सुश्री मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ मोलकरीण… भाग – २ – लेखिका – सुश्री आशा पाटील ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
(झाडून सगळे सोसायटी मेंबर आपल्या बायकांना घेऊन मिटींगला हजर झाले. विनया खाली मान घालुन अंग चोरुन उभी होती. मिटींग सुरु झाली.) – इथून पुढे —
सोसायटीच्या सेक्रेटरीने मूळ मुद्यालाच हात घातला आणि डायरेक्ट चारुलता बाईंना प्रश्न केला, “मॅडम आपल्या सोसायटीतल्या मोलकरणीबाबत सगळं ठाऊक असतांनाही तुम्ही तिला कामावर ठेवलंत, इतकंच नाही तर सोसायटीतल्या इतर फॅमिलीनाही तिला कामावर ठेवण्यास तुम्ही सांगत आहात. या असल्या बाईमुळे आमच्या मुलांवर चांगले संस्कार होतील का?
‘हो ना, आमच्या घरी तर वयात आलेली मुलं आहेत. शिवाय आमच्या सगळ्यांचे पतीही घरी एकटेच असतात कधीकधी. कसा विश्वास द्यायचा ह्या बाईचा?’ लेलेबाई बोलल्या त्यांच्या मिस्टर आणी इतर बर्याचजणांनी त्यांची री ओढली.
“हिला कामावरुन बंद करा चारुलताबाई, आत्तापर्यंत आम्ही हिला सोज्वळ म्हणत होतो. पण नवरा गेल्यापासुन ही बदललीच. विधवा, बेसहारा म्हणून कामं देतो आम्ही पण अहो ही चक्क धंदा करते. “रागिणी धुसफुसली
तशा, चारुलताबाई ओरडल्या, ‘थांब रागिणी, एखाद्यावर आरोप लावण्याआधी, विचार करावा माणसानं, गेली सहा वर्षे ही काम करते आपल्याकडे. आत्तापर्यंत तिची कोणती तक्रार होती?सहा महिन्यापुर्वी तिचा नवरा वारला. एक छोटं लेकरु घेऊन, खाली मान घालून आपलं काम करत जगते ती. ‘
‘म्हणून काय तिने असं….. ‘
मध्येच बोलणार्या रागिणीच्या मिस्टरांना थांबवत चारुलताबाई म्हणाल्या, ‘माझं पूर्ण होऊ दे, मिस्टर ऋषी. असं अचानक काय झालं की तुम्हाला विनया धंदा करते याचा शोध लागला जरा सांगाल आम्हाला?’
‘मी पाहिलंय हिला एका माणसाबरोबर. हे हिच्या लक्षात आलं आणि अहो ही चक्क रागिणी नसतांना मलाही खाणाखुणा करते, घाणेरडे हावभाव करते. ‘
‘नाही ओ साहेब मी कधीच असं केलं नाही. मी नाही ओ तसली बाई. कसं पटवून देऊ तुम्हाला?’विनया कळवळली.
तसं लेलेबाई पुन्हा करवादल्या.. ‘गप्प गं, तुझ्यासारख्या खाली मान घालणार्यांच्या अंगातच खेळ असतात. ‘.. खरं म्हणजे लेलेबाईंचा खरा राग चारुलतावर होता. कारण नेहमी टिपटाॅप राहणार्या, हसतमुख आणि इंप्रेसिव्ह चारुलताचा त्यांना हेवा वाटे. आता त्यांना विनयाला त्यांनी कामाला ठेवल्याचं आयतं कोलीत मिळालं होतं. ‘
‘पण माझेही मिस्टर बर्याचदा घरी असतात एकटे. त्यांना नाही अनुभव आला कधी असला. ‘चारुलताबाई बोलल्या.
तेवढ्यात सौ. पाटणकर कुजबुजल्या ‘तुमचं ध्यान शामळू आणि बायकोच्या ताटाखालचं मांजर’आणि हास्याची खसखस पिकली.
तशा आवाज चढवून चारुलताबाई म्हणाल्या, ‘ माझे मिस्टर शामळू नाहीत. तर स्त्रीचा आदर कसा करावा हे जाणतात ते. पाटणकरबाई तुमच्या ह्यांना विचारा. तुमच्या मिस्टरांनी आॅफिसमध्ये केलेली अफरातफर त्याना तुरुंगात घेऊन गेली असती. ती भानगड माझ्या शामळू मिस्टरांनीच हाताळली होती बरं का?’
तसे पाटणकर बायकोवर खेकसले, ‘ तूला कुठं काय बोलावं हे कळत नाही. आता तोंड मिटा.
‘चर्चेला भांडणाचं रुप येणार असा रंग दिसताच ‘ कामावरुन काढून टाका म्हणजे प्रश्न मिटेल.’..
तशा चारुलताबाई म्हणाल्या, ‘ते शक्य नाही. सत्य काय आहे हे मी तुम्हाला सांगते, मिस्टर ऋषी तुम्ही विनयाचा विनयभंग केला आहे, हे मान्य करा. गेल्या महिन्यात बुधवारी तुम्ही आॅफिसमधून दुपारीच घरी आला होता. कारण तुम्हाला माहित होतं विनया तुमच्याकडे दुपारनंतर येते आणि त्यादिवशी रागिणी मुलांना घेऊन भावाकडे गेली होती. तुम्ही तुमच्या फ्लॅटमध्ये शिरलात आणि विनयाबरोबर चुकीचं वर्तन करण्याचा प्रयत्न केलात. त्याचवेळी विनयानं तुम्हाला बाजूला ढकललं आणि ओरडली मी हे सगळ्या सोसायटीला ओरडून सांगेन. तुम्ही घाबरलात विनयाची माफी मागितली. विनयानही एक संसार तुटायला नको म्हणून मोठ्या मनानं तुम्हाला माफ केलं. पण त्यानंतर रागिणी घरी असतानाच ती कामावर येऊ लागली. तुमच्याकडे ती ढूंकुनही पाहत नसे. चूकून लक्ष गूलं तर तिरस्कारानं मान फिरवत असे. तिला बिचारीला माहितच नव्हतं. माफी मागून तुम्ही स्वःतःला वाचवलं होतं, पण तुमच्यातलं भुकेलेलं जनावर अजूनही तसंच होत. आणि त्या रविवारी पुन्हा तुम्ही तोच प्रकार केलात. तेही रागिणी घरी असतांना. विनया स्वतःला सोडवून घ्यायचा प्रयत्न करीत होती. तुम्ही मात्र तिनंच आपल्याला फशी पाडलंय याचा ओरडून कांगावा केलात. आणि रागिणीनेही कोणताही विचार न करता विनयावरच सगळं खापर फोडलं. ‘
‘काहीही बोलू नका. ह्यांच्यावर खोटे आरोप करतांना तुम्हाला लाज वाटायला हवी थोडी. ‘ रागिणी ओरडली.
तशा चारुलताबाई रागिणीला म्हणाल्या, ‘लाज तुझ्या नवर्याला वाटायला हवी रागिणी. विसरलीस दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन तू इथं आलीस आणि त्याचवेळी तुझ्या सासूबाई पाय घसरुन पडल्या तेव्हा ह्याच विनयानं एखाद्या पोक्त बाईसारखं आई होऊन तुझं सगळं काम केलं होतं स्वतःच्या सहा महिन्याच्या लेकराला घरी सोडून, ती तुला जपत होती. तेव्हा हा तुझा नवरा कंपनीच्या कामाच्या नावाखाली तूला घरात काडीची मदत करत नव्हता. कसं जमतं गं तुला इतक्या चटकन पलटायला. खरी कृतघ्न तर तू आहेस. कसलाच विचार न करता तू विनयाला दोषी ठरवलंस. ‘
”फुकट नाही केलं तिनं काम. जादाचे पैसे मोजलेत तिला. ह्या जादा पैशाची चटक लागली आहे तिला आणि तुम्ही बिनबुडाचे आरोप करता आहात. काय पुरावा आहे तुमच्याकडे?’
‘पुरावा… ?हा.. हा. पुरावा हवा. तुमच्या आॅफिसमध्ये तुम्ही त्यादिवशी पत्नीबरोबर तिच्या माहेरी जायचं असं सांगून अर्धी सुट्टी घेतलीत. आणि आपल्या सोसायटीतल्या प्रवेशद्वारावरचा सी. सी. टी. व्ही. सांगेलच.. तुम्ही घरी आलात पण रागिणीच्या माहेरी नाही गेलात. खरं आहे ना हे. आपल्या गेटवरचा वाॅचमनही हेच सांगेल. हो ना मिस्टर ऋषी. बर्याचवेळा अशी बरीच कारणं देऊन तुम्ही सुट्ट्या घेता कंपनीतून. कशासाठी ते सांगू का?’
आपलं बिंग फुटणार हे लक्षात येताच आणखी तमाशा नको म्हणून रागिणीच्या नवर्याने सरळ माफी मागितली. पण चारुलताबाई एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी सरळ पोलिसकेसची धमकी दिली. तेव्हा रागिणीने पुढे येऊन विनयाची माफी मागितली आणि ह्यातून वाचव अशी विनवणी केली.
विनया हात जोडून म्हणाली ‘बाईसाहेब, तुम्ही होतात म्हणून मी वाचले. ह्यांना माफ करा. नवरा नसलेल्या बाईची काय हालत होते हे भोगतेय. रागिणीमॅडमनां त्रास नको. ‘
विनयाच्या मोठ्या मनाचं सगळ्यानाच कौतूक वाटलं. चारुलताबाई म्हणाल्या, ‘विनया माझ्याकडे कामाला राहिलच. तिचा मुलगा शिकून मोठा होईपर्यंत आणि हो आपल्या सोसायटीच्या औटहाऊसमध्ये तिची राहण्याची सोय करु. त्याचं भाडं मी स्वतः भरेन. ‘
चारुलताबाईंच्या आभाळाएवढ्या मोठ्या आधारानं विनया भारावून गेली. अश्विन दहावीला गेला आणि चारुलताबाई आॅस्ट्रेलियाला त्यांच्या मुलाकडे गेल्या. जवळजवळ दहा वर्षे त्या तिथेच राहिल्या. पण विनयाची चौकशी, तिच्या मुलाच्या शिक्षणाला मदत करणं त्यांनी सोडलं नाही. म्हणून तर अश्विनच्या इतक्या मोठ्या शिक्षणाचा खर्च विनया पेलू शकली होती.
पण दिड वर्षापूर्वी मिस्टर गेले आणि चारुलताबाईंना भारताची खूप आठवण येऊ लागली. म्हणून त्या परत ह्याच गुलमोहर सोसायटीतल्या आपल्या फ्लॅटमध्ये रहायला आल्या. रोज योगा, मैत्रिण कट्ठा, भजन, सत्संग ह्यात त्यांचा वेळ आनंदात जाऊ लागला. पण चार महिन्यापुर्वी त्यांना चक्कर येऊन पडल्याचं निमित्त झालं आणि त्या अंथरुणाला खिळल्या. मग मात्र विनयाचा जीव खालीवर होऊ लागला. सुरवातीला निमित्त काढून आत्ता मात्र राजरोसपणे ती चारुलताबाईंच्याकडे जायची. त्यांच्या मुलग्याने सुट्टी मिळत नसल्याने २४तास एक नर्स त्यांच्या सेवेसाठी ठेवली होती पण विनया मात्र दररोज त्यांना अगदी हलक्या हाताने आंघोळ घालत असे. त्यांना छान साडी नेसवून वेणी फणी करत असे. स्वतःच्या हाताने त्यांना भरवत असे. त्यांच्याशी गप्पा मारत असे. तशी नर्सही चांगलीच होती. पण विनयाच्या मायाळू स्पर्शात जी जादू होती त्याचा असर दिसू लागला चारुलताबाई प्रसन्न राहू लागल्या. परवा तर डाॅ. म्हणाले अशीच प्रगती राहिली तर थोड्याच दिवसात तुम्ही स्वतःहून चालू लागाल. तेव्हा चारुलताबाई म्हणाल्या, ‘नक्कीच होईन डाॅ. कारण ही माझी लेक आहे ना विनया. तिच्यामुळे तर ही जादू झाली आहे. ‘
— हे सगळं सांगून झाल्यावर विनया म्हणाली, ‘आता तूच सांग अश्विन. एका बेसहारा, विधवा स्त्रीला तिचं लेकरु अनाथ होऊ नये म्हणून लेक मानणार्या, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार्या त्या महान आईला मी कशी विसरु? मला आता जायलाच हवं. माझ्या मालकीणबाई माझी वाट पहात असतील. ‘ इतकं बोलून विनया घराबाहेर पडली. काय व्हायचं ते होऊ द्या पण सगळं बोलल्यावर तिला आता हलकं झाल्यासारखं वाटत होतं.
सायंकाळ झाली. चारुलताबाईंना चहा बिस्किटे भरवून घरी जायच्या तयारीत असलेल्या विनयाला फ्लॅटची बेल ऐकू आली. तिसरं कुणीही घरी न येणार्या घराची बेल अशी कुणी वाजविली हे पहायला तिनं दार उघडलं आणि ती पाहतच राहिली. दारात अश्विन आणि अस्मि उभे होते. दोघेही आत आले. बेडवर उठुन बसलेल्या चारुलताबाईंकडे पहात अश्विन म्हणाला, “अगं आई, आटप लवकर. तुझ्या आईलाही तयार कर. अगं आजीची सेवा फक्त तिच्या लेकीनेच केलेली तुझ्या लेकाला आणि सुनेलाही नाही आवडणार. आपण ह्यांना आपल्या घरी घेऊन जात आहोत. तिच्या लेकीकडे. चल आटप लवकर. ” विनयाचे डोळे भरुन आले. तिला वाटलं, बघता बघता आपला लेक कित्ती मोठा झाला, वयानं आणि मनानही. तिनं लेकाला आणि सूनेला घट्ट छातीशी धरलं. चारुलताबाई मात्र ह्या आनंदी आणि सुखद धक्क्यानं प्रसन्न हसल्या.. नेहमीसारखं…
— समाप्त —
लेखिका : सौ. आशा दिपक पाटील
कोल्हापूर (काॅपीराईट सुरक्षित)
प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈