श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ हाड नसलेल्या जिभांचे करायचे काय? ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
श्री. विक्रम मिसरी
माळरानावर बोंब मारायची असेल तर गावाच्या पाटलाची परवानगी घ्यावी लागत नाही… हे जरी खरं असलं तरी ही बोंब कुणाच्या जिव्हारी लागत असेल तर मात्र त्या बोंब मारणा-याला चावडीवर आणून चाबकाचे चार फटके द्यायला लागतात… हे ही खरं!
आताच्या सोशल मिडीयाच्या काळात फेसबुक आणि त्यातल्या त्यात X(पूर्वाश्रमीचे Twitter) ही माळराने झालीत. या माध्यमांमधून कुणीही, कितीही, काहीही, कसेही आणि कुणाविरुद्धही अक्षरश: मनगटावर चुना लावून मनोसोक्त बोंबलू शकते.. हे झालेत ट्रोलर्स!
सभ्य समाजात प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार आहे, परंतु या अधिकारासोबत मत मांडताना वापरल्या जाणा-या भाषेबाबत, मांडणीबाबत आणि विशेषत: वेळेबाबत काही अलिखित संकेत, जबाबदा-याही आहेतच. पण याचे भान राखले जात नाही, याबद्दल वैषम्य वाटते!
अधिकार गाजवणारे पण जबाबदारी टाळणारे लोक एका अर्थी समाजद्रोही असतात. भारत-पाकिस्तान संघर्षामध्ये नुकताच विराम जाहीर केला गेला. दोन्ही देशांच्या जबाबदार, अधिकारी व्यक्तींनी हा निर्णय घेतला आणि हा निर्णय जाहीर करण्याची जबाबदारी एका अनुभवी, जबाबदार आणि अधिकारी व्यक्तीने सरकारच्या वतीने पार पाडली! या व्यक्तीचे नाव श्री. विक्रम मिसरी. सर्वसामान्य लोकांना श्री. मिसरी यांची कारकीर्द माहित असण्याचे काही कारण नाही. पण आताच्या स्थितीत त्यांची कारकीर्द, त्यांची योग्यता आणि गेल्या काही दिवसांत त्यांनी बजावलेली असाधारण कामगिरी नजरेसमोर ठेवता त्यांच्याविषयी अधिकच्या काही बाबी समजून घेणे अगत्याचे वाटले, म्हणून हा लेखन प्रयास!
भारतीय परराष्ट्र सेवा (INDIAN FOREIGN SERVICE) हा जग आणि आपला देश यांच्या परस्पर संबधामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा विभाग राष्ट्रीय आहे. देश सामरिकदृष्ट्या जितका सरस तितकाच मुत्सद्देगिरीच्या बाबतीतही सक्षम असेल तरच त्याचा निभाव लागू शकतो, हे आपण जाणताच.
श्री. विक्रमजी हे सध्याचे आपल्या देशाचे ३५वे परराष्ट्र सचिव (विदेश सचिव) म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत शांत, संयमी, निगर्वी आणि सक्षम अधिकारी म्हणून त्यांनी स्वत:ला सिद्ध करून दाखवले आहे.
श्री. मिसरी यांचा जन्म श्रीनगर-जम्मू-काश्मीर राज्यातला असून ते दिल्लीच्या हिंदू महाविद्यालयाचे इतिहास विषयाचे पदवीधर आहेत. १९८९ मध्ये भारतीय परदेश सेवेत दाखल झालेल्या श्री. मिसरी यांनी १९९१ ते १९९६ या पाच वर्षांच्या काळात ब्रुसेल्स, ट्यूनिस या देशांमध्ये भारतीय मोहिमांमध्ये विविध जबाबदा-या सांभाळल्या. श्रीमती इंदिरा गांधी, मोरारजी देसाई आणि चरण सिंग या तीन पंतप्रधानांच्या काळात सोविएत युनियन मध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलेल्या पंतप्रधान श्री. इंदर कुमार गुजराल यांनी श्री. मिसरी यांची त्यांचे स्वीय साहाय्यक म्हणून नेमणूक केली होती, यातच श्री. मिसरी यांच्या कार्यक्षमतेची कल्पना यावी. पुढे श्री. मनमोहन सिंग यांचेही ते स्वीय साहाय्यक होते आणि श्री. नरेंद्र मोदी यांनीही त्यांना त्याच पदावर कायम ठेवले होते.
२०१९ मध्ये चीन मधील भारताचे राजदूत म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी केली. गलवान मध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये २०२०-२१ झालेल्या हिंसक संघर्षाच्या वेळी श्री. मिसरी यांनी मुत्सद्दीपणाची चुणूक दाखवली आहे. २०२४ मध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार या पदावर नेमले गेले आणि १५ जुलै, २०२४ पासून ते परराष्ट्र सचिव या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत.
आणि विशेष म्हणजे एवढा मोठा अधिकारी प्रसिद्धीच्या झोतात आजवर कधीच दिसला नाही. श्री. मिसरी भारताने पाकिस्तानी दहशतवादी केंद्रांवर चढवलेल्या हल्ल्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत होते. या परिषदेत मेजर सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या महिला अधिकारी मिडीयाच्या नजरेत काहीशा अधिक भरल्या. श्री. मिसरी साहेबांनी सुद्धा नेहमीप्रमाणे लो प्रोफाईल राहून त्यांचे विहित कर्म काटेकोरपणे सुरूच ठेवले. परंतु १० मे, २०२५ रोजी श्री. विक्रम मिसरी यांनी भारताचे शीर्ष नेतृत्व, भारतीय सैन्यदल यांच्या वतीने पाकिस्तानशी युद्धविराम केला गेल्याचे अत्यंत संयमी आणि मोजक्या शद्बांत जाहीर केले! युद्धविराम करण्याचा निर्णय त्यांनी त्यांच्या तोंडून ऐकवला… त्यांनी स्वत: युद्धविरामाचा निर्णय घेतला नव्हता.. हे अधोरेखितच होते. परंतु, सोशल मिडीयावर श्री. मिसरी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर बिभित्स भाषेत टीका सुरु झाली. एखाद्याला ट्रोल करणे म्हणजे to deliberately try to upset or provoke them, often through online interactions, by posting offensive, unkind, or inflammatory messages. It’s a form of online harassment or bullying, with the aim of causing distress or stirring up arguments. (ऑनलाईन संवादामध्ये एखाद्याबद्दल मानहानीकारक, बीभत्स मजकूर लिहिणे जेणेकरून त्या व्यक्तीला मानसिक त्रास होईल, आणि त्यातून वादविवाद निर्माण होईल.)
ही शिवीगाळ इतकी टोकाला गेली की त्यांच्या दोन्ही मुलींना यामध्ये ओढले गेले. वास्तविक त्यांच्या मुली, त्या परदेशात करीत असलेल्या नोक-या हा एक अत्यंत व्यक्तिगत भाग आहे. पण त्याचे भान राखले गेले नाही. अर्थात स्वत:ची काहीही पात्रता नसताना बरळणा-या लोकांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचे, हे सुद्धा ठरवावे लागते. परंतु सातत्याने असेच लिहिले, बोलले गेल्यास किमान मानसिक त्रास तर होतोच. यामुळे श्री. मिसरी यांनी त्यांचे एक्स खाते बंद करून टाकले.
भारतातील जबाबदार राजकीय नेते, प्रशासकीय सेवेतील अधिका-यांच्या संघटना इत्यादी लोकांनी देशासाठी अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावत असलेल्या श्री. विक्रम मिसरी साहेबांना पाठिंबा जाहीर केला आहे, ही उत्तम बाब आहे. परंतु, मिसरी साहेब आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल जाहीर अनुदार वक्तव्ये केलेल्या लोकांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, हेही खरे आहे.
भारतीय प्रशासकीय व्यवस्थेमध्ये प्रशासकीय अधिकारी नव्हेत तर देशाचे सर्वोच्च राजकीय नेतृत्व हे सर्वोपरी असते, हे श्री. मिसरी साहेबांविरुद्ध अनाधिकाराने बोलणा-यांच्या लक्षात येत नाही, यातच या ट्रोलक-यांच्या बुद्धिमत्तेची एकूणातली खोली, लांबी आणि रुंदीही लक्षात येते.
सर्वसामान्य भारतीय जनता मात्र श्री. विक्रम मिसरी साहेबांसारख्या देशभक्त आणि खंबीर, प्रामाणिक माणसाच्या मागे किमान मनाने तरी उभी असेल, यात शंका नाही. युद्ध सुरु ठेवावे की थांबवावे याचा निर्णय घ्यायला आपली भारतीय सेना, राजकीय नेतृत्व सक्षम आहे, हेही सांगणे न लगे! देशभरातून विविध राजकीय पक्ष, विचारवंत यांच्याकडून सरकारच्या भूमिकेवर विश्वास व्यक्त केला जात असताना श्री. मिसरी साहेबांवर चिखलफेक केली जाणे, हे शत्रूच्या पथ्यावरच पडेल, याची जाणीव संबंधित मूर्ख लोकांना लवकरात लवकर व्हावी, ही अपेक्षा!
श्री. मिसरी साहेबांविषयी प्रसिद्ध माजी आय. पी. एस. अधिकारी श्रीमती किरण बेदी यांनी काढलेले उद्गार अतिशय नेमके आहेत. श्री. मिसरी हे काश्मीर मधून निर्वासित केल्या गेलेल्या कश्मीरी पंडित समाजातून आले आहेत. अन्यायाच्या राखेतून उठून उभे राहून त्यांनी अधिकार पदास गवसणी घातली आहे… ती अभ्यास, विचार आणि ताठ कण्याच्या बळावर.. विरोध किंवा सूडाच्या भावनेतून नव्हे! ”
बोलणा-यांची तोंडे धरता येत नाहीत, असे निदान मिसरी साहेबांच्या विरोधात केल्या गेलेल्या TROLLING बाबत म्हणून चालणार नाही. एकंदरीतच बेताल लिहिण्या, बोलण्यावर सामाजिक निर्बंध आले पाहिजेत.
श्री. विक्रम मिसरी साहेब यांना शुभेच्छा. असो. याबाबतीत आपण सामान्य लोक प्रत्यक्षात काही करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु किमान काही गोष्टी आपल्याही माहितीत असाव्यात, म्हणून हे एवढे लिहिले आहे. जय हिंद! माहिती आणि छायाचित्र इंटरनेट, वृत्तपत्रे इत्यादी स्रोतांमधून साभार घेतली आहे. जन-मन-हितार्थ जारी.
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈