सौ. गौरी गाडेकर
जीवनरंग
☆ वृद्धाश्रम… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
मागच्याच आठवड्यात आईवडिलांच्या लग्नाचा ५१ वा वाढदिवस लेका सूनाने (राज आणि नेहाने) मोठ्या उत्साहात साजरा केला आणि दुसऱ्या दिवशी सून मुलांना घेऊन तिच्या माहेरी गेली.
राजने आई-बाबांना मॉलमध्ये नेले, त्यांच्यासाठी कपडे, बुट, चपला, चष्मा एवढेच काय अगदी टुथ ब्रश आणि कंगवे देखील खरेदी केले. छानशा हॉटेलमध्ये जेवण, त्यानंतर मराठी सिनेमा, संध्याकाळी बागेतील फेरफटका, पाणीपुरी, भेळ, आईस्क्रीम आणि त्यानंतर ते घरी परतले. एकंदरीत दिवस खूपच छान गेला.
राज किती खर्च करतोस आमच्यावर ? न राहवून आई-बाबांनी विचारले.
दोन दिवस आपल्याला पाचगणी, महाबळेश्वरला जायचेय आणि त्यानंतर साताऱ्याला, राजने त्याचा प्लॅन आई-बाबांना सांगितला.
पुढील दोन दिवस राज आणि आई-बाबा पाचगणी, महाबळेश्वरला मनसोक्त भटकले. रात्री न राहवून आईने विचारले, राज आता उद्या साताऱ्याला कशासाठी जायचे ?
आईच्या या प्रश्नाला उत्तर देणे राजने शिताफीने टाळले. उद्या लवकर निघायचे आहे असे म्हणून, राज त्याच्या रूममध्ये गेला.
तितक्यात फोन वाजला. राज त्याचा फोन आई-बाबांच्या रूममध्ये विसरला होता. फोन नेहाचा होता. फोन घेताना आईकडून चुकून फोन स्पीकर मोड मध्ये टाकला गेला.
फोनवरून नेहा विचारत होती राज, ठरल्याप्रमाणे शॉपिंग झाले ? पाचगणी, महाबळेश्वर दर्शन झाले ? आता पुढचा प्लॅन म्हणजे आई-बाबांना उद्या सकाळी साताऱ्याच्या वृद्धाश्रमात नेणे. सकाळी १० वाजेपर्यंत पोहोचायचे आहे, पण त्यांना शेवटपर्यंत कसलीही कल्पना येऊ देऊ नकोस. कीप इट टोटली सिक्रेट. नेहाने फोन ठेवला.
नेहा जे बोलली ते खूपच धक्कादायक आणि अनपेक्षित होते. अचानक असा निर्णय का ? कशासाठी ? आपलं काही चूकलय का ? निर्णय पोटच्या गोळ्याचा, की सुनेचा ? असंख्य, अनुत्तरित प्रश्न !
आबासाहेब म्हणतात, साधारणतः एक महिन्यापूर्वी मी बाहेरून आलो, त्यावेळी राज त्याच्या मित्राबरोबर गप्पा मारत होता. मी आल्याचे पाहून दोघेही बाल्कनीत गेले, आणि हळू आवाजात बोलू लागले. वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्यामुळे, घरातील कटकटी कमी झाल्या, आणि शांतता निर्माण झाली, असे राजचा मित्र राजला सांगत होता.
आई म्हणते, मी पण ऐकले ते. अहो, पण राजच्या मित्राचे वडील जागेवरून ऊठूही शकत नव्हते, आणि त्यांचं सर्वच आवरायला लागायचं. घरातल्या सर्वांना त्रास व्हायचा. आपलं तसं नाही ना हो, आपण आपलं सर्व काही करतो, शिवाय तुम्ही मुलांना शिकवता, त्यांना शाळेत पोहोचवता, शाळेतून घरी आणता. मी देखील नेहाला स्वयंपाकात, नी घर कामात शक्य तेवढी मदत करते. का आला असेल आपला कंटाळा त्यांना ?
मागच्या आठवड्यात कांदा कापताना माझे बोट कापले, तेव्हा नेहाने पटकन ड्रेसिंग करून, त्यावर पट्टी बांधली, आणि मला सांगितले, आता तुम्ही आराम करा, अजिबात काम करू नका. खुप प्रेमळ आहे हो नेहा !
आबासाहेब म्हणतात, राज ही खूप प्रेमळ आहे. मी भाजी आणायला त्याच्याबरोबर जातो, तेव्हा राज कधीही मला पिशव्या उचलू देत नाही. रस्ता ओलांडताना माझा हात धरतो तो, खूप काळजी घेतो माझी. मागच्या वर्षी मला थोडा ताप आला, तर रात्रभर उशाशी बसून होता.
आई म्हणते, दोन-तीन आठवड्यांपूर्वी नेहाला तिच्या मैत्रिणीशी बोलताना मी ऐकले. नेहाच्या बहिणीसाठी पुण्यातील स्थळं बघायला सुरुवात करणार आहेत. कदाचित आपल्यामुळे अडचण निर्माण होईल, म्हणून आपली रवानगी वृद्धाश्रमात होत असेल.
आबासाहेब म्हणतात, अगदी तसेच असेल, तर काही दिवस आपण तुझ्या भावाकडे, आणि काही दिवस माझ्या बहिणीकडे जाऊ.
आई म्हणते, वृद्धाश्रमात चांगली व्यवस्था नसते, अस्वच्छता असते, आणि खूप हाल होतात, असं मी ऐकलंय. उद्या सकाळी राजला विनवणी करून काही मार्ग निघतो का ते बघायचे का?
आबासाहेब म्हणतात, नको नको. याचना करून काही प्राप्त करण्यापेक्षा, ते न मिळालेलंच बरे!
चला उशीर होतोय झोपू या, उद्या सकाळी लवकर उठायचे, आणि आपल्याला आपल्या अखेरच्या घरी (वृद्धाश्रमात) जायचे ना. आलिया भोगासी असावे सादर म्हणत, आबा आणि आईंनी मनाशी गाठ बांधली, राज आणि नेहाचा प्लॅन, अर्थात् कटकारस्थान आपल्याला समजला आहे, हे अजिबात दाखवायचे नाही. जे होतेय त्यात समाधान मानायचे.
प्रयत्न करूनही दोघांनाही झोप येत नव्हती. दोघांचा संवाद चालूच असतो.
आई : एक विचारू ?
आबासाहेब – विचार !
आई – वृद्धाश्रमात आपल्याला भेटायला राज कधी येईल का ? निदान नातवाच्या वाढदिवसाला तरी आपल्याला त्यांच्या घरी जाता येईल का ? राहायला नव्हे, फक्त त्यांचा कौतुक सोहळा बघण्यासाठी. आपण तेथे राहायचे नाही, मुक्काम करायचा नाही, अगदी जेवणही नाही करायचे. फक्त आशीर्वाद देऊन परतायचे. राज, नेहा आणि नातवा शिवाय राहण्याचा विचार नाही हो केला जात माझ्याकडून. अजून एक विचारू ?
आबासाहेब – तुझा एक कधीच संपत नाही. विचार, विचार.
आई – निदान आपण गेल्यावर आपल्याला अग्नी द्यायला तरी राज येईल का हो ?
आबासाहेब – येईल, राज नक्की येईल, तो तितका कठोर नाही. शेवटी पीडा कायमची गेली, सुटलो एकदाचा, म्हणून तरी आनंदाने येईल. मी सांगतो ते ऐक. जर मी प्रथम गेलो, आणि राज आला नाही, तर तू मला अग्नी दे, आणि तू प्रथम गेलीस, आणि राज आला नाही, तर मी तुला अग्नी देईन.
आई – जर आपण दोघेही एकाच वेळी गेलो तर ?
आबासाहेबाकडून कोणतेही उत्तर आले नाही, बहुधा त्यांचा डोळा लागला असावा.
साताऱ्याला जाताना, राज छान मूडमध्ये होता, आणि बरंच काही बोलत होता, आई बाबा मात्र गप्प गप्पच ! दुतर्फा दाट झाडी, वळणावळणाचा रस्ता, गार हवा, अगदी प्रसन्न वातावरण. कारमधील रेडिओ गदिमांनी रचलेले, बाबूजींच्या जादुई आवाजातील गीत ऐकवत होता – पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा !
वृद्धश्रमाच्या मॅनेजर साहेबांनी राज, आबासाहेब आणि आईचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले. संपूर्ण वृद्धाश्रमाला एक राऊंड मारून, ते सर्व मॅनेजर साहेबांच्या केबिनमध्ये विसावले. हिरवीगार झाडी, भव्य पटांगण, सुसज्ज कॅानफरन्स हॅाल, मिटींग रूम्स, प्रशस्त आणि हवेशीर रहायच्या रूम्स. वृद्धाश्रम खरोखरच सुंदर होता. वार्षिक फी १ लाख प्रत्येकी, समोरच्या बोर्डवर लिहिले होते.
चहा पिता पिता, मॅनेजर साहेब म्हणालेत, सर्व तयारी झाली आहे, चला आपण जाऊया. आई-बाबांनी मन घट्ट केले.
मिटींगरूममध्ये २५-३० लोक जमले होते. राज पुढे झाला आणि म्हणाला, हा वृद्धाश्रम माझ्या आई-बाबांना खूप आवडला. हो ना ? राजने आई-बाबांकडे पाहिले. डोळ्यांतले अश्रू लपवत, आईबाबांनी यांत्रिकपणे मान डोलावली !
राजने आईबाबा दोघांना पुढे बोलावले, आणि त्यांच्या हातून मॅनेजर साहेबांना दोन लाख रुपयांचा चेक दिला. टाळ्यांच्या गजरात आई-बाबांचा हुंदका कुणालाही ऐकू गेला नाही.
मॅनेजर साहेब, निघतो. राज म्हणाला.
राज बेटा, सावकाश जा, सांभाळून गाडी चालव, आणि घरी पोहोचल्यावर फोन कर, आई-बाबा म्हणाले.
हे काय, आईबाबा ? मला एकट्यालाच पाठवता ? राजने विचारले.
म्हणजे, आम्हीही यायचे ? खात्री करून घेण्यासाठी आई-बाबांनी विचारले.
अर्थातच, राज उत्तरला.
आणि ते २ लाख रुपये, वृद्धाश्रमाच्या फी चे ? आईबाबा दोघेही एकाच वेळी एका सुरात म्हणाले.
छे, छे, ते तर तुमच्या लग्नाच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त, तुमच्या हस्ते वृद्धाश्रमाला दिलेल्या देणगीचे. चला, आपल्याला परत पुण्याला जायचेय, राजने उत्तर दिले.
आई-बाबांसाठी हा सुखद धक्का होता. परतीचा प्रवास सुरू झाला, आणि तितक्यात नेहाचा फोन आला. राज, कसा झाला कार्यक्रम ? लवकर परत या. मी आणि मुलं तुझी आणि आई-बाबांची वाट पाहत आहोत, आणि हो, येताना, शिरवळला आईंची आवडती भजी, आणि बाबांचा आवडता बटाटेवडा खायला विसरू नका.
नेहाचे फोनवरील बोलणे ऐकल्याने, झालेला गोंधळ मिटला होता. परतीचा प्रवास खूपच सुखकर होता. नातवापासून ताटातूट होणार नव्हती, घर सुटणार नव्हते, सुनेचा नी मुलाचा सहवास लाभणार होता. हरवेल असे वाटणारे सुख अबाधित होते.
कारमधील रेडिओ मस्त गाणं ऐकवत होता – मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं ? काय पुण्य असलं की ते, घरबसल्या मिळतं !
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306, ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈