श्री मंगेश मधुकर
जीवनरंग
☆ “वासुदेव…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
रविवारची आळसावलेली सकाळ, सात वाजण्याच्या सुमारास सोसायटीत झाडावरच्या पाखरांचा किलबिलाट आणि ये-जा करणाऱ्या गाड्यांचा आवाज सोडला बऱ्यापैकी शांतता. जॉगिंगवरुन परतलेले आकाश, कुणाल बाकावर मोबाइलवर गेम खेळण्यात मग्न होते. तितक्यात “वासुदेव आला हो वासुदेव आला”असं खणखणीत आवाजात ऐकायला येऊ लागलं आणि अंदाजे चाळीशीचा एक माणूस वासुदेवाच्या वेषात सोसायटीत आला. सुरेल आवाजात पारंपारिक गाणी म्हणत होता. ऐकायला फार छान वाटत होतं. काही वेळानं वासुदेव विश्रांतीसाठी बाकावर बसले. तेव्हा त्यांच्याकडे पाहून आकाश-कुणाल छदमीपणे हसले.
“यांचं बरंयं”आकाश.
“कुणाचं! ! ”कुणालनं विचारलं.
“अरे यांच्याबद्दल बोलतोय. शिक्षण नाही. नोकरी नाही. दिवसभर गाणी म्हणत फिरायचं. पैसे मिळतात आणि खायलाही म्हणतं. डबल फायदा! ! ”आकाश.
“हळू बोल. त्यांनी ऐकलं तर फालतूची लफडी होतील. ”
“खोटं काय बोलतोय. सालं, हाल तर आपल्यासारख्यांचे आहेत. जीव तोडून अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवले पण काय उपयोग??चार महीने झाले अजूनही जॉबच शोधतोय. ”आकाश
“खरंय यार! ! ”कुणालनं दुजोरा दिला. जवळच असलेल्या वासुदेवांनी दोघांचे बोलणं ऐकलं पण प्रतिक्रिया दिली नाही तेव्हा न राहवून आकाशनं थेटच विचारलं “बाबा, नशीबवान आहात”
“खरंय. म्हणून एवढं पुण्याचं कार्य हातातून घडतंय”वासुदेव प्रसन्न हसत म्हणाले.
“दारोदार फिरणं हे चांगलं काम??. ”आकाश
“याला भीक मागणं म्हणतात”कुणाल.
“हे काम आम्ही पिढ्यान पिढ्या करतोय”
“पूर्वजांनी केलं म्हणून तुम्ही पण तेच करता. धन्य आहे तुमची! ! ”आकाश.
“या सगळ्या आता गोष्टी आऊटडेटेड झाल्यात. लोकांचा रिस्पॉन्स सुद्धा मिळत नाही आणि तरीही हे करता. ऑड वाटत नाही. ”कुणाल.
“जमाना बदललाय म्हणून तर करतोय”वासुदेव.
“म्हणजे. समजलं नाही. ”
“जाऊ दे ना. तुला काय करायचं”आकाश वैतागला.
“एक मिनिट. जरा बोलू दे रे. दिवसभर फिरून होणाऱ्या कमाईवर घर चालतं”
“कसली कमाई???मी कोणाकडून काहीही घेत नाही. ”वासुदेव.
“अरे बाप रे! ! ”कुणाल पुढे काहीच बोलू शकला नाही.
“चांगले धडधाकट आहात दारोदार फिरण्यापेक्षा नोकरी करा. असं वणवण फिरून काय मिळणार”आकाश.
“वासुदेवाच्या रूपात समाधान आणि ऊर्जा मिळते. तुमच्या भाषेत सांगायचं तर फुल एनर्जी. ”
“रोज असं फिरून कंटाळा येत नाही”
“फक्त विकेंडला फिरतो”
“तरीच मी विचार करतोय की घर चालतं कसं?”कुणाल.
“कोणत्या कारखान्यात नोकरी करता”
“आय एम आय टी प्रोफेशनल, मल्टीनॅशनलमध्ये सिनियर मॅनेजर आहे”वासुदेवाचं ऐकून आकाश-कुणाल ताडकन उभे राहिले. नक्की काय रिऍक्ट व्हावं हेच लक्षात न आल्यानं फक्त एकटक पाहत राहिले.
“काय झालं. असे का पाहताय”
“सर, माफ करा. आम्ही मूर्खा सारखं बोललो. चूक झाली रियली सॉरी! ! ”आकाश.
“मी पण सॉरी! ! ”कुणाल.
“ईट्स ओके”
“एक विचारू. चांगला जॉब आहे मग हे वासुदेवाचं रूप??”
“स्वतःच्या आनंदासाठी आणि पिढ्यान पिढ्या चालत आलेली परंपरा टिकवण्यासाठी. पणजोबांपासूनचा वारसा चालवतोय. ”
“तेव्हा ठीक होतं आता कशाला?”
“काळाच्या ओघात वासुदेव सुद्धा लुप्त होईल. नवीन पिढीला माहिती व्हावी म्हणून छोटासा प्रयत्न आणि हा वारसा पुढे नेणारा आमच्या घराण्यातला कदाचित मी शेवटचाच असेल. ”
“असं का?”
“झेड जनरेशन मधला माझा मुलगा हे करेल की नाही याविषयी खात्री नाही. ”
“आजच्या काळातसुद्धा परांपरा टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातात हे कोणी सांगितलं असतं तर विश्वास बसला नसता. यु आर संपली ग्रेट! !
“ग्रेट वैगरे काही नाही मित्रांनो, यात माझाही स्वार्थ आहे. हा वारसा मिळाला म्हणून स्वतःला खूप भाग्यवान समजतो. पूर्वजांसारखं पूर्णवेळ हे काम करू शकत नाही कारण त्यावेळची परिस्थिती वेगळी आणि आताची तर फारच वेगळी आहे. म्हणून शनिवार-रवीवारचा थोडा वेळ देतो. हे कर असं कोणीही सांगितलं नाही की बळजबरी केली नाही. सगळा स्वखुशीचा मामला. नोकरी पोटापाण्यासाठी आणि हे स्वतःसाठी करतो. छंद म्हणा हवं तर….. लहानपणी वडिलांना पाहिलंय. सगळी गाणी तोंडपाठ आहेत. आजकाल इतरांसाठी जगताना स्वतःसाठी फार काही करत नाही. म्हणूनच स्वतःला रिचार्ज करण्यासाठी करतो. रुटीन कामासाठी एनर्जी मिळते. छान वाटतं”
“तुमचा हेवा वाटतो”आकाश.
“का?”
“परंपरा आणि आधुनिकता यांची सुंदर सांगड घालून आनंदी आयुष्य जगताय. ” आकाश.
“याविषयी घरच्याचं काय मत आहे आणि महत्वाचं म्हणजे लोक काय म्हणतील हा विचार डोक्यात आला नाही”कुणाल.
“घरच्याचा पूर्ण पाठिंबा आहे म्हणूनच हे शक्य आहे आणि लोकांचं फार मनावर घ्यायचं नाही कारण ते काहीतरी म्हणणारच. ”
“एक विनंती”
“सेल्फी” वासुदेव
“हो आणि परवानगी असेल तर व्हिडिओसुद्धा.. ”
“अवश्य करा. त्यानिमित्ताने वासुदेवाविषयी लोकांना माहिती होईल. ”आकाशनं शूटिंग सुरू केल्यावर तल्लीन होऊन वासुदेव गायला लागले…..
“उजळून आलं आकाश रामाच्या पारी,
अन गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी.
वासुदेव आला हो वासुदेव आला,
सकाळच्या पारी हरीनाम बोला,
वासुदेव आला हो वासुदेव आला”
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈