सुश्री मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ मोलकरीण… भाग – १ – लेखिका – सुश्री आशा पाटील ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
“आज पुन्हा गेलीस तू आई तिकडे?तुला कितीदा सांगितलं ह्या श्रीमंत बायकांना फार माज असतो. पुन्हा तू जर त्या चारुलताबाईंकडे गेलीस तर खबरदार” मुलाचं हे रोजचंच होतं;पण आज त्यांच्या सुनेनंही त्यामध्ये तोंड घातलं, “घरात इतकी श्रीमंती असतांना ह्या रोज जाऊन कामवालीसारखं त्या बाईची सेवा करतात. मला तर बाई सोसायटीत कित्ती लाज वाटते. काही तर मुद्दाम विचारतात, तुझी सासू मोलकरीण आहे का गुलमोहरमध्य?”हे बोलणं ऐकून विनया आतल्या आत तुटत होती. “आज सोक्षमोक्ष लागू दे आई. तू जाणं बंद करणार आहेस की नाही तिकडे?” मुलाने निर्वाणीचं विचारलं. विनयाला माहित होतं, तिचा मुलगा अश्विन ह्या गुलमोहर सोसायटीतल्या जुन्या घरमालकीणींचा तिरस्कार करतो आणि त्याला कारणही तसंच होतं. गरीबीपोटी आईचा अपमान, हिडीस पिडीस करणार्या ह्या सोसायटीनं त्याचं बालपण करपून टाकलं होतं. पण ह्याच गुलमोहरातल्या एका गुलमोहराच्या घरानं आईला गुलमोहर बनवलं होतं हे त्याला माहित नव्हतं आणि ते कळायचं त्याचं वयही नव्हतं. श्रीमंतांवरच्या ह्या रागापोटीच तर तो पोटतिडकीनं शिक्षण घेऊन आज एका मोठ्या कंपनीत आॅफिसर होता. त्याची बायकोही त्याच्यासारखीच उच्च नोकरदार. महिन्याला घरात लाखानं पैसा येत होता. त्या पैशातूनच त्याने ह्याच सोसायटीसमोर हा पाच खोल्यांचा प्रशस्त बंगला बांधला होता. डोळ्याचं पारणं फेडणार्या सुखसोयी होत्या त्याच्या बंगल्यामध्ये. नोकरचाकर होते. जाणारे येणारे क्षणभर बंगल्यावर नजर फिरवूनच पुढे जात. आईच्या कष्टाची जाण असणारा तो आईला तर काडीलाही हात लाऊ देत नसे. अस्मि त्याची बायकोही सासूबाईंचं मन राखून राहत असे. ज्या सोसायटीत त्याची आई धुणीभांडी करत असे, त्याच सोसायटीत आज त्याच्या आईला मानानं आग्रहानं बोलावलं जाई. काही वर्षापूर्वी त्यांना हिडीसफिडीस करणार्या ह्या बायका जेव्हा त्याच्या आईला असा मान देत तेव्हा अश्विनला स्वतःचा फार अभिमान वाटे.
पण गेल्या तीन महिन्यापासून घरातलं वातावरण बिनसलं होतं. त्याला कारण होत्या ह्याच सोसायटीतल्या आईच्या जुन्या मालकीणबाई चारुलताबाई. भरजरी वस्त्रांत नटलेली आणि दागिन्यानं सजलेली त्याची आई ह्यांच्या घरी जाऊन चक्क ह्या चारुलताबाईंचं सगळं काम करायची. त्यांना रोज एक नवीन आणि हौसेनं आरोग्यवर्धक पदार्थ बनवून भरवायची. आजही विनयाने साबूदाण्याची मऊसुत, गोड खीर बनवून तो नक्षिदार वाडगा घेऊन ती चारुलता बाईंच्या फ्लॅटकडे चालली होती आणि तेच पाहून हट्टाला पेटल्यासारखा अश्विन आडवा आला होता. एरवी समंजपणे वागणारी सूनही चक्क विरोधात जाउन बोलायला लागली होती. हा सगळा ताण सहन न होऊन विनया ओरडली, “बस्स कर रे अश्विन, हो मी आजही मोलकरीणच आहे पण फक्त चारुलताबाईंची आणि हे बाईंनाही आवडत नाही पण मी स्वेच्छेने स्वीकारलंय हे पद. का ते तुला कळणार नाही पण आज बोलतेच तुझ्याशी. आणि हो सूनबाई तू ही ऐक. ‘
असं म्हणून विनयाने सगळं सांगायला सूरवात केली. अख्खा भूतकाळ एका व्यथेची गाथा होऊन तिच्यापुढे उभा राहिला.
विनया आणि सुहास गावाकडून शहरात काम मिळेल म्हणून आलेलं एक गरीब जोडपं. शहरातल्याच झोपडपट्टीत इतर अनेकासारखं त्यांचं जगणं सुरु झालं. सुहास एका छोट्या फॅक्टरीत हेल्पर म्हणून जाऊ लागला आणि विनयानंही इथल्या बायकांच्या ओळखीनं धुण्याभांड्याचं काम मिळवलं. ती ज्या सोसायटीत काम करीत होती, त्या सोसायटीचं नाव होतं गुलमोहर. गुलमोहरासारखीच श्रीमंत आणि उच्चभ्रु सोसायटी. श्रीमंतीचा तोरा मिरवणार्या फॅमिली. पण स्वच्छ, चटपटीत आणि कामापुरतंच काम ठेवणारी मितभाषी विनया सोसायटीत सगळ्यांची आवडती होऊन गेली. चापुनचोपुन साडी, कपाळावर मोठी लाल टिकली, गळ्यात काळ्या मण्यांचं दोन अगदी छोट्या सोन्याच्या वाट्या असणारं मंगळसूत्र, लांबलचक केसांचा घट्ट अंबाडा, गव्हाळ शेलाटा बांधा आणि काळेभोर मायाळू डोळे असणारी विनया सुहासचीही खूप लाडकी होती. अफाट प्रेम होतं दोघांच एकमेकांवर. वर्षभरातच त्यांच्या सुखात अश्विनच्या येण्यानं आनंदाचं चांदणं पसरलं. बघताबघता अश्विन चार वर्षांचा झाला. दोन अडीच महिन्याचा झाल्यापासून त्याला शेजारच्या आजीकडे ठेवून विनया कामाला जायची. पण घार हिंडे आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी अशी तिची अवस्था व्हायची. सुहास तर बाळाचे कित्ती लाड करायचा. ओढाताण असायची पण आहे त्यात समाधान मानणारी ही नवराबायको त्यामुळेच सुखी होती. पण म्हणतात ना, काहीवेळा नियती खूप परीक्षा घेते एखाद्याची. अगदी तस्सच झालं. साहित्य टेंपोत चढवत असतांना कसं कोण जाणे पण सुहासचा तोल गेला आणि तो एकदम साहित्य अंगावर घेऊन पडला. दवाखान्यात नेईपर्यंत सगळं संपलं होतं. त्याचा निष्प्राण देह पाहून विनयानं फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकत होता. सैरभैर झाल्यासारखी ती आक्रोश करत होती. माती चावत होती. आसपासच्या बायांनी तिला सावरलं. लेकराकडे तरी बघ असं म्हणत छोट्या अश्विनला तिच्याजवळ दिलं. अश्विनकडं पाहताच तिला थोडं भान आलं. या पोरासाठी तिला जगणं गरजेचं होतं. सुहासचा जीव की प्राण होतं हे लेकरु. त्याला शिकवायचं खूप मोठं करायचं हे स्वप्न होतं त्याचं आणि तोच आता स्वप्नात येण्यासाठी निघून गेला होता. दुःखाचे कढ जगण्याला कठोर बनवत होते. नियतीनं केलेल्या विचित्र खेळानं एक हसतं खेळतं घर उजाड झालं होतं. मनावर दगड ठेवत विनया सावरली. पोटात अति रक्तस्त्राव झाल्यामूळे सुहास गेला असं निदान झालं. कंपनीकडून काही मिळणार नव्हतंच. गरीबाला विम्याचे लाड कुठले करता येणार?त्यात ही टेंपररी नोकरी असल्यानं, कंपनीही खाजगी असल्यानं हातात रुपयाही आला नाही.
सुहासचे बारा दिवस झाले आणि दुःखाचे कढ पोटात घेऊन पोटासाठी विनया कामावर रुजू झाली. कोरडी सहानूभुती दाखवण्यापलीकडे सोसायटीत काही झालं नाही. काम आटपत शेवटचं काम करण्यासाठी विनया चारुलताबाईंच्या घरी गेली. ह्या बाई म्हणजे एक भारदस्त व्यक्तिमत्त्व. अगदी शिस्तप्रिय आणि कडक. विनयाही टरकून असे त्यांना. पण बाई विनाकारण कुणाला त्रास देत नसत. त्यांचे मिस्टर सरकारी खात्यात उच्च पदावर. मुलगा आॅस्ट्रेलियात आणि मुलगी सासरी दूर पेरु देशात. हे दोघेच पती पत्नी. सामाजिक कार्याची आवड असणार्या बाई आणि त्यांना पाठींबा देणारे साहेब. अगदी मेड फॉर इच आॅदर. आत्तापर्यंत कामास काम आणि बोलणं ठेवणार्या चारुलताला मोकळा गळा, मोकळं कपाळ घेऊन आणि दहाबारा दिवसातच रया गेलेली विनया पाहून भडभडून आलं. त्यांच्या लेकीच्याच वयाची होती ती. त्यांनी काही न बोलता चहाचा कप विनयाच्या हातात दिला आणि तिच्या पाठीवर थोपटलं. बस्स ह्या एका साध्या कृतीनही विनयाला जाणवलं, कुणीतरी आहे आपल्या वेदना जाणणारं. हळूहळू दुःख मागे पडत गेलं. विनया कामात रुळून गेली. अश्विन आता शाळेत जाऊ लागला होता. नाही म्हटलं तरी खर्च वाढतच होता. ह्या महागाईच्या दिवसात कठीण होत होतं दिवसें दिवस. अाणि अशातच एक आभाळ कोसळणारी घटना घडली. दाणदाण पाय आपटत आणि तोंडाचा पट्टा चालवत रागिणीने विनयाला फ्लॅटबाहेर ढकललं आणि ती ओरडली, ‘नवरा नाही म्हणून असले धंदे करते. माझ्याच घरात शेण खायला तुला लाज नाही वाटत. पुन्हा ह्या सोसायटीत पाय टाकलास तर याद राख. ‘ रागिणीच्या ह्या आकांडतांडवानं अख्खी सोसायटी जमा झाली तिच्या फ्लॅटसमोर. प्रत्येकजण काय झाल?काय झालं? असं विचारु लागला. तसं रागिणी जोरात ओरडली, “अहो ही धंदा करते चक्क. माझ्या मिस्टरांनी पाहिलंय हिला. म्हणून त्यांनाही.. शी, सांगवत नाही. इथं अगदी सोज्वळ म्हणून मिरवते आणि असले धंदे. हिला कुणीही कामावर ठेवायचं नाही आजपासून. ” असं सांगून रागिणीने तिला बाहेर काढलं. रडूनभेकून हात जोडणार्या, हतबल, अभागी स्त्रीला कोणत्याही स्त्रीनं आधार दिला नाही. आत्तापर्यंत निष्कलंक असणारी एक स्त्री आज क्षणात कुलटा ठरली होती. तोंडात पदराचा बोळा घेऊन, चेहरा लपवत निघालेली विनया नुकत्याच बाहेरुन येणार्या चारुलताना धडकली. त्यांच्या हातातल्या पिशव्या खाली पडल्या. ‘अगं जरा बघून चाल की’, असं म्हणत तिच्याकडे त्या पाहतात तोच, ‘चुकलं हो बाईसाहेब. ‘ म्हणत त्यांच्या हातात भरभर साहित्य गोळा करुन विनया देऊ लागल्या. तिच्या ह्या भांबावलेल्या, घाबरलेल्या, गालावर बोटांचे ठसे उठलेल्या, बेहाल अवस्थेला पाहून चारुलताबाईंनी तिचा हात धरला आणि त्या म्हणाल्या, ” विनया तू?आणि हे काय झालंय तुला? ” आत्तापर्यंत सगळ्यांनी लाथाडून, फिरवलेल्या नजरांनी घायाळ झालेली विनया कोसळली आणि गदगदून रडू लागली. चारुलताबाई तिला सरळ आपल्या फ्लॅटवर घेऊन आल्या. काय, कसं झालं ते सगळं त्यांनी विनयाकडून ऐकलं. त्या शांतपणे म्हणाल्या, ‘ तू उद्या सोसायटीत कामाला ये. कुणी नाही घेतलं तर मी तूला कायम कामावर ठेवीन. ‘ ‘पण रागिणीमॅडम, त्या मला कच्ची फाडून खातील. ‘ ती घाबरुन म्हणाली. ‘तिचं मी पाहून घेईन. पण तू कामावर यायचं बंद करु नको’ चारुलताबाईंनी तिला धीर दिला. ह्रदयात वेदनेचा अंगार लपवत विनया दुसरे दिवशी गुलमोहर सोसायटीची पायरी चढली. गरीबीला गरज असते आणि गरजेला लाज नसते हेच खरं. तिनं नेहमीच्या घरांची बेल दाबली पण तिला पाहताच सगळ्यांनी फटाफट दरवाजे बंद केले… आम्हाला तुझी गरज नाही म्हणत. पण चारुलताबाईनी तिला घरचं काम करू दिलं. ही बातमी सोसायटीभर पसरली. दहा पंधरा दिवस झाले तरी विनया सोसायटीत येतच होती. चारुलताबाईंबरोबर आणखी एकदोघींनी तिला पुन्हा घरकामावर घेतले आणि रागिणीचा थयथयाट झाला. तिने सोसायटीच्या सेक्रेटरीकडे तक्रार केली. सोसायटीची मिटींग बोलावली. आरोपीच्या पिंजर्यात होत्या चारुलताबाई कारण त्यांनी एका चारित्र्यहीन बाईला आपल्या घरी कामावर ठेवलं होतं ना. झाडून सगळे सोसायटी मेंबर आपल्या बायकांना घेऊन मिटींगला हजर झाले. विनया खाली मान घालुन अंग चोरुन उभी होती. मिटींग सुरु झाली.
– क्रमशः भाग पहिला
लेखिका : सौ. आशा दिपक पाटील
कोल्हापूर (काॅपीराईट सुरक्षित)
प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈