श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ दिया जलाना कहाँ मना है ?… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
—’हा अग्निदाहो न संभवे !‘
कफी तिचं नाव….तिच्या वडीलांचं त्या तिघांशी काही कारणांनी भांडण झालं होतं. ती अवघ्या तीन वर्षांची होती तेंव्हा. ते तिघे तिच्या घरापाशी आले….ती अंगणात खेळत होती आपल्या मैत्रिणींसोबत..होळीचा सण होता…रंगांची उधळण सुरू होती….या रंगांमध्ये अचानक रक्ताचा लाल भडक रंग मिसळला गेला….त्या तिघांपैकी कुणीतरी एकानं तिच्या चेह-यावर कसला तरी द्र्वपदार्थ फेकला आणि ते पळून गेले…अॅसिड होतं ते! एखाद्या सुंदर गुलाबपुष्पावर निखारे पडावेत तसं झालं क्षणार्धात. या नाजूक फुलावरच्या दोन नेत्रपाकळ्या जळून गेल्या. मुखकमल काळवंडून गेले होतेच. जीव मात्र बचावला. पण हे असं जिवंत राहणं किती वेदनादायी असतं हे ज्याचं जळतं त्यालाच कळतं!
सामान्य दुकानदार असणा-या तिच्या बापानं कंबर कसली. भारतातल्या सर्व मोठ्या इस्पितळांत तिला उपचारांसाठी दाखल करताना त्याच्याजवळची होती नव्हती ती सर्व पुंजी समाप्त झाली. त्यानं मग तिला जिल्ह्याच्या गावी आणलं….पोटाची खळगी भरण्यासाठी तिथल्या न्यायालयात झाडू मारण्याचं काम स्विकारलं. न्यायालयाचं आवार साफ करणा-या या बापाला त्या न्यायालयात न्याय मात्र मिळू शकला नाही. पोलिसी यंत्रणांच्या मर्यादांमुळे आणि कायद्यातील नागमोडी पळवाटांमुळे तिचे दुश्मन दोनच वर्षांत तुरूंगाबाहेर आले…..ती मात्र अंधाराच्या कोठडीत जेरबंद होऊन खितपत पडली. जिंदगी थांबत नाही. या धावपळीत ती आठ वर्षांची झाली. तिला पहिलीच्या वर्गात शाळेत दाखल केलं गेलं तिला पण अभ्यासाचं गणित काही जमेना. कारण ती बघू शकणा-या मुलांची शाळा होती. तोपर्यंत बापाचे वीस लाख खर्च झाले होते. कफी आठ वर्षांची झाली होती. राक्षसी दुनियेत काही देवदूतही लपून बसलेले आहेत….त्यांनी साहाय्य केले त्यांच्यापरीने. बापाने मग तिला मोठ्या शहरात आणलं. डोळ्यांविनाही तिचं काळीज जगण्याची आशा घट्ट धरून होतं! तिची स्मरणशक्ती पाहून तिला थेट सहावीच्या वर्गात दाखल केलं गेलं. लुई ब्रेलचे उपकार तिच्याही कामी आले….तिची बोटं शाबूत होती…हात जळाला होता तरी. तिची बोटं एखाद्या निष्णात संवादिनी वादकाच्या सराईत बोटांसारखी ब्रेल लिपीच्या कागदावर उठावाने उमटवलेल्या खडबडीत अक्षरांवरून भराभर फिरू लागली…बोटांतून स्पर्श शब्दरूप घेऊन मेंदूत विसावू लागले. तिथल्या अंधांसाठीच्या डोळस शाळेने सर्व सहकार्य केलं….अंधांनाही वापरता येऊ शकेल असा संगणक उपलब्ध करून दिला. आधुनिक काळात उपलब्ध असलेली काही साधनं तिच्या मदतीला आली. सीबीएसईचा अभ्यासक्रम इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेत काहीसा अवघड मानला जातो. भाषेचं ठीक आहे, पण विज्ञान,गणितातल्या संकल्पना समजून घेणं किती जिकीरीचे झाले असेल कफीला! पण तिने हार मानली नाही…दिवसरात्र अभ्यास केला….आईबाप, शिक्षक पाठीशी होते….तिचे गुणांचे शतक अवघ्या पाच टक्क्यांनी हुकले! ९५.०६ टक्के दहावी बोर्ड परीक्षेत! अवघे पाच टक्के मिळवले असते या पोरीने तरी ते शंभर टक्क्यांच्या तोडीचे ठरले असते!
‘ नैनं दहति पावक:’ अर्थात ‘ हा अग्निदाहो न संभवे ’ असं ज्ञानोबाराय म्हणून गेलेत….आत्मा अग्निने जाळला जाऊ शकत नाही…कफीचा अंतरात्मा अॅसिडनेही जाळला जाऊ शकला नाही. मी निरूपयोगी नाही, दृष्टी नसली तरी माझ्याकडे दृष्टीकोन आहे हे दाखवून देणा-या कफीने मिळवलेलं हे यश म्हणूनच अलौकिक ठरते. तिला आय.ए.एस. व्हायचं आहे भविष्यात. खरं तर ती आताच झाली आहे आय.ए.एस (I.A.S….I AM STRONG!). तिच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या….माना की अंधेरा घना है…लेकीन दिया जलाना कहाँ मना है? कफी ! तू प्रज्वलीत केलेली ही ज्योत अनेकांच्या अंधा-या मनात उजेड प्रक्षेपित करेल….हे सूर्यप्रकाशाएवढं ठळक आहे.
चला…कफीला शुभेच्छा,आशीर्वाद देऊयात…तिच्या चेह-यावर नसलेल्या डोळ्यांतील आशा आणखी पल्लवीत करुयात….तिच्यासाठी प्रार्थना करूयात ! तू देखणी आहेस कफी….लव यू कफी ! 💐
(दैनिक सकाळ,पुणे, इंटरनेटवरील बातम्या यांवर हे लिखाण बेतलेले आहे.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈