श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ तार… लेखक : श्री जयंत कोपर्डेकर ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले

अगदी लहानपणापासून हा दोन अक्षरी शब्द जिवाभावाचा वाटत आलाय. नकळत्या वयापासून तो ऐकत आहे. पुढे हळूहळू त्याचा अर्थ कळू लागला. पोस्टमन तार घेऊन यायचा. दारातूनच ” तार आली ” असे ओरडायचा. आणि मग घरातले सगळेच दरवाज्याकडे धावायचे. सगळ्यांच्याच डोळ्यापुढे अनेक प्रश्नचिन्हे उभे राहायची. हृदय जास्तच जोरात धडधडायचे. अनेक उलटसुलट विचार प्रत्येकाच्या डोक्यात पिंगा घालू लागायचे. प्रत्येक जण आपापल्या परीने तारेत काय मजकूर असेल याचा अंदाज बांधू लागे. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर काळजी दिसू लागे. चांगला विचार क्वचितच कोणाला तरी यायचा. पण बाकी सारे गंभीर व्हायचे.

मग घरातले मोठे कोणीतरी हळूच पुढे व्हायचे. प्रश्नार्थक मुद्रेने पोस्टमन कडून तार हातात घ्यायचे. 

त्याच्या कागदावर सही करायचे आणि मग धडधडत्या अंतकरणाने ती तार उघडून वाचायचे. अंतर्देशीय पत्रा प्रमाणे ती तार असे. त्यावर इंग्रजीत टाईप केलेल्या पट्ट्या चिटकवलेले असायच्या. पोस्टमन मात्र तिथेच घुटमळायचा. मग त्याला बक्षीस दिले की तो जायचा. या वेळेपर्यंत सर्वांची उत्कंठा शिगेला पोचलेली असायची. मग तो मोठा जाणता माणूस ती तार वाचायचा. आणि त्याचा अर्थ मराठीत सर्वांना सांगायचा. आणि मग घरातले वातावरण एकदम बदलून जायचे. 

पूर्वी दोन मुख्य कारणासाठी तार पाठवली जायची एक म्हणजे कोणीतरी परीक्षा पास झाले अथवा कुणाचेतरी लग्न ठरलेले असायचे. आणि दुसरे कारण म्हणजे कुणाच्यातरी मृत्यूची बातमी असायची. आणि मग त्यानुसार घरातले वातावरण बदलायचे.

त्याकाळी फोन फक्त पोस्टातच असायचा. पण संदेश पाठवण्यासाठी तारेचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायचा. प्रत्येक पोस्टात पितळेचे एक छोटे यंत्र बसवलेले असायचे. त्यावर काळा प्लास्टिकच्या गोल गोळा असायचा. तार येताना किंवा पाठवताना त्यावर ऑपरेटर ठराविक पद्धतीने बोटाने दाबून संदेश पाठवला जायचा. कट्ट…….कडकट्ट…….कट्ट…….कडकट्ट . असा काहीसा त्याचा आवाज यायचा. ते बघणे तो आवाज ऐकणे फारच छान वाटायचे. 

तार पाठवायची असल्यास पोस्टाचा एक फॉर्म भरून द्यावा लागे. पाठवणाऱ्याचे नाव पत्ता, ज्याला पाठवायचे त्याचे नाव पत्ता व मजकूर लिहावा लागे.  किती शब्द झाले त्यावर पोस्टमास्तर फी आकारायचे. व एक छोटी पावती द्यायचे. तार केव्हा पोहोचेल हे मात्र सर्व जण आवर्जून विचारायचे.

काही ठराविक मेसेज पोस्टात रेडी असायचे. उदाहरणार्थ, १) दिवाळी शुभेच्छा. २) लग्नाच्या शुभेच्छा. ३) नवीन वर्षाच्या शुभेच्छा. ४) मुलगा झाला. वगैरे. मग  मजकूर लिहिण्या ऐवजी फक्त तो नंबर लिहावा लागायचा. त्यामुळे पैसे पण कमी लागायचे.

खरे तर युद्धात संदेश पाठवण्यासाठी तारेचे उपयोग करीत होते. नंतर मात्र तार सर्वांचीच लाडकी झाली. आता संदेश पाठवण्याची अनेक साधने विकसित झाली आहेत. त्यामुळे तार मागे पडली. आणि आता तर ती इतिहासजमा झाली आहे.

पण हसू आणि आसू घेऊन येणारी ती तार त्याकाळी सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय होती.

लेखक : श्री जयंत कोपर्डेकर

पुणे.

संग्राहक : श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments