डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ आऊटसायडर … — भाग – २  ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(पण तुम्हाला अशी विधवा मुलगी सून म्हणून चालेल का? मला तुमच्या बरोबर रहायचं आहे. पण तुम्ही नको म्हणालात तर मग मी सुभाषशी लग्न नाही करणार. ” – – कृपाचे डोळे पाणावले.) – इथून पुढे — 

चहा घेऊन कृपा निघून गेली. सुभाष आईबाबांजवळ बसला.

“आई, ही खूप चांगली मुलगी आहे. किती लहान वयात एकटीला रहावं लागतंय ग तिला. अमिता आणि कृपा मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे आई. मी अमिताच्या वेळी केली ती चूक पुन्हा करणार नाही. कृपाशी लग्न करून मी नक्की सुखी होईन आई. मी ओळखतो तिला.”

मीना मोहनने होकार दिला आणि तिचे आईवडील आणि हे चौघे असे अगदी घरातल्या घरात लग्न करून कृपा सुभाषच्या घरात आली.

कृपा घरात आली आणि मीनाच्या घरात सुख नांदायला लागलं. कृपा आली आणि घर हसायला लागलं.

तिचा मृदु आर्जवी स्वभाव, सगळ्याना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती, कामसूपणा नीटनेटकेपणा मीनाला आनंद देऊन जाई.

कृपाला दिवस गेले आणि या आनंदात आणखी भर पडली. तिला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं झालं मीनाला. कृपाला मुलगा झाला आणि मीना मोहन कृतकृत्य झाले. सुभाष कृपाचा सुकृत आजीआजोबांच्या छायेत मोठा होऊ लागला.

सुकृत दोन वर्षांचा झाला आणि कृपाच्या लक्षात आलं, गेले काही दिवस सुभाष अस्वस्थ आहे, त्याचं चित्त जागेवर नाही.

रात्री कृपाने विचारलं, “ काय झालंय सुभाष? ऑफिसमध्ये तर सगळं ठीक आहे की. का आहेस अस्वस्थ? मला सांगण्यासारखं नाहीये का ?”

सुभाष म्हणाला, “ नाही ग कृपा. मी काही तरी लपवून ठेवतो का तुझ्यापासून? गेले काही दिवस मला रोज अमिताचे मेल येतात. ‘ मला तुला भेटायचं आहे. माझं चुकलं. आपण परत एकत्र येऊ. मला पुन्हा संसार करायचा आहे तुझ्याशी. ’ ”

कृपाने स्थिर नजरेने सुभाषकडे बघितलं. “ मग तुझं काय म्हणणं आहे सुभाष? तिला सांगितलं आहेस ना, आता माझं लग्न झालंय आणि आपल्याला एक मुलगा सुद्धा झालाय हे? अजून तू गुंतला आहेस का तिच्यात?”

सुभाष म्हणाला, “ नाही ग कृपा. माझा जीव गुंतलाय तो तू आणि सुकृत मध्ये. पण ही म्हणालीय मी घरी येणार आहे तुझ्या. मी अस्वस्थ झालोय कृपा. मला ती यायला नकोय. कायद्याने रीतसर घटस्फोट झालाय आमचा. तरीही पुन्हा हे वादळ का? माझ्यावर विश्वास आहे ना कृपा तुझा?”

कृपाने त्याला जवळ घेतले… ” सुभाष, खुशाल येऊ दे तिला आपल्या घरी. मी बघते काय करायचं ते. तू निर्धास्त रहा. माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? मग झालं तर. कळवून टाक अमिताला की अमुक अमुक दिवशी तू जरूर ये. , फक्त त्या दिवशी तू आईबाबा कोणीच घरी राहू नका. मावशीकडे जा तुम्ही दोन दिवस. चालेल ना? मी सगळं नीट करीन सुभाष. आपला संसार मी मोडू देणार नाही. तू कळव तिला की कृपा तुझी वाट बघतेय. तू जरूर ये. ”

ठरलेल्या दिवशी कृपाच्या दाराची बेल वाजली. दारात अमिता उभी होती

“ये ग अमिता. आत ये ना. मी कृपा. सुभाषची बायको आणि आमचा मुलगा सुकृत शाळेत गेलाय. ये ना. ”

कृपाने अमिताचं हसतमुखाने स्वागत केलं.

अमिता सोफ्यावर बसली. समोरचं पेंटिंग न्याहळत म्हणाली, छान आहे हे. ” कृपा म्हणाली आवडलं? मी केलंय हे. मला खूप आवड आहे पेंटिंगची. पण या नोकरीपायी फारसं जमत नाही हल्ली. ”

अमिता म्हणाली, “छान ठेवलं आहेस तू घर. ” मग तिने चाचरत विचारलं, सुभाषचे आईबाबा कुठे आहेत?”

कृपा हसून म्हणाली, “ अग ते सगळे मावशींच्या फार्म हाऊसवर गेलेत दोन दिवस. तू आरामात बस ग. मग जेवूया आपण. मी रजा घेतलीय आज तू येणार म्हणून. ”

अमिता म्हणाली, ” नंतर जेवू आपण. पण माझं खूप चुकलं. मी आततायीपणे घटस्फोट घेतला सुभाषशी. पण इतकी वर्षे तिकडे एकटी राहिल्यावर मला आता पुन्हा संसार करायचा आहे. तोही सुभाषशीच. मला माहीत आहे, तो किती गुंतला होता माझ्यात ते.. अजूनही मला बघताच त्याच्या माझ्याबरोबरच्या मागच्या सुंदर आठवणी नक्की जाग्या होतील. मला माझी चूक सुधारायची आहे. मी पुन्हा लग्न करीन सुभाषशी. ” अमिता खात्रीने बोलत होती.

कृपा हसली म्हणाली, “अमिता, अजूनही तू होतीस तशीच उथळ राहिलीस बघ. निर्दयपणे तू सुभाषशी मांडलेला सोन्यासारखा डाव उधळून टाकलास. त्याच्या मनाचा विचार केलास का तेव्हा? उध्वस्त होणार होता तो. मी सावरलं त्याला तेव्हा. अग, संसार म्हणजे पोरखेळ का आहे? अग बाई, त्या लहान मुली देखील मांडलेली भातुकली जीव ओतून खेळतात. किती मन गुंतते त्यांचे त्या लुटुपुटीच्या खेळात सुद्धा. , तू तर खरा मांडलेला डाव निर्दयपणे उधळून टाकलास. आणि आता परत तो मांडू म्हणतेस? तोही त्याच सुभाषशी? तू आपण होऊन या घराचा उंबरा ओलांडलास अमिता. मी तुझी जागा घ्यायला तेव्हाही नव्हते आले… चल जेवता जेवता बोलूया. भूक लागली असेल ना?”

कृपाने अमिताला किचन मध्ये नेलं.

“ बस इथं. आज मी केलाय स्वयंपाक. नाहीतर हल्ली आमच्याकडे मावशी येतात दोन्ही वेळा स्वयंपाकाला. आईना होत नाही हल्ली काम फारसं.

कृपाने अमिताचे पान वाढले… तिच्या आवडीच्या अळू वड्या, सार, आणि गुलाबजाम पानात वाढले होते.

“ जेव सावकाश. “ आपलं पान वाढून घेत कृपा म्हणाली. अमिता संकोचली.

“ जेव ग पोटभर. मैत्रीण तर होऊ शकते ना मी तुझी? बाकीचे सोड. ”

बाहेर हॉलमध्ये आल्यावर कृपा म्हणाली, ” अमिता, तू आता या घरात उपरी आहेस. तुझे स्थान तू हाताने गमावलेस. आता ते तुला पुन्हा कसं मिळेल? कबूल आहे तू रुपगर्विता आहेस. सुंदरच आहेस. मी सामान्यच आहे तुझ्यापुढे दिसायला. पण लक्षात ठेव, रूप फार दिवसाचं नाही. गुण महत्वाचे. तू पुन्हा सुभाषला या रूपाचा जोरावर जिंकून घेशील हा भ्रम आहे तुझा. आता तू फक्त आउटसायडर आहेस या घरात. सुभाष आता माझा नवरा आणि आमच्या गोड मुलाचा पिता आहे. तू पाहुणी आहेस अमिता इथे.

पाहुण्याने चार दिवस यावं, पाहुणचार घ्यावा आणि निघून जावं. घरचा यजमान होण्याची अपेक्षा धरू नये. ”

.. कृपा शांतपणे बोलत होती. “ पुन्हा असा वेडेपणा करू नकोस. यायचं तर फक्त माझी मैत्रीण म्हणून ये. पण या घरची स्वामिनी मी आहे अमिता. सल्ला ऐकणार असलीस तर ऐक. अजूनही वेळ गेलेली नाही. इतकी हुशार देखणी मुलगी तू, लग्न कर आणि सुखी हो. लहान मुली करतात तसा हाच बाहुला मला हवा असा हट्ट करू नकोस. तो तुझ्यापासून कैक योजने लांब गेलाय अमिता. नव्हे, तूच दूर लोटलास त्याला. ”

कृपाने दरवाजा उघडला… 

“ सुखात रहा अमिता आणि आपल्या सुखाची नवी वाट शोध. नक्की मिळेल तुला. ”

अमिताचे डोळे भरून आले. कृपाला गच्च मिठी मारत ती म्हणाली, “ किती शहाणी आहेस कृपा तू.

मी हरले कृपा. सामान्य असूनही तू जिंकलंस सुभाषला आणि मला हरवलंस. ”

… अमिता वेगाने दार बंद करून बाहेर पडली.

– समाप्त –  

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments