बाबा, निष्ठा असली तरी निसर्गापुढे शहाणपण चालत नाही. तू जर खरोखर देवावर श्रद्धा ठेवतोस, तर देवळातून बाहेर ये आणि गावातील माणसांना मदत कर. ” पण गणू बाबा काही हलेना. शेवटी, राहुल मास्तराने त्याला उचलून गाडीवर टाकलं आणि शाळेत घेऊन गेला.
पूर ओसरला. निसर्गाच्या प्रकोपात दोन शेतकरी मरण पावले होते. गाव विस्कळीत झालं होतं. पण लोकांनी एक गोष्ट अनुभवली की, गणू बाबा आता फक्त देवाच्या नावानं बोलत नव्हता. तो मास्तरबरोबर गावात फिरत होता. लोकांना स्वच्छतेचं महत्त्व सांगत होता, अन्नवाटपात मदत करत होता. राहूल मास्तरही आता देवावर टीका करताना लोकांना चिकित्सक प्रश्न विचारू लागला, आणि लोकांना विचार करायला भाग पाडत होता. श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते हे लोकांना तो वेगवेगळ्या उदाहरणांनी पटवून देऊ लागला. तसेच निष्ठा ही फक्त विचारात नाही, तर कृतीत दिसावी लागते हेही लोकांना प्रत्यक्ष निसर्गाच्या प्रकोपात त्याच्या वागणुकीने दाखवून दिले.
एक दिवस दोघांनी गावात ‘विचारवेध संमेलना’चं आयोजन केलं. विषय होता – “श्रद्धा की निष्ठा? “
गणू बाबा म्हणाला, “माझी श्रद्धा मला संकटात आधार देत होती, पण लोकांसाठी धावून निष्ठा दाखवली राहूल मास्तराने. देवावरच्या माझ्या श्रद्धेमुळे मी जर त्या दिवशी हल्लो नसतो तर कदाचित निसर्गाचा प्रकोपात मेलोही असतो. पण राहुल मास्तरामुळे मी वाचलो. आता मी समजलो आहे की, केवळ देवपूजा नव्हे, तर माणसांची सेवा हेच खरे भक्तीचे लक्षण आहे. देव माणसातच असतो हे आता माझ्या लक्षात आले आहे. ”
राजू मास्तर म्हणाला, “मी नास्तिक आहे, पण भावना नाकारत नाही. गणू बाबासारखी देवावर श्रद्धा ठेवणारी माणसं जर कृतीशील झाली, तर त्यांच्या श्रद्धेला काही अर्थ प्राप्त होतो. तर्क हे शस्त्र असलं, तरी माणुसकीने जगणे हीच खरी वाट आहे. ”
एके दिवशी दोघं पुन्हा त्याच झाडाखाली भेटले.
गणू बाबा म्हणाला, “मास्तर, तू नास्तिक असून देवासारखं वागतोस. ”
राजू मास्तर हसला, “… आणि तू देवभक्त असूनही सर्व माणसांशी माणसासारखं वागायला लागलायस! “
☆
© श्री जगदीश काबरे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈