श्री दीपक तांबोळी

 

? जीवनरंग ?

☆ पाणी… भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

तिकीट काढून देवबा मुर्तिजापूरच्या स्टेशनमध्ये घामाघूम होत शिरला तेव्हा दुपारचे तीन वाजून गेले होते. मे महिन्याची ती दुपार. हवेत भयंकर उष्मा होता. अंगाची लाहीलाही होत होती. प्लॅटफाॅर्मवरच्या बाकावर त्याने नातवांना बसवलं. गर्मीमुळे त्यांचेही चेहरे सुकून गेले होते. भुसावळकडे जाणारी पॅसेंजर लेट झाली होती आणि तिला यायला अजून अर्धा तास अवकाश होता. थोडं पाणी प्यावं म्हणून त्याने पिशवीतली बाटली काढली तर ती रिकामी. ती ठेवून त्याने दुसरी बाटली काढली तर तीही रिकामीच. चमकून त्याने दहा वर्षाच्या नातीकडे पाहिलं तशी ती म्हणाली

” दादूने पिऊन टाकलं सगळं पाणी “

त्याने रागाने नातवाकडे पाहून विचारलं

“व्हय रं बेटा? “

नातवाने निरागसपणे मान डोलावली. त्याच्या चेहऱ्यावर केविलवाणे भाव उमटले. आजोबा आता मारतो की काय अशी भिती दाटून आली. देवबा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून वरमला. त्याचा स्वतःचाच जीव तहानेने कासावीस होत होता. ही तर लहान मुलं होती. बसमध्ये देवबाचा डोळा लागलेला असतांना दोघा मुलांनी पाण्याचा थेंब न थेंब संपवून टाकला होता. त्यांच्यावर रागावून काहीच फायदा नव्हता. देवबाने रिकाम्या बाटल्या घेतल्या आणि तो प्लॅटफाॅर्मवर पाण्याचा शोध घेऊ लागला. पण एकाही नळाला थेंबभरही पाणी नव्हतं. त्याने समोरच्या प्लॅटफाॅर्मवर नजर टाकली. तिथल्या नळांनाही पाणी दिसत नव्हतं. स्टेशनमास्तरच्या ऑफिससमोर उभ्या असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला त्याने विचारलं

” बाबूजी पाणी हाये का कुठं? लेकरासाठी पाहिजे हुतं “

कर्मचाऱ्याने त्याला वरपासून खाली बघितलं आणि म्हणाला

” बाबा मागल्या वर्षी पाणी पडलं होतं का? “

देवबाने नकारार्थी मान हलवली

” मंग कसं राहिन पाणी? आम्हांलेबी इथे प्यायले पाणी नाही. तुले कुठून दिवू? आमीबी बाहेरुन मागवतो. जाय त्या कॅन्टीनमधी लागो तितकं पाणी हाये” कँटीनकडे हात दाखवत तो म्हणाला. देवबा मोठ्या आशेने तिकडे गेला.

” बाबू पाणी हाये का? “

कॅन्टीनमधल्या माणसाने पटकन फ्रिजमधून पाण्याची बाटली काढून त्याच्यासमोर ठेवली

“बीस रुपया”

” बीस रुपये? नाय. मले लेकरांसाठी थोडंसंच पाणी… “

त्या माणसाने ताबडतोब बाटली उचलून फ्रिजमध्ये ठेवली.

“खुल्ला नही है पानी बाबा. बाहर जाओ, हाॅटलमें मिल जायेगा”

जिन्याने देवबा बाहेर आला. रोडावरच्या हाॅटेलमध्ये त्याने बाटली दाखवत पाणी मागितलं

” बाबा चाय पिना है तो पिलो. पानी नही मिलेगा. बोतल दे दू? बीस रुपयेकी है ” हाॅटेलमालकाने विचारलं.

देवबाने नकारार्थी मान हलवली आणि तो दुसऱ्या हाॅटेलवर गेला. तिथून तिसऱ्या. चहाच्या टपऱ्याही त्याने सोडल्या नाहीत. पण कुणीच त्याला पाणी दिलं नाही. बाटली विकत घ्यावी का असा प्रश्न त्याला पडला. पण त्यासाठी वीस रुपये खर्च करणं त्याच्या जीवावर येत होतं. देवबा म्हणजे शेतकरी माणूस. दोन एकरच्या कोरडवाहू शेतीचा मालक. शेजारच्या शेतातल्या विहिरीचं पाणी विकत घेऊन तो आपली शेती करायचा. मागच्या वर्षी पावसाने डोळे वटारले, धरणातलं, नद्यानाल्यातलं, जमीनीतलं पाणी सुकलं तशी ती विहिरही कोरडी पडली. निवडणुका आल्या की पाणीपुरवठ्याच्या योजनांच्या घोषणांचा पाऊस पडायचा पण मंत्रालयात जाहीर झालेला निधी सरपंचापर्यंत येतायेताच संपून जायचा. उन्हाळा आला की टॅंकर लाॅबी सक्रिय व्हायची. त्यात सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षनेतेही आपले खिसे भरगच्च भरुन घ्यायचे. गावं मात्र तहानलेलीच रहायची. कुणालाही निवडून द्या आपल्या नशिबात पाण्यासाठी मरमरच आहे हे सत्य गावाने आता स्विकारलं होतं. अर्थात देवबालाही हे माहीत झालं होतं. पाण्याचा तुटवडा झाला की तो दुसऱ्याच्या शेतावर जाऊन मजुरी करायचा. त्यातून त्याच्या पदरी दोन मुली, मुलगा नव्हता. कष्टाची आणि काटकसरीची देवबाला आणि त्याच्या बायकोला कायमची सवय जडली होती. मुलींच्या लग्नाचं त्याच्याही डोक्यावर कर्ज होतंच. पण मुली सासरी सुखाने नांदताहेत हीच त्याच्यासाठी समाधानाची बाब होती. शाळांना सुट्या लागल्या तसं भुसावळला रहाणाऱ्या धाकट्या मुलीने आपल्या मुलांना देवबाकडे सोडलं होतं. मुलांना गावात करमेनासं झालं म्हणून देवबा त्यांना भुसावळला सोडायला चालला होता. खरं तर देवबालाही त्यांनी रहावं असं वाटत नव्हतं. पाण्याचा प्रश्न बिकट झालेला. दहादहा दिवस पाण्याचा टँकर गावात यायचा नाही. आला की त्यावर मरणाची गर्दी व्हायची. दोन चार हंडे मिळाले की टँकर संपून जायचा. तेच मिळालेलं पाणी जपून वापरावं लागायचं. त्यातून नातवंडं दिवसभर पाणी मागत रहायची. मग देवबा सायकलवरुन

आठ किलोमिटरवरच्या ओळखीच्या शेतकऱ्याकडून विकत पाणी आणायचा. पण आता त्याचं वय झालं होतं. तेवढ्या श्रमाने तो प्रचंड थकून जायचा.

तो रिकाम्या बाटल्या घेऊन स्टेशनवर परतला. तहानेने त्याचाही जीव कासावीस झाला होता. नातवांजवळ तो आला तसं नातीने त्याला विचारलं

“आबा पाणी नाय मिळालं? दादू परत पाणीपाणी करतोय. मलेबी तहान लागलीये”

दोन्ही नातवांचा रडवेला चेहरा पाहून पाणी कुठून तरी आणावंच लागेल या विचाराने देवबा उठला. तेवढ्यात त्याची नजर थोड्याच अंतरावर बसलेल्या कुटुंबाकडे गेली. साताठ जणांच्या घोळक्यात एक मोठा वीस लिटरचा जार त्याला दिसला. पण त्या लोकांच्या कपड्यावरुन ते मोठ्या घरातील लोक आहेत हे देवबाला समजत होतं. कुठल्यातरी एक्स्प्रेस गाडीची ते वाट बघत असावेत. त्यांना पाणी मागणं देवबाला उचित वाटेना. ते नाहीच म्हणणार हे नक्की होतं. सध्या कोण कुणाला पाणी देतंय त्यातून देवबा असा फाटका शेतकरी माणूस. समोर उभं तरी करतील की नाही देव जाणे.

“आबा पाणी पाहिजे” नातवाने त्याच्या हाताला स्पर्श करुन सांगितलं. त्याने नातवाकडे पाहिलं तर तोही त्या जारकडे बोट दाखवत होता. आता हिंमत दाखवावीच लागणार होती. त्याने एक बाटली पिशवीत टाकली आणि एक बाटली घेऊन तो तिकडे गेला. ती माणसं काहीतरी इंग्रजीयुक्त मराठीत बोलत होती. देवबाला तिथून पळून जावंसं वाटू लागलं. तो घुटमळला आणि परत नातवांकडे जायला निघाला. पण पाणी तर नेणं आवश्यकच होतं. काय करावं त्याला सुचेना

“काय बाबा काय पाहिजे? “कुणीतरी विचारलं

” दादा जरा पाणी पाहिजे हुतं. लेकरं लय तहानलीयेत” 

तो एका माणसाला म्हणाला. तसे सगळेजण एकमेकांकडे बघायला लागले. त्यांचंही बरोबरच होतं. अशा भयंकर उष्म्यात आपलं पाणी दुसऱ्याला देणं म्हणजे स्वतःवर नामुष्की ओढवून घेण्यासारखंच होतं.

” अरे तिथे कँटीनमध्ये लागो तितक्या पाण्याच्या बाटल्या मिळतात. तिथून घ्या ना ” एक बाई चिडून म्हणाली

” बाबा हे पाणी आमचं स्पेशल पाणी आहे. उकळून थंड केलेलं. ते आम्हांलाच पुरणार नाही. तुम्हांला कसं देणार? “

एक माणूस म्हणाला तसा अवघडून देवबा परत जाण्यासाठी वळला.

” थांबा बाबा” 

देवबाने पाहिलं मध्यभागी बसलेला एक शेठजीसारखा माणूस त्याच्याकडेच बघत होता. देवबा थांबला तसा तो इतरांकडे बघत तो म्हणाला

“अरे पाणी विकत घेण्यासारखी बाबांची परीस्थिती असती तर ते आपल्याकडे पाणी मागायला आले असते का? आणि तहानलेल्याला पाणी पाजण्याइतकं पुण्य दुसरं नाही. बाबा किती जण आहात तुम्ही? “

” तीन जण “तीन बोटं दाखवत देवबा म्हणाला. त्या माणसाने खिशातून शंभरची नोट काढून एका तरुण मुलाला दिली आणि म्हणाला

“जा. बाबांना त्या कँटीनमधून तीन पाण्याच्या बाटल्या घेऊन दे”

देवबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. आंधळा मागतो एक देव देतो दोन अशी त्याची मनःस्थिती झाली. तो त्या तरुण मुलासोबत कँटीनकडे गेला. मुलाने थंड पाण्याच्या तीन बाटल्या त्याला विकत घेऊन दिल्या.

” दादा लय उपकार झाले”

देवबा म्हणाला तसा तो मुलगा समाधानाने हसला. देवबा नातवांकडे आला. थंड पाण्याची बाटली पाहून नातवंडही आनंदली. त्यांनी झडप घालूनच बाटली हिसकावून घेतली आणि तोंडाला लावली. देवबानेही दुसरी बाटली उघडली आणि आपला कासावीस झालेला जीव शांत केला.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments